computer

काय हा चक्रमपणा !! हे महाशय ४ कोटींची गाडी खड्ड्यात पुरून टाकणार होते !

श्रीमंत लोक कधी काय चक्रमपणा करतील याचा नेम नाही आणि ते नाही तर दुसरं कोण करणार हो ? तर आजची गोष्ट अशाच एका व्यक्तीची आहे ज्याने स्वतःची तब्बल चार कोटींची गाडी चक्क खड्ड्यात दफन करायचं ठरवलं.कोण होता हा इसम ?

तर या माणसाचं  त्याचं नाव चीकीनो स्कारपा ! हा ब्राझीलचा एक गर्भश्रीमंत प्रसिद्ध उद्योगपती! सप्टेंबर २०१३ मध्ये त्याने जाहीर  केलं की त्याच्या अत्यंत महागड्या गाड्यांपैकी एक- 'बेंटले फ्लाईंग स्पर' कार तो घराच्या बागेत दफन करणार आहे.बरं इतकं सांगून थांवायचं ना पण हा गडी सोशल मिडियावर वारंवार येऊन एकच गोष्ट सांगायचा की अमुकतमुक तारखेला मी माझी 'बेंटले फ्लाईंग स्पर' पुरून टाकणार आहे,तुम्हाला उत्सुकता असेल तर तुम्ही पण या कार्यक्रमाला !

या विचित्र बातमीने जगभरातील प्रसिद्धी सर्वच माध्यमांचे लक्ष वेधून घेतलं.सोशल मिडियावरचे लोक चेकाळून त्याच्या मूर्खपणाची जाहिरात करायला लागले. या योजनेवर लोकं आपली मत मांडू लागली. लवकरच इंटरनेटवर चर्चा होणारा हा सगळ्यात मोठा चर्चेचा विषय बनला. 
प्रसारमाध्यमांनी त्याला गाठून  या मागचं (हणजे या आचरटपणाचं ) कारण विचारलं. पण त्याने दिलेलं कारणही अचंबित करणारं होतं. त्यानं सांगितलं की इजिप्शियन संस्कृतीने तो खूपच भारावून गेला आहे. ह्या संस्कृतीमध्ये मृत्यूनंतरच्या जीवनासाठी सोने, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तू दफन करून ठेवल्या जातात जेणेकरून त्या मृत्यू पश्चात स्वर्गात वापरता येतील. त्याला त्याची प्राणप्रिय गाडी मृत्यु पश्चात वापरायची होती आणि म्हणूनच तो तिला आधीच दफन करून ठेवत होता.

त्याच्या या उत्तरावर जगभरातून तीव्र प्रतिक्रिया आल्या.बऱ्याच जणांनी त्याचं मानसिक संतुलन ठीक नाहीये असं म्हणलं.कार पुरण्यापेक्षा धर्मदाय संस्थेला दान करावी असंही काही जणांच मत होतं.कित्येकांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला की वस्तू मरणोत्तर सोबत नेता किंवा वापरताही येत नाहीत.या सगळ्यांकडे साफ दुर्लक्ष करत स्कारपाने आपली मोहीम चालूच ठेवली. तो दररोज दफनविधीच्या तयारीचे फोटो सोशल मीडियावर देत राहिला.दफनविधीसाठी त्याने प्रसारमाध्यमांनाही आमंत्रित केलं. आता या बातमीने जगभरात खळबळ उडवून दिली होती.

 

ठरलेल्या दिवशी स्कारपाने सगळ्या प्रसिद्धी माध्यमांसमोर त्याची आवडती गाडी दफनविधीसाठी केलेल्या खड्ड्यात उतरवली. जमलेले सगळे त्याला पुन्हा पुन्हा सांगत होते की मरणोत्तर ह्या वस्तू तुझ्या सोबत येणार नाहीत. हाच तो क्षण होता जेव्हा स्कारपाने गाडी खड्याबाहेर काढली.....आणि तो म्हणाला "

ह्या महागड्या कार पेक्षाही मौल्यवान असे मानवी अवयव सुद्धा मरणाऱ्या माणसाच्या उपयोगाचे नाहीत. पण आपण तर ते पुरून टाकतो. त्यापेक्षा ते अवयव जर दान केले तर कित्येक जणांचे प्राण वाचतील. कित्येक लोक वैद्यकीय कारणांमुळे अवयव प्रत्यारोपणाची वाट पाहत असतात आणि आपण मात्र हे शरीर दफन करतो. त्याऐवजी आपण निरोगी अवयव दान करून अनेक जीव वाचवू शकतो. जीवनदान देणाऱ्या अवयवांच्या तुलनेत माझी गाडी अगदीच निरुपयोगी आहे. अवयव दान हे कित्येक जणांना जीवनदान देईल म्हणूनच अवयव दाता बना आणि ह्याची कल्पना तुमच्या घराच्या देऊन ठेवा."
तिथेच स्कारपाने सगळ्यांसमोर अवयव दानाचा फॉर्म भरला.त्याच्या ह्या आगळ्यावेगळ्या मोहिमेचा जगभरात खूपच चांगला परिणाम दिसला.प्रत्यक्ष अवयव दात्यांची संख्या ३१.५% वाढली. याशिवाय जगभरात अवयवदान जनजागृती मोहिमांना वेग आला.

आता मानवी अवयवांचे दान हा विषय आपल्याकडे पण नवा नाही.काहीच दिवसांपूर्वी अवयव दानाची महती सांगणारे उदीत नारायणचे अंगदान करले रे मानव तू ईश्वर बन जाएगा... गाणे तुम्ही ऐकलेत का ? नसेल ऐकलेत तर आता ऐकाच ! हो, सगळ्यात महत्वाचे म्हणजे सध्या अधिक महीना सुरु आहे, या महीन्यात काहीतरी दान द्यायचे असते. चला तर ,भरा तुमचा ऑर्गन डोनेशनचा फॉर्म ! सोबत बोभाटाचे एक मित्र वैभव ऐवळे यांनी यावर्षी आषाढी वारीत या विषयाचा प्रचार केला होता. त्यावर आपला एक लेख आहे तो पण वाचा.

-लेखिका:पद्मिनी ढवळे

सबस्क्राईब करा

* indicates required