computer

मोगलीची गोष्ट येण्यापूर्वीच भारतात खराखुरा एक मोगली होऊन गेला.. तुम्हांला माहित आहे का याची कहाणी?

मोगली हा आपल्या बालपणाचा सवंगडी. ९० च्या दशकात कार्टूनच्या माध्यमातून हा नवीन मित्र आपल्याला भेटला. त्यानंतर खूप वर्षांनी २०१६ साली जंगलबुक आणि यावर्षी आलेल्या ‘मोगली’ फिल्ममुळे आपण पुन्हा एकदा त्याला भेटलो. मोगली हे एक काल्पनिक पात्र असलं तरी भारतात एक खरोखरचा ‘मोगली’ होऊन गेला हे तुम्हाला माहित आहे का ? नाही ? चला मग जाणून घेऊया....

मंडळी, मोगली हे रुडयार्ड किपलिंग यांच्या ‘दि जंगल बुक’ मधलं एक प्रमुख पात्र आहे. त्याचा आणि वास्तवाशी तसा संबंध नाही. पण ज्याकाळात जंगलबुक लिहिलं जात होतं (१८९३) त्याच सुमारास भारतात एक मुलगा सापडला होता ज्याची कथा मोगलीच्या कथेशी मिळतीजुळती होती.

१८७२ साली उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर भागातल्या जंगला मध्ये काही माणसं शिकारीवर गेली होती. तेव्हा त्यांना लांडग्यांच्या घोळक्यात एक लहान मुलगा दिसला. या लहान मुलाचा सांभाळ लांडग्यांनी केला होता. अशा प्रकारच्या मुलांना ‘feral children’ म्हटलं जातं. ज्याचा अर्थ होतो ‘जंगली मूल....

शिकाऱ्यांना या मुलाचा पत्ता लागल्यानंतर त्यांनी त्याला माणसात आणण्याचं ठरवलं. तो ज्या गुहेत राहायचा तिथे त्यांनी हल्ला केला. हल्ल्यात लांडगे मारले गेले. त्यानंतर त्यांनी मुलाला आग्रा जवळील सिकंदरा मिशन अनाथाश्रमात आणलं.

अनाथाश्रमात त्याला एक नाव देण्यात आलं – दिना शनिचर.

शनिचर हा जंगलात वाढलेला आणि जंगली प्राण्यात राहिलेला असल्याने त्याला अगदी लहानसहान गोष्टी शिकवाव्या लागल्या. सुरुवात चालण्यापासून होती. तो प्राण्यांसारखं चार पायांवर चालायचा. त्याला बोलताही यायचं नाही. तो फक्त प्राण्यांचे आवाज काढायचा. त्याला सांभाळताना आश्रमातल्या माणसांच्या नाकी नऊ आले होते.

एवढं करूनही तो काही शेवटपर्यंत माणसांत आला नाही. तो कच्चं मास खायचा, चार पायावरच चालायचा, त्याचा आवाजही गुरगुरण्या सारखा होता, त्याला कपडेही नीट घालता यायचे नाहीत. बऱ्याच वर्षांनी तो नीट जेवायला शिकला, पण जेवण्यापूर्वी तो जेवण हुंगायचा.

शनिचर फक्त ३४ वर्ष जगू शकला. त्याला टीबी झाला होता. हा टीबी त्याला त्याच्या सिगरेटच्या सवयीमुळे मिळाला. आता तुम्ही म्हणाल त्याला सिगरेटचं व्यसन होतं ? तर, हो. ३४ वर्षांच्या आयुष्यात त्याने माणसांकडून हीच एक गोष्ट नीट शिकून घेतली होती.

मंडळी, शनिचरवरून रुडयार्ड किपलिंग यांना मोगलीची कल्पना सुचली का ? तर, त्याबद्दल सबळ पुरावा नाही. रुडयार्ड किपलिंग यांचा जन्म भारतात झाला. वयाच्या ५ व्या वर्षापर्यंत ते भारतात राहिले. पुढे वडिलांची नोकरी गेल्यावर ते परत भारतात आले. भारताशी असलेलं त्यांचं नातं लक्षात घेता शनिचरच्या गोष्टीवरून त्यांनी मोगली तयार केला ही शक्यता नाकारता येत नाही.

मंडळी, असं म्हणतात त्याच सुमारास शनिचर सारखी आणखी मुलं सापडली होती. त्यांचं पुढे काय झालं त्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही.

तर मंडळी, याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका !!

सबस्क्राईब करा

* indicates required