ऐकावं ते नवलच - चीनमधला हा डोंगर चक्क अंडी देतो ??

चीनमधल्या ‘गुइझोउ’ प्रांतातल्या एका डोंगर कडेवर एक अजब प्रकार पाहायला मिळतो राव. ही डोंगर कडा चक्क अंडी देते. तुम्ही बरोबर ऐकलंत. अहो खरंच अंडी देते. त्यामुळेच स्थानिक लोक या डोंगराला ‘अंडी देणारा डोंगर’ म्हणतात.

आता दिसताना तर ही अंडी वाटतात, पण प्रत्यक्षात ते काय आहेत ? चला पाहूया.

स्रोत

मंडळी, या डोंगरात असलेला दगड हा चुनखडीचा आहे. जवळजवळ ५०० दशलक्ष वर्षांपूर्वी त्याची निर्मिती झाली. स्थानिक लोकांनी या डोंगरावर येणारे अंडाकार दगड पाहिले आणि त्यांना ती अंडी वाटली. या दगडांची खासियत म्हणजे ३० वर्षांनी ते खाली कोसळतात. खरं म्हणजे ही एक निसर्गाची कलाकारी आहे. पण मनुष्य स्वभाव नैसर्गिक चमत्कारांना दैवी चमत्कार असं नाव देतो. म्हणून ही अंडी जमा केली की भाग्य उजळतं अशी एक समजूत आहे. 

शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केल्यानंतर त्यांच्या हाती पुढील माहिती लागली.

स्रोत

ही अंडी अर्थात अंडी नसून ती खनिजे आहेत. काय असतं ना राव, चुनखडीतून पाण्यावाटे वाहून आलेली खनिजे एकत्र जमा होतात. या खनिजाचा एक साठा तयार होतो. या खनिजात एखादे पान, एखादा कीटक किंवा एखादा शिंपला अडकला की त्याच्या भोवती खनिजाचा घट्ट गोळा तयार होतो. अर्थात ही प्रक्रिया व्हायला ३० वर्ष लागतात आणि पूर्ण गोलाकार झाल्यावर हे गोळे उतारावरून घरंगळत जमिनीवर कोसळतात.
चुनखडीचा नैसर्गिक गुण सिमेंट सारखाच असतो. त्यामुळे हे कॉन्क्रीटचे गोळे आहेत असं म्हणायला हरकत नाही.

आहे की नाही गंमत? निसर्गाच्या पोतडीत अशा बऱ्याच गमतीजमती दडल्या आहेत...

सबस्क्राईब करा

* indicates required