computer

पोळा -भारतीय कृषी संस्कृतीच्या विचारांची महती सांगणारा सण !

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सण साजरा करण्यामागे कोणता ना कोणता विचार समाजाला द्यायचा प्रयत्न आपल्या पूर्वजांनी केलेला दिसतो. म्हणजे फक्त मोठ्या सणांबद्दल नव्हे तर सर्व छोटे सण सुद्ध खूप विचार करून केले असावेत. जसं की आज बैल पोळा आहे. शहरी लोकांना याबद्दल खूप कमी माहिती असेल पण आजही महाराष्ट्र आणि इतर अजून बऱ्याच राज्यातील ग्रामीण भागात हा सण खूपच उत्साहात साजरा केला जातो.
भारत हा कृषीप्रधान देश आहे बहुसंख्य लोक आपल्याकडे शेती करतात. शेती मध्ये आज जरी अनेक आधुनिक गोष्टींचा वापर होत असला तरी पूर्वपार बैलांचा शेतीच्या कामामध्ये खूप मोठा वाटा होता. वर्षभर दमलेल्या आपल्या या शेतीमित्राला एक दिवसाचा आराम म्हणून बैल पोळा हा सण साजरा केला जातो.

 

पश्चिम महाराष्ट्रात आषाढ पौर्णिमेला  ' महाराष्ट्रीयन बेंदूर ' कर्नाटका मध्ये जेष्ठ पौर्णिमेला 'कर्नाटकी बेंदूर ' तसेच मराठवाड्या मध्ये श्रावणाच्या अमावसेला ' बैल पोळा '. ही नावं वेगवेगळी असली तरी सर्वांचा हेतू एकच बैला साठी असलेली कृतज्ञता व्यक्त करणे. 

वर्षभर शेतामध्ये काम करून दमलेल्या बैलांना यादिवशी पूर्ण विश्रांती मिळते, बैल पोळ्याच्या आदल्या दिवशी त्यांची खांदेमळणी केली जाते. खांदेमळणी मध्ये पहिल्यांदा त्याला गरम पाण्याने अंघोळ घातली जाते, ज्या ठिकाणी बैलगाडीचा जु ठेवला जातो तिथे लोणी आणि हळदीने मालीश केली जाते जेणे करुन येणाऱ्या थंडीसाठी ते नव्या जोमाने तयार होतील. फक्त बैल च नाही तर घरातील सर्व जनावरे म्हणजे गायी म्हशी यांचीही या दिवशी अशीच सरबराई करण्यात येते.

बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना खूप सजवलं जाते, त्याची शिंगे रंगवली जातात, पाठीवर सुंदर झुल घालतात, शिंगांच्या टोकांना गोंडे लावतात, गळ्यात घुंगुराची माळ घातली जाते. या दिवशी बैलांची वेसण बदलली जाते, नवीन कासरा बांधला जातो. थोडक्यात जितक्या सुंदर पद्धतीने सजवता येईल तितके सजवले जाते. आणि मग गावातून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढली जाते. प्रत्येक सुवासिनी दारावर येणाऱ्या बैलांना ओवाळतात, पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. शेतकरी बांधव या दिवशी अगदी मनोभावे बैलांची सेवा करतात. या दिवशी घरी देव्हाऱ्या मध्ये मातीच्या बैलांच्या जोडीचे प्रतिकात्मक पूजन करण्याची बऱ्याच ठिकाणी पद्धत आहे. 

आपल्या संस्कृतीमध्ये इतका आपलेपणा इतके प्रेम आहे ना जे आपल्याला सर्व प्राणीमात्रांना द्यायला शिकवले गेले आहे. रोजच्या आयुष्यात वेगळं काहीही न करता आपल्याला असे आभार मानायला शिकवलं गेलंय. खूप विचार करून हे सगळे सण परंपरा घडत गेल्या आहेत. नव्वदच्या दशकातील पिढीला याची थोडी तरी माहिती आहे पण पुढील पिढी पर्यंत पण या गोष्टी आपण पोहचवूया. आपल्या प्रत्येक सणांचं महत्व आपल्या घरातल्या लहानग्यांना सांगूया. बोभाटा परिवारा तर्फे सर्वांना बैल पोळ्याच्या शुभेच्छा.

- मोनाली कुलकर्णी

सबस्क्राईब करा

* indicates required