लंगरमध्ये तुम्ही नक्कीच जेवला असाल, पण गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करणाऱ्या या प्रथेची मूळ कुळकथा माहित आहे का?
मंडळी, असं म्हणतात की माणूस सगळं काही करतो ते पोटासाठी. त्याचा सगळा आटापिटा जो असतो तो दररोजच्या अन्नासाठी सुरु असतो. याला कोणीही अपवाद नाही. म्हणजे अन्नाच्या तटावर सगळेच एक. कदाचित हीच बाब अनेक वर्षांपूर्वी शिखांनी ओळखली होती. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ‘लंगर’.
लंगरचा अर्थ होतो ‘सामुदायिक स्वयंपाकघर’. लंगर या पद्धतीत सर्व जाती-धर्माचे मग ते गरीब असो वा श्रीमंत, स्त्री असो वा पुरुष एकत्र बसून जेवतात. ही पद्धतच मुळात सगळ्या लोकांना एकत्र आणण्यासाठी आहे. शीखांमध्ये प्रत्येक गुरुद्वाऱ्यात ‘लंगर’ची सोय असते. गुरुद्वाऱ्यात येणाऱ्या प्रत्येकाला एक रुपयाही न घेता अन्न दिले जाते. सुवर्ण मंदिराच्या लंगर मध्ये तर भाविक स्वयंपाकात मदतही करतात.
आज आपण जाणून घेणार आहोत ‘लंगर’चा इतिहास, लंगरची ऐतिहासिक परंपरा आणि लंगरच्या आजच्या रुपाबद्दल.....
चला तर एका जुन्या परंपरेला समजून घेऊया !!
लंगरचा इतिहास :
असं म्हणतात की लंगरची सुरुवात शिखांचे पहिले गुरु “गुरु नानक देव” यांनी केली. यासंदर्भात एक दंतकथा सांगितली जाते. लहानपणी गुरु नानक देव यांना त्यांच्या वडिलांनी काही पैसे देऊन व्यापार (सच्चा सौदा) करायला पाठवलं होतं. वडिलांची इच्छा होती की या पैशांनी मुलाने नफा कमवावा. पुढे झालं असं, की गुरु नानक यांना काही गरीब लोक दिसले. त्यांनी बऱ्याच दिवसात काही खाल्लं नव्हतं. हे बघून गुरु नानक यांनी जवळच्या सगळ्या पैश्याचं अन्न विकत घेतलं आणि ते या गरीबांमध्ये वाटलं. ते घरी परतल्यावर वडिलांनी व्यापाराबद्दल विचारलं, तेव्हा गुरु नानक म्हणाले की खरा सच्चा सौदा हा निस्वार्थ सेवेत आहे.
लंगरचं मूळ या कथेत आहे असं मानलं जातं. गुरु नानक यांच्यापासून सुरु झालेल्या या प्रथेने पुढे अधिक शिस्तबद्ध आकार घेतला. आज ती प्रथा शिखांच्या परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे. गुरु नानक यांची कल्पना अगदी साधी होती. देशातील जातीव्यवस्थेने माणसामाणसात दुरावा निर्माण केला होता. त्यामुळे एक अशी जागा हवी होती जी सगळ्यांना एकत्र आणेल. एका आख्यायिकेनुसार जेव्हा अकबर बादशहा शिखांचे तिसरे गुरु अमर सिंगजी यांना भेटायला आला तेव्हा तो सुद्धा आपलं बादशाह पद बाजूला ठेवून सर्वसामान्य माणसात जेवला होता.
मंडळी, हा झाला आख्यायिका आणि दंतकथांचा भाग. आता जाणून घेऊ इतिहास काय सांगतो ते.
लंगर पद्धतीची पाळेमुळे जाऊन पोहोचतात ती सुफी संत बाबा फरीद (११७९-१२६६) यांच्या पर्यंत. १२ ते १३ व्या शतकात चिस्ती सुफी संप्रदायात लंगर सारखीच पद्धत रूढ होती. या पद्धतीचा लिखित इतिहास हा जवाहीर अल-फरीदी या ग्रंथात सापडतो. त्याकाळी अशीच संकल्पना हिंदूंच्या गोरखनाथ संप्रदायातही रूढ होती. या संकल्पनेला वाढवण्याचं आणि त्याला प्रसिद्ध करण्याचं काम शिखांनी केलं. ज्या तत्वावर लंगर संकल्पना आधारित होती त्याला यशस्वी करण्याचं श्रेय हे शिखांनाच जातं.
लंगरचं आजचं स्वरूप :
आज लंगरची पद्धत भारताची सीमा ओलांडून जगभर पसरली आहे. काही वर्षापूर्वी इंग्लंडच्या बातमीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ती बातमी म्हणजे, इंग्लंड मधल्या बेघर लोकांनी अन्नासाठी लंगर मध्ये आसरा शोधला आहे. आजही इंग्लंड मधले गुरुद्वारे एक रुपयाही न घेता लोकांना अन्न पुरवण्याचं काम करतात. २०१७ साली मुंबईच्या पावसात अडकलेल्या प्रवाशांना अन्न पुरवण्याचं कामही लंगर मधूनच करण्यात आलं होतं. शीख समुदाय बहुसंख्येने असलेल्या जवळजवळ सर्वच ठिकाणी ‘लंगर’ दिसतोच.
भारतात किंवा आपण म्हणून जगभरात सुवर्ण मंदिरातलं (श्री हरमिंदर साहिब) लंगर सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. या लंगर मध्ये दररोज तब्बल ५०,००० माणसं जेवतात. विशेष प्रसंगी हा आकडा १ लाखापर्यंत जातो. बुफेच्या जमान्यात लंगर मध्ये आजही प्रत्येकाला खाली बसूनच जेवावं लागतं. पारंपारिक पद्धतीनुसार शाकाहारी जेवण दिलं जातं, पण याला एक अपवाद आहे. पंजाबच्या ‘आनंदपूर साहिब’ गुरुद्वाऱ्यात विशेष प्रसंगी मांसाहारही वाढण्यात येतो.
पूर्ण शीख समाज अत्यंत कामसू आणि मेहनती म्हणून जगभर ओळखला जातो. उदाहरणच द्यायचं तर तुम्हांला कुठे शीख भिकारी दिसणार नाही. अशा या समाजाने समाजाचं देणं म्हणून सुरू ठेवलेली ही पद्धत अगदी प्रशंसनीय आहे.