f
computer

भारतात पहिल्यांदाच धावणार इंजिन नसलेली ट्रेन...या ६ गोष्टी जाणून घ्या !!

गाडी म्हणजे त्यात इंजिन असणार हे आपण गृहीतच धरतो. पण आता भारतात पहिल्यांदाच चक्क इंजिनविरहित ट्रेन धावणार आहे. या ट्रेनचं नाव आहे ट्रेन-१८. २०१८ मध्ये बनवण्यात आल्याने नावात ‘१८’ क्रमांकाचा समावेश आहे.

आजवर इंजिनविरहित ट्रेन्स मेट्रो नेटवर्कचा भाग म्हणून फक्त मोठ्या शहरांमध्ये धावायच्या, पण आज पासून पहिल्यांदाच इंजिनविरहित  सेमी-हाय स्पीड ट्रेन शहरांतर्गत धावणार आहेत. ट्रेन-१८ ची आजपासून तपासणी सुरु होईल. तपासणी पूर्ण झाल्यावर ट्रेनला प्रवाशांच्या सेवेत रुजू करण्यात येईल. ट्रेन-१८ जर परीक्षणात पास झाली तर भविष्यात राजधानी आणि शताब्दीसारख्या ट्रेन्सची जागा येईल.

ट्रेन-१८ बद्दल आणखी जाणून घेण्यापूर्वी इंजिन नसलेली ट्रेन कशी चालते हे समजून घेऊया...

प्रत्येक मुंबईकर हा इंजिन नसलेल्या ट्रेन मधून प्रवास करतो. ही ट्रेन म्हणजे आपली मुंबईची ‘लोकल’ राव. एक्स्प्रेस किंवा शताब्दी मध्ये जे भलमोठं इंजिन असतं त्यावरच सगळ्या ट्रेनचा भार असतो. तसा तो लोकल ट्रेनला नसतो. आपली लोकल ट्रेन किंवा इंजिनलेस ट्रेन्समध्ये EMU (Electric multiple units) पद्धत वापरली जाते. अशा ट्रेन मध्ये एकच एक इंजिन नसून प्रत्येक डब्याला स्वयंचलित प्रणाली जोडलेली असते. या प्रणालीला सेल्फ प्रोपेल्ड म्हणतात. EMU च्या शोधामुळे लोकोमोटिव्हची गरज संपली. त्यामुळेच लोकलला एक्स्प्रेस ट्रेन सारखं भलामोठं इंजिन जोडलेलं नसतं.

तर, ट्रेन-१८ ही पहिलीच सेल्फ प्रोपेल्ड प्रणालीवर चालणारी भारतीय ट्रेन आहे. चला तर आता जाणून घेऊया ट्रेन-१८ बद्दल ६ महत्वाच्या गोष्टी :

१. ट्रेन-१८ शताब्दी एक्स्प्रेसची जागा घेणार असून शताब्दीपेक्षा १५ टक्के जास्त वेगाने धावू शकेल असा दावा करण्यात येतोय. ट्रेन-१८ मेक इन इंडियाच्या अंतर्गत चेन्नईच्या इंटेग्रल कोच फॅक्टरी मध्ये तयार करण्यात आली आहे. एक ट्रेन तयार करण्यासाठी तब्बल १०० कोटी रुपयांचा खर्च आला आहे भाऊ.

२. ट्रेन-१८ मध्ये १६ डबे असतील. हे सर्वच डबे वातानुकुलीत असणार आहेत. प्रवाशांना WiFi सह मनोरंजनाच्या आणखी सुविधा दिल्या जातील. ट्रेन मध्ये प्रत्येक डब्यात CCTV कॅमेऱ्यांची कडक नजर असणार आहे. प्रवाशांची माहिती मिळावी म्हणून एक विशिष्ट GPS सिस्टम पण असेल.

३. ट्रेन-१८ मधल्या १६ डब्यांपैकी २ डबे एक्झिक्युटीव्ह (कार्यकारी) कंपार्टमेंट असतील. उरलेल्या १४ डब्यांमध्ये नॉन-एक्झिक्युटीव्ह प्रवासी असतील. एका एक्झिक्युटीव्ह कंपार्टमेंट मधून ५६ प्रवाशी प्रवास करू शकतात तर एका नॉन-एक्झिक्युटीव्ह कंपार्टमेंट मधून ७८ प्रवाशी प्रवास करू शकतात.

४. याखेरीज ट्रेन-१८ मध्ये स्वयंचलित दारे असतील जी स्थानक आल्यावर अपोआप उघडली जातील. दोन डब्यांना जोडणारा भागही अशाच ऑटोमॅटिक दरांनी जोडलेला असेल, ज्यामुळे प्रवाशांना एका डब्यामधून दुसऱ्या डब्यात सहज जाता येईल. यासोबतच ट्रेन मध्ये टच-फ्री बाथरूम फिटिंग सह शून्य डिस्चार्ज बायो-व्हॅक्यूम शौचालय असणार आहेत.

(इंटेग्रल कोच फॅक्टरी)

५. ७ नोव्हेंबर पर्यंत दिल्लीला जाण्याच्या अगोदर आजपासून चेन्नईच्या इंटेग्रल कोच फॅक्टरी भागात ट्रेनची तपासणी केली जाणार आहे. परीक्षणात ब्रेक सिस्टम, एसी (A/C) आणि इतर सिस्टीम्स तपासल्या जातील. यानिमित्ताने ट्रेन-१८ आज पहिल्यांदाच रुळावर धावेल.

६. चेन्नई मधून ट्रेनला मुरादाबाद-बरेली भागात १५० किलोमीटर प्रती तास वेगाच्या परीक्षणासाठी काही काळासाठी आणण्यात येईल. शेवटच्या परीक्षणात कोटा ते सवाई माधोपूर दरम्यान १६० प्रती तास वेगाची तपासणी केली जाईल. खरं तर ट्रेन-१८ साठी १६० प्रती तासाची स्पीड काहीच नाही. राव, ट्रेन-१८ ची जास्तीतजास्त गती २२० प्रती तास आहे.

 

तर मंडळी, भारतात ट्रेन-१८ सारखी तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशी ट्रेन तयार झाली आहे याचा आनंद तर आहेच. पण, तेजस एक्स्प्रेस सोबत जे झालं ते ट्रेन-१८ सोबत होऊ नये म्हणून आता प्रवाशांनीच काळजी घ्यायला हवी. बरोबर ना ?

 

आणखी वाचा :

चोरांची तेजस भरारी...प्रवाश्यांनी डझनभर हेडफोन्स वर मारला डल्ला !!!

टर्मिनस, सेन्ट्रल, जंक्शन मधला फरक माहित्ये का ?

चादरी, ब्लँकेट्स, टॉवेल्स, खिडक्या, नळाच्या तोट्या...पाहा बरं भारतीयांनी रेल्वेच्या किती कोटींवर डल्ला मारलाय ?

रेल्वेचे ब्रेक कसे काम करतात माहित आहे का ?

रेल्वेच्या डब्यावर हे नंबर का असतात भाऊ ? काय आहे या मागील लॉजिक ?

नागपूरकरांनो, नागपूर रेल्वे स्थानकाबद्दल या गोष्टी माहित आहेत का ?

बघा चायनीज इंजिनिअरींगची कमाल : १९ मजली इमारतीतून जाते रेल्वे !

फक्त एका मुलीसाठी ही रेल्वे इतकी वर्षं का धावली ?

 

सबस्क्राईब करा

* indicates required