computer

तुमच्या खिशातलं नाणं नक्की कोणत्या टाकसाळीत बनलंय असं तपासून पाहा...

राव, आपण दिवसभरात बरीच नाणी हाताळत असतो. एक रुपये, दोन रुपये, पाच रुपये इत्यादी. पण तुम्ही कधी या नाण्यांना नीट बघितलंय ? काय काय असतं या नाण्यांवर ?

समजा १ रुपयाचं नवीन नाणं आहे तर त्यावर एक अंगठ्याचं चित्र असेल आणि बाजूला १ रुपया-Rupee ही अक्षरं कोरलेली असतील. मागच्या बाजूला भारत-india आणि सत्यमेव जयते लिहिलेलं असेल. खाली वर्ष सुद्धा लिहिलेलं असेल. जिथे वर्ष लिहिलेलं असतं त्याच्या खाली नीट बघितलं तर तुम्हाला एक लहानसं चिन्ह दिसेल. हे चिन्ह नव्या जुन्या नाण्यांवर वेगवेगळ्या ठिकाणी असू शकतं किंवा चिन्हाच्या जागी अक्षरं पण असू शकतात. पण याचा अर्थ काय होत असेल भाऊ ?

राव, जास्त विचार करू नका. आम्हीच याचं उत्तर देतो. हे गूढ चिन्ह म्हणजे नाणं ज्या टाकसाळीत तयार झालंय त्या टाकसाळीचं चिन्ह असतं. भारतात ४ टाकसाळी आहेत. कोलकाता, मुंबई, हैदराबाद आणि नोएडा. टाकसाळी ४ असली तरी चिन्ह ४ नाहीत बरं का.

कोणतं नाणं कोणत्या शहरात तयार झालंय ते कसं ओळखायचं ?? चला शिकून घेऊया !!

१. मुंबई

हिऱ्याच्या आकारातलं चिन्ह, B, M, किंवा U अक्षरं ही मुंबईच्या टाकसाळीची ओळख आहेत.

२. कलकत्ता

दोन भागात विभागलेल्या हिऱ्याचं चिन्ह किंवा जर कोणतंच चिन्ह नसेल तर ते नाणं कलकत्याच्या टाकसाळीत तयार झालेलं आहे असं समजावं.

३. हैदराबाद

हिऱ्याचा आकार पण मध्ये ठिपका किंवा चांदणी अशी चिन्ह हैद्राबादच्या टाकसाळीची असतात.

४. नोएडा

नोएडाच्या टाकसाळीचं एकंच चिन्ह आहे - मोठा गोल ठिपका.

तर मंडळी, आता आपल्या खिशातली नाणी काढा आणि बघा कोणत्या भागातून ही नाणी तुमच्या पर्यंत पोहोचली आहेत ते !!  

सबस्क्राईब करा

* indicates required