वाचा 'जान' घेणाऱ्या 'बजरंगी भाई'ची स्टोरी !!

काही आठवड्यांपूर्वी "मुन्ना बजरंगी" या खतरनाक गुंडाचा उत्तरप्रदेशमधील बागपत जेल मध्ये खून झाला. लक्षात घेण्यासारखी घटना अशी आहे की हा खून "जेल" मध्ये झाला !! हे असं कसं घडू शकतं असा प्रश्न मनात आला असेल तर त्याला एकच उत्तर आहे ते असं की हे उत्तर प्रदेशातच घडू शकतं !!  

पूर्वांचल या उत्तर प्रदेशाच्या भागात उत्तरप्रदेशच्या पूर्व भागात मुन्ना बजरंगी सारखे अनेक गुंड उगवत असतात आणि  मावळत असतात. या भागात गुंड आणि राजकारणी दोन्हीमध्ये  काहीच फरक नसतो.  एकदा हातात बंदूक घेतली की जिवंत राहण्याची संधी फक्त दहाएक वर्षं  आणि त्यापेक्षा जास्त जगायचं असेल तर राजकारणात प्रवेश करून पुढारी व्हायचं. आता मुन्ना बजरंगी नाही पण ब्रिजेश सिंग, अतिक अहमद, मुख्तार अन्सारी सारखे अनेक नमुने आजही शिल्लक आहेत. मुन्नाने हाच रस्ता पकडला होता. थोडक्यात सांगायचं तर "हमारे गावके मिट्टीमें गन्ना, आलू, पोलीटीसन, और गुंडे पैदा होते है " याच वाक्यात सगळं काही आलं !! 

मुन्ना बजरंगी कोण होता हे थोडक्यात सांगायचं तर दबंगचा एक डायलॉग आठवा " यहां गवाह भी हम है, वकील भी हम है, और जज भी हम है "

मुंबईच्या भाषेत सांगायचं तर मुन्ना बजरंगी एक गँगस्टर, एक भाई, नामचिन गुंड होता. सगळ्या भाई लोकांची जशी टोपणनावं असतात तसं "मुन्ना बजरंगी " हे त्याचं टोपणनाव होतं . त्याचं खरं नाव  होतं  "प्रेम प्रकाश सिंग ". मुन्नाचे वडील अनेक वर्षांपूर्वी मुंबईत स्थायीक आहेत आणि लालबागमध्ये डेअरीचा धंदा चालवत आहेत पण मुन्ना मात्र  पुरे दयाल या जौनपूर जवळच्या गावातच राहीला. पाचवीत शाळा सोडल्यावर त्यानी कुस्तीचा छंद जोपासला आणि त्याचं नाव बजरंगी झालं, घरचे लोक मुन्ना म्हणायचे म्हणून "मुन्ना बजरंगी " याच नावानं त्याची ओळख कायम झाली.

गुन्हेगारीच्या जगात बजरंगीने पाऊल टाकलं ते स्वतःच्या पार्टनरचा खातमा करून ! तो जेलमध्ये असताना त्याची बायको घर सोडून मुंबईला आली आणि त्याच्याच मोठ्या भावाशी लग्न करून मोकळी झाली .
त्यानंतर राजरोस गुन्हेगारीच्या रस्त्यावरून बजरंगीची गाडी सुसाट धावायला लागली. सुरुवातीला गजराज सिंगकडून त्याने खंडणी प्रशिक्षण पूर्ण केलं. मग खंडणी वसूल करायला सुरुवात केली पण वातावरण तापल्यावर त्यानी वाराणसीला पोबारा केला. वाराणसीला बनारस हिंदू विद्यापिठात त्याचा एक मित्र होता. त्याच्या ओळखीने तो अनिल सिंग पर्यंत पोहचला. अनिल सिंग विद्यार्थीच होता पण विद्यापिठातल्या राजकारणातला भाई पण होता. थोड्याच दिवसात अनिल सिंग वाराणसीचा उपमहापौर झाला आणि बजरंगी त्याच्या सोबत फिरायला लागला. अनिल सिंगने याच काळात त्याची ओळख कृपा सिंग या गूंडासोबत करून दिली आणि कृपा सिंगने त्याला मुख्तार अन्सारीच्या सान्निध्यात आणलं त्यावेळी उत्तर प्रदेशाच्या राजकारणात  मुख्तार अन्सारी उगवता तारा होता आणि त्याच्या वाटेतला अडथळा होता ब्रिजेश सिंग ! ब्रिजेशच्या एकेका सहकार्‍याला खल्लास  करण्याचे काम बजरंगीने चोख बजावले.

ब्रिजेश सिंग (स्रोत)

बजरंगीच्या वागण्यात एक भयंकर असे क्रौर्य होते. आपला धाक कायम रहावा म्हणून त्यानी सर्व हत्या दिवसाढवळ्या बाजारात किंवा घरात घुसून केल्या. २०१३ साली वाराणसी जेल मध्ये असताना डेप्युटी जेलर अनिल त्यागीने त्याच्या थोबाडीत भडकावली होती. त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यानी अनिल त्यागीचा खून करवला.

प्रश्न असा पडतो की हे सर्व घडत असताना पोलीस मूग गिळून स्वस्थ बसले होते का ? नाही, उत्तर प्रदेश  पोलीसांचे स्पेशल टास्क फोर्स सतत त्याच्या मागावर होते पण बजरंगीचा धाकच इतका भयानक होता की पोलीसांना खबरी  मिळायच्या नाहीत. कोर्टात सगळे साक्षीदार साक्षी फिरवायचे आणि बजरंगी बाहेर पडायचा. सरते शेवटी उत्तर प्रदेश पोलीसांनी त्याचा एनकाउंटर करायचा ठरवला. हरयाणा दिल्लीच्या सिमेवर राजबीर सिंग या एनकाउंटर स्पेशालीस्टने त्याला गाठलं, चकमकीत सतरा गोळ्या बजरंगीच्या शरीरातून आरपार गेल्या आणि त्याला शवगृहात हलवलं गेलं आणि एक अतर्क आश्चर्य घडलं ..... पोस्टमार्टेम करणार्‍या डॉक्टर्ने त्याच्या शरीरावरची चादर काढली तर बजरंगी जिवंत होता. महिन्याभरातच हॉस्पीटलमधून बाहेर पडून त्याची पुन्हा एकादा जामिनावर सुटका झाली.

हा प्रकारच इतका अतर्क्य होता की त्यानंतर त्याच्या वाटेला जाण्याचे धैर्य कोणीही दाखवेना.

कृष्णानंद राय (स्रोत)

२००५ च्या आमदार कृष्णानंद राय हत्येनंतर हवा इतकी तापली की त्यानी वाराणसी सोडून थेट मुंबई गाठली. मुंबई पोलीसांच्या धाकाने त्यानी वाराणसीशी सर्व संबंध तोडून टाकले आणि चार वर्षं गुपचुप मुंबईत गप्प बसून होता. पण या दरम्यान मुख्तार अन्सारीने राजकारणात पूर्णवेळ प्रवेश केला आणि गुन्हेगारीच्या विश्वातून अंग काढून घ्यायला सुरवात केली. या शुध्दीकरणानंतर त्यानी बजरंगीला पैसा पुरवणं बंद केलं आणि त्यानी पुन्हा एकदा गुन्हेगारीची सूत्रे हलवायला सुरुवात केली. 

पण काळ बदलला होता, मुन्ना बजरंगी आता  कोणालाच नको होता, त्याचे साथीदार राजकारणात मोठ्या पदावर गेले होते. त्यांना बजरंगीच्या मदतीची गरज नव्हती. नव्या टोळ्या अस्तित्वात आल्या होत्या, त्यांना मुन्ना बजरंगीची गरज नव्हती.

उरला एकच रस्ता, राजकारणात जाण्याचा !  पण त्यासाठी गुन्हेगारी बंद करून शुध्दीकरणाचा रस्ता त्याला मिळाला नाही. राजकीय आश्रय संपला होता. खटले वेगाने कोर्टात उभे राहीले होते. जामीन मिळणं कठीण झालं होतं, शेवटचा रस्ता एकच होता तुरुंगात राहून गँग चालवण्याचा पण तुरुंगात त्याची सत्ता नव्हती. आतला डॉन होता सुनील राठी आणि त्यानेच मुन्ना बजरंगीला गोळ्या घातल्या. माफीया बॉस संपतात, डॉन मरून जातात, गँग वॉर होतात, जुन्या गँग संपतात पण गुन्हे संपत नाहीत. आता पुढचा प्रश्न विचाराल की हा सुनील राठी कोण, तर हे तुम्हाला आम्ही सांगणार नाही कारण तुम्हाला मुन्ना बजरंगीची कहाणी सांगायचीच नव्हती. तुम्हाला सांगायचं होतं ते असं की उत्तर प्रदेशची ही कहाणी ऐकल्यावर तुम्ही नक्कीच देवाचे आभार मानाल की आपण देशातील सर्वात सुरक्षीत राज्याचे म्हणजेच महाराष्ट्राचे रहिवासी आहोत.

सबस्क्राईब करा

* indicates required