अपंगत्वावर मात करणारे हे शिक्षक आहेत तरी कोण ? वाचा व्हायरल फोटो मागची कहाणी !!

जिद्द असेल तर कोणतंही संकट तुम्हाला तुमचं स्वप्न साकार करण्यापासून थांबवू शकत नाही. मग ते संकट शारीरिक अपंगत्व का असेना. संजय सेन हे याचंच एक उदाहरण. शारीरिक अपंगत्व असूनही त्यांनी शिक्षक बनण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलंय. ते वर्गात शिकवत असतानाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर देशभर त्यांची चर्चा सुरु झाली आहे. चला त्यांच्याविषयी थोडी माहिती घेऊया.  

अनिता चौहान नामक ट्विटर युझरने संजय सेन यांचा फोटो पोस्ट केला होता. फोटो खाली त्यांनी दिलेली माहिती वाचून तर आणखी मोठा धक्का बसला. यानंतरच हा फोटो व्हायरल झाला.

२००९ पासून संजय सेन राजस्थानच्या सरकारी शाळेत शिकवत आहेत. राजस्थान सरकारच्या शिक्षा संबल प्रकल्पांतर्गत त्यांना शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. संजय सेन कोणत्याही साधनाशिवाय शिकवतात त्यामुळे त्यांचं जास्त कौतुक होतंय. त्यांच्याकडे साधी व्हीलचेअर सुद्धा नाही. २००९ पासून ते याच पद्धतीने शिकवत आहेत.

‘शिक्षा संबल प्रकल्प’ काय आहे ?

शिक्षा संबल प्रकल्प हा एक शैक्षणिक प्रकल्प आहे. सामान्यपणे विद्यार्थ्यांना इंग्रजी, विज्ञान आणि गणित हे विषय कठीण जातात. याच कारणाने काही मुलं नापासही होतात. या तीनही विषयांची चांगली तयारी करून घेण्यासाठी शिक्षा संबल प्रकल्पाला उभारण्यात आलंय. हा प्रकल्प सध्या राजस्थानच्या प्रमुख शहरांमधील ५५ शाळांमध्ये राबवला जातोय. या प्रकल्पाला यशही आलं आहे.

मंडळी, जिद्दीने स्वप्न पूर्ण करणारे संजय सेन आणि त्यांना मदतीचा हात देणाऱ्या शिक्षा संबल प्रकल्पाला बोभाटाचा सलाम !!

सबस्क्राईब करा

* indicates required