रात्रीच्या वेळी स्पीडब्रेकर दिसण्यासाठी मुंबईकरांनी काढलीय एक भन्नाट शक्कल, तूम्ही तुमच्याही गावात हा उपाय करू शकता !!

मंडळी, मुंबईत गाडी चालवणे म्हणजे स्पीड ब्रेकर्सशी जुळवून घ्यावे लागते. या स्पीड ब्रेकर्सवरून गाडी चालवणे म्हणजे कोणत्याही रोलरकोस्टर राईड पेक्षा वेगळा अनुभव नसतो. राव, रात्रीच्यावेळी तर समोर स्पीड ब्रेकर आहे याची कल्पनाही येत नाही. कारण तशी कोणतीही खुण तिथे नसते. आंधळी कोशिंबीर खेळत मुंबईकर गाडी चालवत असतात भाऊ. आता मुंबईच्या रस्त्यांची अशी दुरवस्था असताना शेवटी मुंबईकरांनाच यावर उपाय शोधावा लागला आहे.

रात्रीच्यावेळी रस्त्यांवर खुणांसाठी रेडियम वापरला जातो. पण हल्ली हे रेडियम मुंबईच्या रस्त्यांवर दिसत नाहीत. त्यामुळे अपघात घडतात. यावर उपाय म्हणून १५ ते २० मुंबईकर एकत्र आले आहेत. त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन मुंबईच्या रस्त्यांवर रेडियम चिकटवायला सुरुवात केली आहे.

ही कल्पना सुचली ती पंकज ठक्कर यांना. डिव्हायडर्स आणि स्पीड ब्रेकर्सवर रेडियमची सर्वात जास्त आवश्यकता असते. याचा विचार करून पंकज ठक्कर आणि त्यांच्या टीमने गोष्टींची जुळवाजुळव केली. आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी लोकांकडून पैसे गोळा केले. अनेक जणांनी यात सक्रीय सहभाग घेतला. अशा रीतीने सरकारच्या कोणत्याही मदतीशिवाय मुंबईकरांनी स्वतःच स्वतःसाठी मुंबईचे रस्ते सुरक्षित केले आहेत.

मंडळी, आज बोरीवली, कांदिवली भागातील ५० डिव्हायडरर्सवर नवे कोरे रेडियम दिसून येतात ते याच कामामुळे. पंकज आणि त्यांच्या टीमला हे काम संपूर्ण मुंबईभर पसरवायचं आहे. पुढे हेच काम भारतभर न्यायचं त्याचं स्वप्न आहे. मंडळी, या टीमने याशिवाय अनेक सामाजिक कामे केली आहेत. त्यांच्या कामाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही त्यांच्या फेसबुक पेजला भेट देऊ शकता.

“तुम्हाला समस्या दिसत असेल तर ती सोडवा, त्यासाठी सरकारच्या मदतीची वाट बघू नका.” असं या टीमचं म्हणणं आहे. काहीच दिवसापूर्वी बोरिवलीतील नागरिकांनी ट्रेनसाठी गर्दी न करता शिस्तबद्ध रांग लावली होती. त्यानंतरचा पंकज आणि त्यांच्या टीमने राबवलेला हा उपक्रम एकच गोष्ट दाखवून जातो –‘मुंबईकर त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी समर्थ आहेत.’

सबस्क्राईब करा

* indicates required