computer

या शाहजहाननेही आपल्या बेगमसाठी ताजमहाल बांधला.. वाचा याची गोष्ट...

प्रत्येक भारतीयाला आग्र्याचा ताजमहाल माहित आहेच.  पण भारतातल्या मॉडर्न शहाजहानच्या ताजमहालबद्दल माहित आहे का? फार क्वचित लोकांना याची माहिती आहे राव. भारतात एक नाही, तर दोन ताजमहाल आहेत. राव, आम्ही ‘बीबी का मकबरा’ बद्दल बोलत नाही आहोत. आम्ही बोलत आहोत ‘कादरी का ताजमहाल’ बद्दल.

‘फैझुल हुसैन कादरी’ हे मॉडर्न शहाजहान म्हणून ओळखले जात होते. ‘ओळखले जात होते’, हे यासाठी की २०१८ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या ८२ व्या वर्षी ते गेले. पण त्यांनी बांधलेला ताजमहाल आजही लोकांसाठी एक उदाहरण म्हणून उभा आहे. चला तर या ताजमहालची गोष्ट वाचूया.. पण त्या आधी हा ताजमहाल कसा आहे ते पाहून घ्या.

‘आपण मेल्यानंतर आपल्याला कोण लक्षात ठेवेल ?’ हुसैन कादरी यांनी त्यांच्या पत्नी ताजामुल्ली बेगम यांच्या या प्रश्नाला दिलेलं उत्तर म्हणजे हा ताजमहाल. फैझुल हुसैन कादरी यांना मुलं नव्हती. दोघे पतीपत्नी गावाच्या एका कोपऱ्यात एकटेच राहायचे. एकदा ताजामुल्ली बेगम यांनी ‘आपण गेल्यानंतर आपली कोण आठवण काढणार’ असं म्हटल्यावर हुसैन कादरी यांनी खिडकीकडे बोट दाखवून सांगितलं, ‘त्या समोरच्या जागेत असा ‘मकबरा’ (कबर) बांधेन की लोक वर्षानुवर्ष आपल्याला लक्षात ठेवतील.’

मंडळी, ताजामुल्ली बेगम कॅन्सरमुळे २०११ साली गेल्या. हुसैन कादरी यांनी बायकोला दिलेल्या वचनाप्रमाणे त्याच जागी पत्नीची कबर बांधली आणि आपल्याकडचा सगळा पैसा खर्च करून कबरीवर ‘ताजमहाल’ उभारायचं अवघड काम हाती घेतलं. यासाठी त्यांनी आपल्याकडचा सगळा पैसा खर्च केला. जेव्हा पैसे कमी पडले तेव्हा त्यांनी आपली जमीन विकली. ‘हा ताजमहाल बांधण्यासाठी मी कोणाकडून एक पैसाही घेतलेला नाही’ असं ते स्वतः म्हणाले आहेत.

पुढे हुसैन कादरी यांच्याकडचे सगळे पैसे संपले आणि ताजमहाल अर्धवट राहिला. तो पर्यंत २१ व्या शतकातल्या या नव्या ताजमहालची बातमी देशभर पसरली होती. हुसैन कादरी आणि त्यांच्या ताजमहालबद्दल मोठमोठ्या वृत्तपत्रांमध्ये छापून आलं. त्यानंतर अनेकांनी त्यांना आर्थिक मदत देऊ केली. एवढंच काय उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः मदतीचा हात दिला. पण हुसैन कादरी साहेब आपल्या मतावर ठाम राहिले.
 

मंडळी, आज उत्तर प्रदेशच्या ‘कसेर कलान’ गावातल्या ५,५०० स्क्वेअर फुट जागेत हा ताजमहाल काहीसा अर्धवट अवस्थेत उभा आहे. या ताजमहालला संगमरवराची भिंत नाही. काही जागी अजूनही आतल्या विटा नजरेस पडतात. अर्धवट असला तरी आपण ही वास्तू बांधू शकलो याचं हुसैन कादरी यांना समाधान होतं.

 

याच ताजमहालमध्ये आता पत्नीच्या शेजारी हुसैन कादरी यांची कबर बांधण्यात आली आहे. ही इतिहासाची पुनरावृत्ती म्हणावी लागेल. हुसैन कादरी यांचे शब्द आज खरे ठरले आहेत. दोघांचंही नाव आज इतिहासात कायमचं कोरलं गेलंय.

 

मंडळी, एक तो शहाजहान होता ज्याने म्हणे ताजमहाल बांधून झाल्यावर कामगारांचे हात कापले होते आणि एक हा शहाजहान आहे ज्याने ताजमहाल बांधण्यासाठी कोणाच्याच पुढे हात पसरले नाहीत. अशा या मॉडर्न शहाजहानला बोभाटाचा सलाम!!

सबस्क्राईब करा

* indicates required