हे पाहा, आता या गोष्टीपण ऑनलाइन विकत मिळतात. तुम्हांला आणखी काय विकत घ्यायला आवडेल?

गोवऱ्या किंवा शेणकुटं म्हणजे गाईच्या वाळलेल्या शेणाचं गावाकडे तसं काहीच कौतुक नसतं. याची खरी कमतरता भासते शहरांमध्ये. शहरांमध्ये गाईगुरंच दुर्मिळ प्रकार असतो, तर गोवऱ्या म्हणजे लांबचीच गोष्ट. याचाच फायदा ई-कॉमर्स कंपन्यांनी घेतलाय मंडळी !! या गोवऱ्या चक्क ऑनलाईन विकल्या जात आहेत. या ई-कॉमर्स कंपन्यांनी दिवाळीच्या निमित्ताने ‘काऊ डंग केक’ ऑनलाईन विक्रीस ठेवले आहेत. चला तर याबद्दल आणखी माहिती घेऊया. 

मंडळी, सध्या सगळंच ऑनलाईन मिळतंय. मग दिवाळीच्या निमित्ताने पूजेच्या विधीसाठी लागणाऱ्या गोवऱ्या का मिळू नयेत? अमेझॉन, इबे, स्नॅपडील, फ्लिपकार्ट इत्यादी ई-कॉमर्स वेबसाईट्स गोवऱ्या अगदी ५०% डिस्काउंटमध्ये विकतायत. याबद्दल सांगताना अमेझॉनने म्हटलंय की दिवाळी आणि सणाच्या निमित्ताने शहरी भागातून गोवऱ्याना मोठ्या प्रमाणात मागणी असते. याशिवाय थंडीत उष्णता मिळावी म्हणूनही गोवऱ्या जाळल्या जातात.

स्नॅपडीलवर गोवऱ्या विकणारी कंपनी ‘एंजल क्रिएशन’ आणि यासारख्या आणखी कंपन्या खेड्यातून गोवऱ्या विकत घेतात. एका पॅकेट मध्ये साधारण ६ गवऱ्या असून त्यांची किंमत २०० ते ४०० रुपयांपर्यंत असते. इतर वस्तूंप्रमाणे गोवऱ्या घरपोच पाठवल्या जातात.

मंडळी, धावत्या जगात आपण एका बाजूने गावाकडच्या आठवणी जपण्याचा प्रयत्न करतोय, तर दुसऱ्या बाजूला गाव-खेड्यांचं शहरीकरण होत आहे. मात्र या सगळ्यात ई-कॉमर्स साईट्स बाजी मारून जातायत. काळाचा महिमा आहे मंडळी!

सबस्क्राईब करा

* indicates required