1993 चे बॉम्बस्फोट ते शीना बोरा खून खटला, सर्व काही उलगडणार का या राकेश मारिया वेबसिरीजमध्ये ??

२०१५ च्या सप्टेंबरचे दिवस होते. शीना बोरा मर्डर केसच्या बातमीनं वातावरण ढवळून निघालं होतं आणि अचानक एक दिवस परदेशाच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी मुंबईचे पोलीस कमिशनर यांना बढती देऊन डायरेक्टर जनरल होमगार्ड्स (डीजी) बनवलं. ही बढती होती? की ही शिक्षा होती? की राकेश मारिया मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतून उतरले असण्याचे हे संकेत होते ?

स्रोत

नक्की काय ते फक्त मारिया आणि मुख्यमंत्री यांनाच माहिती. कारण त्यांना दिलेलं पद हे नॉन-एक्झिक्युटिव्ह स्वरूपाचं होतं. थोडक्यात सांगायचं तर, मारियांच्या हातातली अधिकाराची अस्त्रं सरकारनं काढून घेतली होती. एकेकाळी सुपर ‘कॉप’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारीयांच्या कारकीर्दीचा हा अस्त होता. मारियांच्या कारकिर्दीतल्या महत्त्वाच्या केसेस तरी ऐकून तुम्हां-आम्हांला माहित आहेत. पण कदाचित येत्या काही दिवसात मेघना गुलजारच्या आगामी सिरीजमधून सुपर ‘कॉप’ राकेश मारिया यांच्या झंजावाती कारकीर्दीवर एका वेगळ्या दृष्टीकोनातून प्रकाश पडेल. 

मेघना गुलजार कोण हे आम्ही तुम्हाला वेगळं सांगायला हवं का ? राझी बघितलाय ना ? येणारं दणदणीत नवीन समीकरण मेघना गुलजार + फँटम + रिलायन्स एंटरटेनमेंट असे असेल.


 

स्रोत

ही सिरीज पुढच्या काहीकाळात येईलच.  पण त्यापूर्वी एक नजर टाकूया सुपर ‘कॉप’ राकेश मारिया यांच्या कारकीर्दीवर.

राकेश मारिया यांचे वडील फिल्म लाईनमध्ये होते. त्यांचं आडनांव खरंतर माडिया. पण अपभ्रंश होऊन त्याचं मारिया कसं झालं कोण जाणे. तर, त्यांच्या वडिलांच्या कलानिकेतन या बॅनरखाली काजल, नीलकमल यांसारखे यशस्वी चित्रपट प्रदर्शित झाले होते. मग हे पोलीस बनण्याचं कसं मनात आलं ? याची एक गंमत आहे. ते विद्यार्थी दशेत असताना ‘लुईस ला’मोर’ची पुस्तकं वाचण्याचा त्यांना छंद होता. तो काळ काऊबॉईजच्या कथांचा होता. असंच एक पुस्तक वाचताना त्यांना वाटलं की आता व्हायचं तर पोलिसच !!

स्रोत

आयपीएसच्या इंटरव्ह्यूमध्ये पाच वेगवेगळे पर्याय दिलेले असतात. त्या पाचही पर्यायात त्यांनी एकच उत्तर दिलं होतं ते म्हणजे पोलीस, पोलीस आणि पोलीस. यावर इंटरव्ह्यू कमिटीच्या एका वरिष्ठ सदस्यांनी विचारलं की असं का? त्यावर मारीयांचं उत्तर होतं, ‘मी एक तर पोलीस होईन, नाही तर काहीच नाही’.

देशातली गुन्हेगारी एका नवीन वळणावर असताना त्यांच्या हातात १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाची केस सोपवण्यात आली. एकूण १२३ आरोपी या प्रकरणात पकडण्यात आले. या तपासकामाच्या दरम्यान त्यांच्या लक्षात आलं की मुंबईतील गुन्हेगारी आता संघटीत गुन्हेगारी आहे. इतकंच नाही तर गुन्ह्यांची पाळंमुळं आता जगभर पसरली आहेत. दाऊद फणसे या एका गुन्हेगाराचा तपास करताना हा विचार त्यांच्या मनात पक्का झाला. यानंतर १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या केसचा मागोवा घेणं सहज शक्य झालं. 

१९९३ चा मुंबई बॉम्बस्फोट (स्रोत)

मारिया यांच्या मते तपास कामात आरोपीचे डोळे काहीतरी सांगत असतात. ते वाचता आले तर तपासकाम फार सोप्पं होतं. संशयित जे बोलत असतो त्यापेक्षा त्याची बॉडी लँन्गवेज (देहबोली) काय सांगत असते ते महत्वाचं आहे. नीरज ग्रोवर खून खटल्यात त्यांनी मारिया सुसाईराजला पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की ‘मारिया, माझ्या दृष्टीने तूच आरोपी नंबर १ आहेस...’ यानंतर मारियाची जी चुळबुळ झाली,  त्या बॉडी लँन्गवेजवरून तपास सुरु झाला. दुसऱ्या दिवशी त्यांनी मारिया सुसाईराजला विचारले की तिच्या दंडावर खरचटल्याच्या खुणा कशा झाल्या? त्यावर मारियाचं उत्तर इतकं गुळमुळीत होतं की पुढच्या चार तासात तिच्याकडून गुन्ह्याची कबुली घेण्यात तपासकामाला यश आलं. 

मारिया सुसाईराज (स्रोत)

असे अनेक स्टार्स एखाद्याच्या करियरमध्ये मिळत असतात. सोबत वर्दीवर एखादा डाग पण पडतो. २६/११ च्या हल्ल्यानंतर विनिता कामटे यांनी जे आरोप मारियांवर केले, त्या आरोपांनी ते निश्चितच व्यथित आहेत. या घटनेबद्दल बोलताना ते म्हणतात, ‘मी खरं म्हणजे त्यावेळी तिथं असायला हवा होतो.  पण कमिशनर हसन गफूर यांनी मला कंट्रोल रूमचा ताबा घ्यायला सांगितला.’ पुढं ते म्हणतात, ‘जर मला गोळी लागली असती तर मी हिरो झालो असतो....’

२००८ चा अतिरेकी हल्ला म्हणजे गुन्हेगारीचा बदलता चेहरा होता. एखाद्या टॅक्सीत, बसमध्ये, रेल्वेत बॉम्बस्फोट होणं अपेक्षित असतं,  पण २६/११ सारखा हल्ला कल्पनेपलीकडची गोष्ट होती. “९/११ च्या हल्ल्याच्या बद्दल चौकशी समितीला एक प्रश्न विचारला गेला, "हा हल्ला म्हणजे गुप्तचर संस्थेचा पराभव होता का ?" समितीचं उत्तर होतं, "नाही, हा पराभव गुप्तचर संस्थेचा नव्हता तर कल्पनाशक्तीचा होता.”

२६/११ चा हल्ला (स्रोत)

सेवानिवृत्त होताना कुठल्याही माणसाच्या मनात एकच प्रश्न येतो की मी काय केलं आणि काय करायचं राहून गेलं. काहीवेळा ही खंत अधिकारी म्हणून असते, तर काहीवेळा ती वैयक्तिक पातळीवर असते. पोलीस अधिकारी म्हणून राकेश मारियांच्या मनात एकच खंत होती. ती म्हणजे अनेक प्रयत्न करूनही नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येच्या कारस्थानाचा पूर्ण छडा ते लावू शकले नाहीत. खरं सांगायचं म्हणजे हे तपासकाम एटीएसकडे पूर्णपणे दिलं नव्हतं, तरीही एटीएस मारेकऱ्यांच्या मागावर होते. पण कलिनाच्या लॅबचा रिपोर्ट वेगळाच आला आणि तपासकामाची दिशा अचानक बदलली. ही कामगिरी अपूर्ण राहिल्याची चुटपूट मारीयांच्या मनाला लागून राहिली.

वैयक्तिक पातळीवर एकाच गोष्टीचा सल असा आहे की शीना बोरा प्रकरणात पीटर मुखर्जीची चौकशी अंतिम टप्प्यात असताना अचानक महिनाभरापूर्वीचा संदर्भ देऊन त्यांची अचानक बदली करण्यात आली.

शीना बोरा (स्रोत)

येणारी सिरीज त्यांच्या कारकीर्दीवर आहे. पण सिनेमा-मालिकांमध्ये त्यांचं चित्रण होणं काही नवीन नाही. कारण अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांचं व्यक्तिमत्व अनेक वेगवेगळ्या नटांनी साकारलं आहे. ‘ब्लॅक फ्रायडे’ मध्ये के.के. मेनन तर २६/११ च्या हल्ल्यावर बनलेल्या सिनेमात नाना पाटेकर राकेश त्यांच्या भूमिकेत होते. वेन्सडेमधलंही पोलिस मुख्याधिकाऱ्याच्म पात्र मारियांच्यावरुन प्रेरित होतं. असं असलं तरी येणारी सिरीज राकेश मारियांचं आयुष शक्य तितक्या जवळून दाखवेल अशी आशा आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required