computer

६६,००० शेतकऱ्यांनी मिळवून दिलंय भारताला आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक !!

सुवर्ण पदक म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतात ऑलेम्पीक आणि राष्ट्रकुल सारख्या खेळांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा, पण अशी ‘युनिक’ क्षेत्र आहेत जिथे सुवर्ण, रौप्य, ताम्र पदकांची कमाई होऊ शकते. आम्ही आज ज्या सुवर्णपदकाबद्दल बोलतो आहोत तो सुवर्णपदकाचा मान भारताच्या एका छोट्या राज्यातल्या ६६,००० शेतकऱ्यांनी मिळवलेल्या सुवर्णपदकाबद्दल आहे. 

फ्युचर पॉलिसी अवॉर्डस नावाच्या मोठ्या कार्यक्रमात ‘ऑरगॅनिक फार्मिंग’ म्हणजेच सेंद्रिय शेतीविषयक उत्तम कामगिरीसाठी ‘युनाटेड नेशन्स’तर्फे हे पारितोषिक दिले जाते.  आणि कोणत्या राज्यामुळे हे पारितोषिक आपल्या पदरात पडले माहिती आहे का ?

राज्याचे नाव सांगण्याआधी त्याची थोडी पार्श्वभूमी जाणून घ्या. अवघी सहा-सव्वासहा लाख इतकीच काय ती तिथली लोकसंख्या. भूभाग बघाल तर सगळा डोंगराळ. सपाट मैदानं नाहीच. म्हणजे लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे अगदीच लहानगे राज्य. पण ह्याच राज्याने सुवर्णपदक पटकावून आपल्या देशाची मान उंचावली आहे. या राज्याने फक्त उत्तम कामगिरीच केली नाहीये तर जगातील एकमेव ‘संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे राज्य’ असा दर्जा मिळवला आहे.  जगभरातून आलेल्या ५१ देशांमध्ये भारतातील ‘सिक्कीम’ ह्या छोट्याश्या राज्याने हा विक्रम नोंदवला आहे. 

ऑरगॅनिक फार्मिंग म्हणजे काय?

शुद्ध मराठीत सांगायचे तर सेंद्रिय शेती. कोणतीही घातक रसायने किंवा कीटकनाशके न वापरता, योग्य प्रमाणात सेंद्रिय खते, पाणी आणि इतर नैसर्गिक साधनांच्या वापराने केलेली शेती. सिक्किमची खासियत अशी की इथल्या सगळ्याच्या सगळ्या म्हणजे सहासष्ट हजार शेतकरी कुटुंबांनी एकत्र येऊन सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला आणि राबवला देखील. हे राज्य धान्याच्या बाबतीय पूर्णपणे स्वावलंबी ठरले आहे. सेंद्रिय शेतीमुळे सिक्कीम ‘सुजलाम् सुफलाम्’ झाले आहे.

अशी केली जाते सिक्कीममध्ये शेती-

सिक्कीमचा सगळा भाग डोंगराळ. पण डोंगरांमध्ये टप्प्या- टप्प्यावर जमीन सपाट करवून त्यावर शेती केली जाते. ‘हॉर्टिकल्चर फार्मिंग’ म्हणजेच शास्त्रशुद्ध आणि ‘सुंदर’ दिसेल अशा पद्धतीने रोपे लावून शेतकरी आपली उत्पादने घेतात. तिथल्या रोपवाटिकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची रोपे सेंद्रिय पद्धतीने वाढवून विक्रीस उपलब्ध केली जातात. वेगवेगळ्या प्रकारे तयार केलेली नैसर्गिक खतेही शेतकऱ्यांना सहज मिळतात. नैसर्गिक खतांमध्ये गांडूळ खतांचा जास्तीत जास्त वापर तिथे केला जातो. त्यासाठी चौकोनी आणि सिमेंटच्या वापराने पक्के खड्डे बनवून घरीच गांडूळ खत निर्मिती केली जाते. तसेही भारतातील मातीच्या प्रकाराला हेच खत उत्तम आहे. नाही का?

यात सरकारचं साहाय्य किती?

(सिक्कीमचे मुख्यमंत्री श्री. पवन कुमार चामलिंग)

सिक्कीमचे राज्यशासन शेतकऱ्यांना भरपूर मार्गदर्शन करते, कार्यशाळा घेते. का? तर सिक्कीमचे मुख्यमंत्री श्री. पवन कुमार चामलिंग हे स्वतः शेतकरी कुटुंबातील आहेत त्यामुळे इतर तमाम शेतकऱ्यांना स्वतः कष्ट घेऊन सेंद्रिय शेती करायला उद्युक्त करण्यामध्ये त्यांचाच मोठा वाटा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सिक्कीम राज्य हे स्वयंपूर्ण सेंद्रिय शेतीप्रधान राज्य ठरले आहे. त्यांच्याच प्रयत्नांनी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

‘ऑरगॅनिक फार्मिंग’ चे जणू दूतच बनलेल्या श्रीयुत चामलिंगची इच्छा आहे की सिक्कीमप्रमाणेच भारतातील सगळ्याच राज्यांनी सेंद्रिय शेती करावी म्हणजे  पुढच्या पिढीला रासायनिक खतांद्वारे उगवलेल्या पदार्थ खावे लागणार नाहीत. चमलिंगच्या ह्या कार्याला बोभाटाचा सलाम. 

आपणही कधी सिक्कीमच्या राजधानी गंगटोकमध्ये गेलात तर तिथल्या सेंद्रिय भाजीपाला आणि फळांच्या बाजारपेठेला नक्की भेट द्या. सेंद्रिय उत्पादनांची चव ही चाखा. आणि ‘ग्रो हेल्दी, ईट हेल्दी’ असा कानमंत्र जपायला घ्या..

सबस्क्राईब करा

* indicates required