डॉ. मॅक्सीन बर्नसन का झाल्या भारतीय ? कारण वाचून प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेल...

डॉ. श्रीमती मॅक्सीन बर्नसन उर्फ (मॅक्सीन मावशी) ह्या मूळच्या अमेरिकेतल्या. आज वय वर्ष ८३, पण आता त्या तनामनाने संपूर्ण भारतीय आहेत एक भाषातज्ज्ञ म्हणून, तेही खरंतर मराठीच्या प्रेमापोटी. 

मराठी हा विषयच अगदी ओढ लावणारा नाही का?  या मराठी भाषेला आपण जसे वळवू तशी वळते. ही भाषा समजून घेऊन तिला हवं तसं वळवणं हे परदेशी लोकांसाठी आणखीच अवघड.  पण, ही भाषा समजून घेण्याची जिद्द मॅक्सीन मावशींना होती, त्यांना मराठी भाषेबद्द्ल कुतूहल होतं. त्या अमेरिकेतून महाराष्ट्रात आल्यानंतर मराठी भाषेवर त्याचं प्रेम जडलं. 

चला जाणून घेऊ डॉ. मॅक्सीन मावशी नक्की आहेत तरी कोण ?

स्रोत

डॉ. मॅक्सीन मावशी तर लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होत्या. बारावीत असताना त्यांनी एका पत्रकाराचे व्याख्यान ऐकले होते.  त्या पत्रकाराने केलेल्या भारताचं वर्णन  ऐकून डॉ. मॅक्सीन यांनी तेव्हाच भारतात यायचे ठरवले होते व पुढचे शिक्षण त्यांनी भारतात घ्यायचे ठरवले. त्यासाठी त्यांना आधी अमेरिकेत पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करावं लागलं.  डॉ. मॅक्सीन यांनी मिनेसोटा ऑग्सबर्ग कॉलेजमधून बी. ए. केलं.  नंतर तिथल्या शाळेत एक वर्ष इंग्रजी शिकवलं आणि त्यानंतर त्यांनी न्यूयॉर्कमधल्या कोलंबिया विद्यापीठातून इंग्रजी विषयात एम्. ए. करण्यासाठी वुड्रो विल्सन शिष्यवृत्ती मिळवली. पदवी मिळाल्यानंतर डॉ. बर्नसन यांनी डेकोरा येथील ल्यूथर कॉलेजात दोन वर्षे इंग्रजी शिकवलं.  त्यानंतर डॉ. मॅक्सीन यांना महाराष्ट्रातल्या फलटण तालुक्यातील मराठी बोलीमधील सामाजिक विविधता या विषयावर काम करण्यासाठी फुलब्राइट-हेज शिष्यवृत्ती मिळाली. इतकंच नाही, तर पुढे त्यांना अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीजकडून भारतात राहून काम पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली.

कार्य -

स्रोत

या मॅक्सीन मावशींनी वयाच्या ८३ व्या वर्षीही त्यांचे भाषा समृद्धी संशोधनाचे कार्य चालू ठेवले आहे. त्यांची शिकण्याची हौस भली दांडगी आहे.  वयाच्या ५५ वर्षी त्या चक्क रिक्षा चालवायला शिकल्या!! सध्या मात्र त्या 'टी.आय.एस.एस.' च्या  हैदराबाद शाखेत प्राध्यापक या नात्याने भाषाविषयक कौशल्ये शिकवत आहेत. त्या विविध अशा भाषाकौशल्यांच्या अभ्यासक, आणि एक भाषातज्ञ म्हणून लोकप्रिय आहेत. मॅक्सीन मावशी दर दोन वर्षांनी अमेरिकेत जातात. तिथं असोसिएटेड कॉलेजेस ऑफ द मिडवेस्ट इंडिया स्टडीज प्रोग्रॅम अंतर्गत पुण्यात येऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मराठी शिकवतात. जाई निंबकर या डॉ. मॅक्सीनच्या स्नेही. त्यांच्यासोबत अमराठी प्रौढांना मराठी शिकवण्यासाठी नऊ पुस्तकांच्या संचावर काम करत आहेत. या पुस्तकांमध्ये एक व्याकरणाचे पुस्तक व एक शब्दकोश यांचाही समावेश आहे. व आपल्या मॅक्सीन मावशी आता १० मराठी पुस्तकाच्या लेखिका देखील झाल्या आहेत.

स्रोत

भाषाशास्त्र आणि पुस्तकं लिहिणं सोडूनही डॉ. मॅक्सीन यांनी भारतात समाजोपयोगी कामं भरपूर केली आहेत. लहान मुलामुलींना शाळेत येण्याची इच्छा व्हावी  यासाठी त्यांनी 'कमलताई निंबकर बालभवन' मराठी माध्यमाची शाळा सुरू केलीय. दलित मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी नगरपालिकेच्या शाळांमध्ये भरती करण्याचे काम हाती घेतलं. छोट्या मुला-मुलीना लिहायला व वाचायला यावे म्हणून खास व सोप्या पद्धती सुरू केल्या, मोठ्या मुलांसाठी रात्रीचे वर्ग सुरू केले, शाळा सोडलेल्या मुली व निरक्षर स्त्रियांसाठी साक्षरतेबरोबर शिक्षणवर्ग सुरू केले. वस्तीतील शालाबाह्य मुलांना अनौपचारिकरीत्या शिकवण्यास सुरुवात केली. याच कामाची परिणती पुढे हळूहळू प्रगत शिक्षण संस्थेच्या स्थापनेत झाली. अशा रीतीने मॅक्सीन मावशीने हजारो मुलांना शिक्षणाची गोडी लावली.

वैयक्तिक मत :

स्रोत

डॉ मॅक्सीन बर्नसन यांचे असे मत आहे की, कोणतीही भाषा आत्मसात केल्याने ती भाषा आपल्याला सहज बोलता येते.  त्यासाठी पहिली किंवा बालवाडी पासून शिकणे गरजेचं नाही असं त्यांना वाटतं. तसंच कोणतीही भाषा शिकण्याची कोणती वयोमर्यादा नसते. आपण दुसरी किंवा तिसरीपासून शिकण्याची सुरुवात करू शकतो. कारण संवाद वाढल्याने समाज बनतो व संवादाने आपण समाजही बनवू शकतो असे त्यांचं वैयक्तिक मत आहे.  त्यांचं असंही म्हणणे आहे की, "कोणतीही भाषा शिकण्याची सुरुवात आपण आपल्या बोली भाषेतूनच करावी.  कारण आपली बोली भाषा आपल्याला बोलायला मदत व शब्दांची ओळख करून देते. आणि त्यानंतर जगाच्या वेगवेगळ्या भाषा आत्मसात कराव्या." 

स्रोत

डॉ. मॅक्सीन बर्नसन यांना शिक्षणविषक कामासाठी त्यांना अनेक असे पुरस्कार मिळाले आहेत.  त्यांना साताऱ्याला झालेल्या  साहित्य संमेलनात गौरविण्यात आलं होतं. प्रत्येक कार्यासाठी प्रसिद्ध पावलेल्या महाराष्ट्रीय महिलांच्या जीवनाची ओळख करून देणार्‍या ‘डॉटर्स ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकातही डॉ.मॅक्सीन बर्नसन यांचा समावेश आहे. त्यांच्यावर ‘ए चान्स ट्रू ड्रीम’ या नावाची डॉक्युमेंट्रीसुद्धा तयार केली गेली आहे. अशा ह्या आपल्या मॅक्सीन मावशी यांनी भारतात राहण्याचा निश्चय केला, व त्यांचा निश्चय झाल्यानंतर इथल्या मातीशी एकरुप होण्यासाठी, आपलं अमेरिकेतील नागरिकत्व त्यांनी रद्द केले, व १९७८ पासून त्या भारतीय नागरिक बनल्या आहेत. 

अशाप्रकारे, आपल्या मॅक्सीन मावशी कायमच्या भारतीय झाल्या. यासाठी खरंच त्यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. त्यांच्या मराठी भाषेतल्या आणि महाराष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना बोभाटाचा मानाचा मुजरा...

 

लेखिका : सुप्रिया सुतार

सबस्क्राईब करा

* indicates required