computer

जगातल्या इतिहासात झालेली ६ महायुद्धे, यातली किती भारतीय सैनिकांनी लढली पाहा

‘बहलोलखानास मारल्याशिवाय रायगडी तोंड दाखवू नये’ असा खलिता शिवाजी महाराजांकडून मिळाल्यानंतर प्रतापराव गुजर यांनी एका अभूतपूर्व लढाईत स्वतःला झोकून दिलं. बहलोलखानच्या १५ हजार सैन्याविरुद्ध विरुद्ध प्रतापराव गुजर आणि त्यांचे ६ सहकारी असं हे कमालीचं तफावत असलेलं युद्ध होतं. या युद्धाचं वर्णन कुसुमाग्रज यांनी ‘कोसळल्या उल्का जळत सात दरियात. वेडात मराठे वीर दौडले सात...’ असं केलं आहे. त्यांनी केलेलं वर्णन अगदी सार्थ आहे.

या ऐतिहासिक युद्धाची आठवण येण्यामागचं कारण म्हणजे नुकतंच केसरी या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. या सिनेमाचा विषय आहे सारागढीची लढाई. २१ शीख सैनिक विरुद्ध तब्बल १० हजार अफगाणी सैन्य असं हे युद्ध होतं. शीख सैन्याने शौर्याचा अभूतपूर्व नमुना या युद्धात दाखवून दिला होता. या अवघ्या २१ जणांनी ६०० अफगाणी सैनिकांना स्वर्ग दाखवला यावर आज कोणाचा विश्वास बसणार नाही.

मंडळी, इतिहासात अशा लढाया फार कमी पाहायला मिळतात. आजच्या लेखात आपण इतिहासातील अशाच निवडक लढायांच्या कथा वाचणार आहोत. या लढायांनी माणसाच्या जगण्याची जिद्द आणि शौर्याची उंची दाखवून दिली आहे

१. स्टालिनग्राडची लढाई

स्टालिनग्राडच्या लढाईने आपल्याच माजात असलेल्या नाझी सैन्याला हवेतून जमिनीवर खेचलं आणि दुसऱ्या महायुद्धाचा नवीन इतिहास लिहिला. असं म्हणतात की रशियावर आक्रमण करण्याचा निर्णय हा हिटलरच्या आयुष्यातील सर्वात चुकीचा निर्णय होता. हे स्टालिनग्राडच्या लढाईकडे बघून आपण समजू शकतो.

रशियाची राजधानी मॉस्कोवर हल्ला करण्याचा हिटलरचा बेत निसर्गाने हाणून पडला. अर्ध्याहून अधिक नाझी सैन्य मरण पावले तर काहींवर अक्षरशः वेड लागण्याची पाळी आली. नाझी सैन्याला रशियन थंडीची कल्पनाच आली नव्हती. साधं मांस कापायला करवत वापरण्यात आलं होतं, यावरून तुम्हाला तिथल्या थंडीचा अंदाज येईल.

हे सगळं घडत असताना हिटलरने स्टालिनग्राडवर हल्ला करण्याची आणखी एक आत्मघातकी योजना आखली. त्याला स्टालिनग्राडवर ताबा मिळवून मॉस्कोवर हल्ला करायचा होता. १७ जुलै १९४२ ला या युद्धाला तोंड फुटले. २ फेब्रुवारी १९४३ पर्यंत ही लढाई सुरु होती. ही लढाई स्टालिनग्राडच्या अगदी गल्लोगल्ली लढली गेली. शत्रूला ठेचायला सामान्य रशियन जनताही लढत होती. आजवरचा इतिहास असा सांगतो की जिथे सामान्य जनता लढते तिथे विजय पक्का असतो. २,७०,००० नाझी सैन्याविरुद्ध १,८७,००० रशियन सैनिक अशा या लढाईत शेवटी नाझी पराभूत झाले. हिटलरच्या पराभवाला अशा प्रकारे सुरुवात झाली.

२. थर्मोपिलाईचे युद्ध

हॉलीवूडचा ‘300’ हा सिनेमा बघितला आहे ? तीच ही लढाई. सिनेमात लढाईचं वर्णन काहीसं पौराणिक कथेच्या अंगाने करण्यात आलंय. तसं पाहायला गेलं तर पौराणिक ग्रीक कथा वाटावी अशीच ही लढाई होती. स्पार्टाचा राजा लिओनायडस आणि ३०० स्पार्टन सैनिक पर्शियन आक्रमकांवर तुटून पडले होते.

वर्ष होतं इसविसनपूर्व ४८०. ग्रीसच्या शेजारी पर्शिया हे एक बलाढ्य राज्य होतं. पर्शिया शेजारील अथेन्स आणि स्पार्टा म्हणजे अगदीच लहान राज्य होती. पर्शियाचा राजा झक्सिसने या लहानशा राज्यांना हस्तगत करण्यासाठी त्यांच्यावर आक्रमण केलं. सिनेमात दाखवल्याप्रमाणे ही लढाई थर्मोपिलाईच्या खिंडीत झाली होती. खिंडीत गाठून लाखोंच्या सैन्याला मारण्याचा बेत तसा शौर्याचा असला तरी मरण निश्चित होते. ३०० सैनिकांनी आणि स्वतः लिओनायडसने अंगात प्राण असे पर्यंत लढा दिला. भाल्याचे तुकडे तुकडे झाले असतानाही उरलेल्या भाल्याने सैनिक शत्रूशी लढत होते. शेवटी पर्शियानांच्या बलाढ्य संख्याबळामुळे स्पार्टा पराभूत झाले. मात्र या लढाईत आजही स्पार्टाच्या ३०० सैनिकांचं नाव गर्वाने घेतलं जातं.

३. प्लासीची लढाई

इंग्रजांचं भारतावर केव्हा राज्य सुरु झालं ? तर उत्तर आहे प्लासीच्या लढाईनंतर. इंग्रजांनी जिंकलेली ही पहिली प्रमुख लढाई होती. तसं पाहायला गेलं तर ही लढाई इंग्रज विरुद्ध फ्रेंच अशीही होती. इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी बंगालचा नवाब सिराज उद्दौला आणि फ्रेंच सेना एकवटल्या होत्या. सिराज उद्दौलाची फौज तशी मोठी होती, पण इंग्रजांनी आपल्या ‘फोडा आणि राज्य करा’ची पद्धत या युद्धात वापरली आणि इतिहासच बदलला.

सुराज उद्दौलाचा सेनापती मीर जाफरला इंग्रजांनी फितवले होते. ऐन युद्धात सेना जवळ असतानाही मीर जाफर बंगालच्या सेनेची कत्तल बघत मैदानापासून लांब उभा होता. फ्रेंच आणि बंगालचं सैन्य मोठं असूनही इंग्रज जिंकले. या लढाईने संपूर्ण बंगाल प्रांत इंग्रजांच्या हातात गेला. आधुनिक भारताच्या इतिहासात या लढाईला अनन्यसाधारण महत्व आहे.

 

आणखी वाचा :

दुर्गापूजेचा आणि प्लासीच्या लढाईचा काय आहे संबंध ? वाचा दुर्गापूजेचा रंजक इतिहास !!

४. नॉर्मंडीची लढाई.

१९४४ पर्यंत दोस्त राष्ट्र आणि जर्मन, इटालियन या शत्रू सैन्यांमध्ये अटीतटीची लढाई सुरु होती. याच काळात नॉर्मंडीत झालेली लढाई ही निर्णायक समजली जाते. नॉर्मंडी हा फ्रान्सच्या उत्तर भागात इंग्लिश खाडी नजीक वसलेला प्रांत आहे. या भागातून दोस्त राष्ट्रांनी आपलं सैन्य फ्रांस मध्ये घुसवण्यास सुरुवात केली. याच मोहिमेच्या दरम्यान नॉर्मंडीची लढाई झाली.

नॉर्मंडीत दोस्त राष्ट्र (अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स या राष्ट्रांनी मिळून बनलेलं सैन्य) येण्यापुर्वीच नाझी सैन्याने तिथे ठाण मांडलं होतं. ६ जून १९४४ रोजी दोस्त राष्ट्रांनी १,६०,००० सैनिक नॉर्मंडीत उतरवले.  पुढे ऑगस्ट पर्यंत दोस्त राष्ट्राचे २०,००,००० सैनिक नॉर्मंडीत उतरले होते. या लढाईने नाझी सैन्याला माघार घ्यावी लागली. नॉर्मंडी पासून सुरु झालेली ही मोहीम हिटलरच्या अंतापर्यंत सुरु होती.

नॉर्मंडीच्या लढाईवर बनलेला ‘सेव्हिंग प्रायव्हेट रायन’ हा सिनेमा आजवरचा युद्धावर आधारित सर्वोत्कृष्ट सिनेमा मानला जातो.

५. झेलमची लढाई

या लढाईबद्दल कोणाला फारसं माहित नाही. जगज्जेता अलेक्झांडर आणि भारतीय राजा पुरू (पोरस) यांच्यामध्ये झालेलं हे एक महत्वाचं युद्ध होतं. पुरू हा भारताच्या उत्तर पूर्वेकडचा एक प्रबळ राजा होता. झेलम आणि चिनाब नदीच्या भागात त्याचं राज्य होतं. अलेक्झांडर भारतात आला आणि त्याने सिंधू नदीच्या प्रदेशातील राज्यांना शरण येण्याची सूचना दिली. पुरूने ही सूचना धूडकावून लावली. उलट आपण युद्धासाठी सज्ज आहोत असं खणखणीत उत्तर दिलं होतं.

हे सर्व घडत असताना पुरूच्या शेजारच्या राजा अंभीने अलेक्झांडरशी हातमिळवणी केली होती. या नव्या युतीमुळे पुरूच्या शत्रूंमध्ये वाढ झाली. शिवाय पुरूने ज्या ज्या राजांकडून मदत मागितली त्या सर्वांनी आधीच अलेक्झांडर पुढे गुडघे टेकले होते. पुरू या लढ्यात एकटा पडला.

झेलमच्या दोन्ही तीरावर सैन्याची जमवाजमव झाली. पुरूचं व्यूहरचना कौशल्य बघून अलेक्झांडरची सेनाही स्तिमित झाली होती. झेलम नदीच्या उथळ पत्राचा अंदाज घेऊन अलेक्झांडरच्या सैन्याने पुरूच्या सैन्यावर आक्रमण केलं. तिथून युद्धाला तोंड फुटले. या युद्धात पुरुची २ मुले व सिनेपती मारले गेले. तो स्वतःही जखमी अवस्थेत अलेक्झांडरच्या सैन्याच्या हाती लागला.

जखमी पुरूला जेव्हा अलेक्झांडर पुढे उभं करण्यात आलं तेव्हा अलेक्झांडरने त्याला विचारलं की ‘मी तुला कसे वागवावे ?’. यावर पुरू म्हणाला ‘एक राजा दुसऱ्या राजाला जसे वागवतो तसे’. या उत्तराने पुरूने अलेक्झांडरवर आपली छाप पाडली. त्यानंतर अलेक्झांडरने पुरूला त्याचं राज्य तर परत केलंच, शिवाय स्वतः जिंकलेला भारताचा भूभागही पुरूला बहाल केला. अखेर अलेक्झांडर जिंकला असला तरी खरा विजय हा पुरूचा झाला होता.

६. सारागढीची लढाई

सारागढीची लढाई जीवावर उदार होऊन लढलेल्या मोजक्या लढायापैकी एक आहे. २१ शीख सैनिक विरुद्ध तब्बल १०,००० पख्तून ओराकझाई (अफगाणी) सैन्यामध्ये ही लढाई झाली. या लढाईची पार्श्वभूमी थोडी समजून घेऊ.

सारागढी हे गाव आजच्या पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा भागात आहे. या भागाजवळून अफगाणिस्तानचा मुलुख सुरु होतो. हा सीमावर्ती भाग सुरुवातीपासून अशांत होता. या भागातून वेळोवेळी अफगाणी हल्लेखोर ब्रिटिशांवर हल्ले करायचे. या हल्ल्यांना थोपवण्यासाठी ब्रिटिशांनी आपली ३६ वी शीख बटालियन समाना हिल्स, कुराग, संगर, सहटॉप धर आणि सारागढी या भागात तैनात केली.

सैन्याची ठाणी किल्ल्यांवर होती. हे तेच किल्ले होते जिथे एकेकाळी पंजाबच्या राजाने राज्य केले होते. आणि आता अशी वेळ आली होती की शीख सैनिक ब्रिटीशांच्या सैन्यात नोकरी करत होते. असो.

तर, ठाणी स्थापन झाल्यानंतर ३६ व्या शिख बटालियनने अफगाणी सैन्याचे बरेच हल्ले परतवून लावले. अफगाणी सैन्याचं मुख्य लक्ष हे किल्ला हस्तगत करण्यावर होतं. १८९७ च्या ऑगस्ट पासून हे हल्ले होत होते. १२ सप्टेंबर १८९७ रोजी झालेली लढाई अशाच एका हल्ल्याच्या विरुद्धची लढाई होती. पण हा हल्ला त्यावेळचा सर्वात मोठा हल्ला होता, कारण १०,००० अफगाणी सैन्य सारागढीवर चालून गेले होते. या लढ्याची आज उपलब्ध असलेली सगळी माहिती ही लढ्यात मृत्युमुखी पडलेल्या गुरमुख सिंगने ब्रिटिशांना पाठवलेल्या संदेशांच्या आधारे आपल्याला मिळते..

(३६ वी शीख बटालियन)

सारागढी चौकीची जबाबदारी ही इशर सिंग यांच्यावर होती. १२ सप्टेंबर रोजी हल्ला झाल्यानंतर ब्रिटिशांनी त्यांना माघार घ्यायला सांगितलं होतं, पण या पठ्ठ्याने प्राण जाई पर्यंत लढण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या तुकडीतील इतरांनी साथ दिली. अशा प्रकारे २१ जणांनी १०,००० अफगाणी सैन्याच्या विरुद्ध दिलेला हा अभूतपूर्व लढा ठरला.

या लढाईत सर्व २१ जण मारले गेले. पुढच्या दोनच दिवसात ब्रिटिशांनी पुन्हा तो भाग जिंकून घेतला. युद्धात धारातीर्थी पडलेल्या २१ जणांना मरणोत्तर ‘भारतीय ऑर्डर ऑफ मेरिट’ हा त्यावेळचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार देण्यात आला. आजही १२ सप्टेंबर हा दिवस ‘सारागढी दिन’ म्हणून साजरा केला जातो.

 

 

मंडळी, शौर्य म्हणजे काय हे आपल्याला या युद्धांकडे बघून समजतं.

सबस्क्राईब करा

* indicates required