computer

कार, बाईक, फूड डिलिव्हरी नंतर उबर घेऊन आलं आहे 'बोट सर्व्हिस'...भाडं किती आहे बघा !!

मांडवा जेट्टी, एलिफंटा किंवा अलिबागला फिरायला जाण्याचा प्लॅन असेल तर उबरने तुमच्यासाठी एक खुशखबर आणली आहे राव. टॅक्सी, बाइक आणि फूड डिलिव्हरी सर्व्हिस नंतर उबर ‘बोट सेवा’ सुरु करणार आहे. उबरच्या बोट सर्व्हिसने तुम्ही अवघ्या २० मिनिटात प्रवास पूर्ण करू शकता. काय आहे ही बोट सेवा, कसं बुक करायचं आणि पैसे किती लागतील ? चला सगळ्या प्रश्नाची उत्तरं समजून घेऊया.

उबरच्या नव्या सर्व्हिसचं नाव आहे UberBOAT. हे उबरची टॅक्सी बुक करण्या इतकंच सोप्पं आहे. app ने आपण बोट बुक करू शकतो. उबरने दोन प्रकारच्या बोटी तयार केल्या आहेत. एक आहे UberBOAT आणि दुसरी आहे UberBOAT XL. UberBOAT मधून एकावेळी ६ ते ८ प्रवासी प्रवास करू शकतात, तर UberBOAT XL मधून १० प्रवाशांना प्रवास करता येऊ शकतो.

मंडळी, ‘उबर बोट’ सेवेसाठी उबरने ‘महाराष्ट्र सागरी मंडळाशी (Maharashtra Maritime Board) करार केला आहे. त्याप्रमाणे १५ स्पीडबोट निवडण्यात आल्या आहेत. रोज ८ ते ५ वाजेच्या दरम्यान आपण बोट बुक करू शकतो. अट एवढीच की १५ मिनिट आधी बोट बुक करावी लागेल. दोन्ही प्रकारच्या बोटीचं एकवेळचं भाडं हे अनुक्रमे ५७०० ते ९५०० रुपये असेल. हे जर महाग वाटत असेल तर आमच्या सल्ल्याप्रमाणे तुम्ही ग्रुपने फिरायला जा म्हणजे भाडं महाग पडणार नाही.

राव, आता तुम्ही म्हणाल की एकट्याने फिरायचं झालं तर त्याच पब्लिक बोटीचा वापर करावा लागेल, मग फायदा काय. त्याचं असं आहे एकट्या प्रवाशासाठी पण उबर बोट सेवा घेऊन येत आहे. तूर्तास एकट्या प्रवाशाला बोट बुक करता येणार नाही.

मंडळी, ही सेवा आजपासून सुरु होणार होती पण काही कारणाने तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. लवकरच उबर आपली बोट सेवा सुरु करेल. तोवर तुम्ही प्लॅन तयार करा. मग कुठे जाणार फिरायला ?

सबस्क्राईब करा

* indicates required