आर. के. धवन यांना का म्हटलं जायचं वाघीणीचा म्हणजेच इंदिरा गांधींचा पंजा ??

या सोमवारी म्हणजेच ६ ऑगस्ट २०१८ या दिवशी आर. के. धवन यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. बोभाटाच्या तरुण वाचकांना आर. के. धवन म्हणजे कोण हा प्रश्न पडण्याचीच शक्यता जरा जास्त आहे.  पण ज्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधींची कारकिर्द बघितली असेल, त्यांना आर. के. धवन हे काय रसायन होते ते नक्कीच माहिती असेल.

स्रोत

आर के धवन यांचे आयुष्य  एक जबरा सुपर ड्युपर बॉलीवूड बायोपीक बनवता येईल असे होते. १९६२ ते १९८४ मध्ये इंदिराजींचा मृत्यु होईपर्यंत पंतप्रधानांचा शंभर टक्के विश्वास असलेली आर. के. धवन ही एकच व्यक्ती होती. या कालखंडातला प्रत्येक क्षण ते पंतप्रधानांसोबत होते. बियांतसिंगने इंदिराजींवर गोळ्या झाडल्या तेव्हाही आर. के. धवन काही पावलेच त्यांच्या मागे चालत होते. इंदिराजींचा मृत्यु १९८४ साली झाला, पण त्यांची सावली काल मावळली या एकाच वाक्यात आर. के. धवन यांच्या समर्पित जीवनाचं वर्णन करता येईल.  या काळातल्या सगळ्या नोंदी त्यांच्याकडे होत्या. पण जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी त्या तशाच जपल्या. अपवाद फक्त एकाच दस्तऐवजाचा, जो केवळ इंदिराजींची प्रतिमा स्वच्छ ठेवावी यासाठी त्यांनी कुमी कपूर यांना दिला होता. 

स्रोत

आर. के. धवन केवळ योगायोगाने इंदिराजींच्या सहवासात आले. पंतप्रधानांना एका चांगल्या स्टेनो टायपिस्टची आवश्यकता होती. यशपाल कपूर नावाचे एक राजकारणी तेव्हा इंदिराजींचे निकटवर्ती होते. त्यांनी त्यांचा नातलग राजिंदरकुमार धवन यांची या कामी शिफारस केली. काही वर्षांतच आर. के. धवन इंदिराजींचे डोळे आणि कान बनले. यानंतरच्या काळात त्यांची ताकद इतकी वाढली, की राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनासुद्धा पंतप्रधानांना भेटायचे असेल तर आर. के. धवन यांच्यामार्फतच त्यांना जावे लागायचे. आएएस -आयपीएस अधिकारी कितीही मोठा असला तरी आर. के. धवन यांच्या परवानगीशिवाय पंतप्रधानांना भेटता यायचे नाही. अधिकार्‍यांच्या बदल्या, मंत्र्यांचे खातेपालट, सरकारी निर्णय, सरकारी फायलींचे अवलोकन, यासाठी एकच रस्ता होता तो म्हणजे आर. के. धवन !!

स्रोत

या दरम्यान अनेक मुख्यमंत्री, अधिकारी, संसद सदस्य दुखावले गेले. कारण त्यांच्या मार्गात एकच अडथळा होता तो म्हणजे आर. के. धवन. "पंतप्रधानांची अशी इच्छा आहे की..." असा आवाज फोनवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आला की त्यांना धडकीच भरायची. १९७२ नंतर अशी स्थिती होती की सरकार म्हणजे  संजय गांधी, माखनलाल फोतेदार, सिध्दार्थ शंकर रे, आणि अर्थातच आर. के. धवन. अनेकांनी आर. के. धवन म्हणजे पतंप्रधानांचे डोअर कीपर किंवा पॅलेस गार्ड अशी पण संभावना केली आहे. पण आर. के. धवन म्हणजे स्वामीनिष्ठतेचा कळस असेच म्हणावे लागेल. कामात अडथळा नको म्हणून या गृहस्थांनी वयाच्या ७४ वर्षांपर्यंत लग्न पण केले नव्हते.

स्रोत

१९८४ साली इंदिराजींच्या अंगरक्षकांनी त्यांची हत्या केली. आर. के. धवन तेव्हा काही पावलेच त्यांच्यामागे चालत होते आणि त्यांना एकही गोळी लागली नाही हा धागा पकडून त्यांचा या हत्येत सहभाग होता असा आरोपही त्यांच्यावर आला. ठक्कर कमिशननेसुद्धा अशी एक शक्यता असू शकेल असे म्हटले आणि आर. के. धवन यांचे वाईट दिवस सुरु झाले. घराभोवती आयबीचा खडा पहारा सुरु झाला, फोन टॅप झाले, अनेक आरोप झाले. एकेकाळी दुखावले गेलेले सर्व पुढारी एकत्र आले. या  संशयाच्या भोवर्‍यातून धवन यांनी स्वतःला बाहेर काढले, सावरले.. पण राजकारणातून अंग बाहेर  काढून घेतले. राजीव गांधी सत्तेवर आल्यावर त्यांनी आर. के. धवन यांना तांदळातल्या खड्यासारखे दूरच ठेवले. पण राजीव गांधी गेल्यावर सोनिया गांधींना राजकीय आधाराची गरज भासली आणि अनमान न करता ते पुन्हा एकदा परत आले. 

स्रोत

आता त्यांच्या मृत्युनंतर सगळे काही आता काळाच्या पडद्याआड जमा झाले आहे. पण आर. के. धवन यांचा उल्लेख  इतिहासात इंदिरा गांधीं नावाच्या वाघीणीचा पंजाच असाच असेल.

 

सबस्क्राईब करा

* indicates required