computer

अमेरिकेत सापडलंय शिवाजी महाराजांच्या आजोबांचं चित्र....हे चित्र अमेरिकेत कसं पोहोचलं?

मंडळी, शिवाजी महाराजांचे आजोबा लखुजीराजे जाधव (मातोश्री जिजाऊंचे वडील) यांचं एक महत्वाचं चित्र न्यूयॉर्कमध्ये सापडलं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील लखुजीराजे जाधव हे एक महत्वाचं व्यक्तिमत्व होतं. शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी १६२२ साली हे चित्र काढण्यात आलं होतं.

राव, आपल्या महाराष्ट्रातील एका महत्वाच्या व्यक्तीचं चित्र थेट अमेरिकेत कसं सापडलं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना?  त्याचं काय आहे ना, या मागे सुद्धा इतिहास आहे राव. चला तर पटपट जाणून घेऊ...

१. अमेरिकेतून हे चित्र शोधण्याचं काम इतिहासतज्ञ मनोज दाणी यांनी केलं आहे. 'मेट्रोपोलिटन म्युझियम ऑफ आर्ट' या संग्रहालयात हे चित्र सापडलं.

२. चित्राचा काळ :

या चित्राचा काळ आहे १६२२. म्हणजेच शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी ८ वर्ष. या चित्राचा चित्रकार ‘हाशिम’ असून तो व्यक्तिचित्रासाठी प्रसिद्ध होता. त्याच्या कारकिर्दीची सुरुवात अहमदनगर अथवा विजापूर येथे झाली असावी असा अंदाज आहे. तो काहीकाळ बुऱ्हाणपूर येथे होता. तो उत्तर भारत आणि दक्षिण भारतात कामानिमित्त फिरत राहिला. त्याच्या कारकिर्दीत त्याने मुघल, निजामशाही आणि आदिलशाही मधील महत्वाच्या व्यक्तींची व्यक्तिचित्रे रंगवली. तो त्याच्या चित्रातील बारकाव्यांसाठी प्रसिद्ध होता. त्यामुळे इतिहासातील त्याचं स्थान महत्वाचं आहे.

३. 'शबह-ए जादून राय दखनी अमल-ए हाशिम'

चित्राच्या तळाशी व कपड्यांवर 'शबह-ए जादून राय दखनी अमल-ए हाशिम' लिहिलेलं आढळलं आहे. याचा मराठीत अर्थ होतो दख्खनचे जाधवराव यांचं चित्र हाशिम यांनी काढलं आहे. असं म्हणतात की हे लिहिणारा दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द शहाजहान बादशहा होता.

४. हे चित्र लखुजीराजे जाधव यांचं आहे हे कसं सिद्ध झालं ?

(लुखुजीराजे यांच्या कपड्यावर असलेला 'शबह-ए जादून राय दखनी अमल-ए हाशिम' हा उल्लेख)

जादूराय अथवा जादूनराय हा लखुजीराजे जाधव यांना मिळालेला खिताब होता. हा उल्लेख ‘माथीर-ए-अलामगिरी’ या ग्रंथात आढळतो. याशिवाय ‘तुझुक-ए-जहांगिरी’ आणि शहाजहानच्या बादशाहनामा या फारसी ग्रंथातही असाच स्पष्ट उल्लेख आहे. यावरून हे चित्र लखुजीराजे यांचच असल्याचं सिद्ध झालं. 

५. 'बादशाही अल्बम'

('बादशाही अल्बम' मधील जहांगीर आणि अकबर यांचं चित्र)

'मेट्रोपोलिटन म्युझियम ऑफ आर्ट' या राष्ट्रीय संग्रहालयात 'बादशाही अल्बम' नावाचा एक संग्रह आहे. या संग्रहात मातब्बर सरदारांची चित्रे जतन करून ठेवण्यात आली आहेत. या चित्रांचा संग्रह तयार करण्याची सुरुवात जहांगीर बादशहाच्या काळात झाली. पुढे शहाजहान बादशहाच्या काळातही हे काम सुरु राहिलं. याच काळात लखुजी राजे यांचं चित्र काढण्यात आलं असावं. पुढे औरंगजेबाच्या कारकिर्दीत संग्रह पूर्ण झाला.

६. या चित्राचा प्रवास कसा झाला ?

हा संग्रह दिल्लीत होता. पुढे नादीरशहाच्या लुटीतून तो सुखरूप वाचला. १८०२ साली मराठा साम्राज्याचा अस्त होत असताना इंग्रजांनी मराठ्यांकडून दिल्ली काबीज केली. त्याबरोबर हा संग्रह आणि त्या सोबतच हे चित्र इंग्रजांच्या हाती लागलं.

७. इंग्रजांनी या संग्रहाचं काय केलं ?

(इंग्रजांनी तयार केलेल्या नवीन प्रतीतील चित्र)

हा संग्रह इंग्रजांच्या हाती लागल्यानंतर त्यांनी या मूळ संग्रहातील चित्रांची नवी प्रत तयार करण्यास घेतली. यासाठी दिल्लीतल्या चित्रकारांची मदत घेण्यात आली. यानंतर हा संग्रह इंग्रज आमदानीत दिल्लीतच राहिला.

८. भारताबाहेरचा प्रवास

पुढे कधीतरी कोण्या पाश्चिमात्य ग्राहकाने दिल्लीतल्या आर्ट डीलरकडून हा संग्रह विकत घेतला. अशा पद्धतीने हे चित्र भारताबाहेर जाऊन पोहोचलं.

 

मंडळी, महाराष्ट्राबरोबरच भारतीय इतिहासातील हे एक महत्वाचं चित्र आहे. या चित्रावरून मुघल शैली, पेहराव, हत्यारे, कलाकुसर, चित्रकला इत्यादी गोष्टींचा अभ्यास होऊ शकतो. या चित्राच्या माध्यमातून इतिहासाच्या अभ्यासात मोलाची भर पडणार आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required