computer

भारतातले सर्वात श्रीमंत व्यक्ती निजामाच्या खजिन्याचं प्रदर्शन सुरू आहे भाऊ.. पाहा काय काय आहे खजिन्यात!!!

असं म्हणतात की हैद्राबादचे शेवटचे निजाम ‘उस्मान अली खान’ हे आजवर भारतात होऊन गेलेले सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. अहो तब्बल २३० अब्ज डॉलर्स एवढी संपत्ती होती त्यांच्याकडे. खरा आकडा या पेक्षा मोठा असू शकतो. उस्मान आली यांच्या श्रीमंतीच्या अनेक चुरस कथाही सांगितल्या जातात. त्यांनी एकदा म्हणे पेपरवेट म्हणून चक्क हिरा वापरला होता.

तर, आज हे सगळं इतिहासातून उकरून काढण्याचं कारण म्हणजे १९ फेब्रुवारीपासून दिल्लीच्या नॅशनल म्युझियम मध्ये निजामाच्या सगळ्या दागदागिन्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनात जवळजवळ १७३ दागिने ठेवण्यात आले आहेत. या दागिन्यांमध्ये शिरपेच, बाजूबंद, हार, कर्णभूषणे, अंगठ्या, बांगड्या, कमरपट्टा, ब्रेसलेट तसेच गोवळकोंडा येथील हिरे, म्यानमारचे रुबी, कोलंबियन पाचू, बासऱ्याचे मोती असा जडजवाहीरांचा बराच मोठा साठा आहे.

पण मंडळी सर्वात जास्त चर्चा होत आहे ती एका हिऱ्याची. या हिऱ्याचं नाव आहे “जेकब डायमंड”. या हिऱ्याची किंमत बाकी सगळ्या दागदागिन्यांना पुरून उरेल एवढी आहे राव.

जेकब डायमंड हा आकाराने कोहिनूर पेक्षा दुप्पट मोठा आहे. हा जगातील सर्वात मोठ्या हिऱ्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. १८५ कॅरेटच्या या हिऱ्याची किंमत आज बाजारात तब्बल ४०० कोटी रुपये आहे. हैदराबादचे सातवे निजाम महबूब आली खान यांनी हा हिरा शिमल्याच्या व्यापाऱ्याकडून विकत घेतला होता. त्यावेळी याची किंमत होती केवळ २३ लाख रुपये.

हे सगळे दागिने आजवर होते तरी कुठे ?

खजिन्याचा सांभाळ करण्याची जबाबदारी उस्मान आली खान यांनी स्वतः स्थापन केलेल्या "एचएचएच निजाम सप्लीमेंटल ज्वेलरी ट्रस्ट”कडे सोपवली होती. या ट्रस्टने सगळा खजिना हॉंगकॉंगच्या बँकेत ठेवला होता. १९९५ साली मोठ्या कायदेशीर लढ्यानंतर भारत सरकारने हा खजिना २१८ कोटींना विकत घेतला. त्यानंतर सर्व दागदागिने भारतात पुन्हा आणण्यात आले. सुरुवातीला खजिन्याला रिझर्व बँकेच्या मुंबई येथील मुख्यालयात ठेवण्यात आलं. २००१ साली तो दिल्लीला नेण्यात आला.

या दागिन्यांना फारच कमी वेळा लोकांसमोर आणण्यात आलं आहे. अशा प्रकारचं पाहिलं प्रदर्शन हे २००१ साली भरवण्यात आलं होतं, त्यानंतर २००६ साली दुसरं प्रदर्शन भरवण्यात आलं. त्यानंतर प्रदर्शनाचा मुहूर्त लागला तो थेट यावर्षी. तब्बल १३ वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा हा खजिना लोकांसमोर ठेवण्यात आलाय.

मंडळी, ५ मे २०१९ पर्यंत हे प्रदर्शन खुलं राहणार आहे. प्रदर्शनाचे काही नियम लक्षात घ्यायला हवेत. पहिला नियम असा, की प्रदर्शनाची वेळ ही सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंतची आहे. दुसरा नियम म्हणजे पर्यटकांचा ५० चा गट केला जातो. या गटाला अर्ध्या तास प्रदर्शन पाहता येतं.

 

तर मग केव्हा जातंय दिल्लीला ??

सबस्क्राईब करा

* indicates required