computer

भारतातलं दुसरं उदयपुर कुठे आहे माहित आहे का ? सुट्ट्या प्लॅॅन करण्यापूर्वी हे एकदा वाचाच !!

उदयपूर शहर माहित आहे का ? राजस्थानातलं नव्हे, त्रिपुरामधलं? पैज लावून सांगू शकतो, या उदयपूरबद्दल तुम्हाला नक्कीच माहित नसणार. राजस्थानचं उदयपूर जगप्रसिद्ध असलं तरी त्रिपुराचं उदयपूर भारतातही कोणाला फारसं माहित नाही. पण एक मात्र नक्की, पहिल्या उदयपूरप्रमाणेच दुसरं उदयपूर पर्यटकांना फुल पैसा वसूल ट्रीपचा आनंद देणारं आहे.

चला तर आज दुसऱ्या उदयपूरच्या भेटीला जाऊया!!

त्रिपुराच्या आगरतळापासून ५० किलोमीटरवर भारतातलं दुसरं उदयपूर आहे. हे शहर अप्रतिम निसर्ग, तलाव आणि ऐतिहासिक मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. प्रवासाला सुरुवात करूया त्रिपुरासुंदरी मंदिरापासून. हे मंदिर ५०० वर्ष जुनं आहे. महाराज धन्य माणिक्य देव यांनी या मंदिराची स्थापना केली. या मंदिराला भेट देण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे शेजारीच असलेला कल्याण तलाव. हा तलाव आणि तिथला परिसर बघण्यासारखा आहे. दिवाळीत या भागाला जत्रेचं रूप येतं.

आगरतळाच्या मधोमध वाहणारी गोमती नदी उदयपूर जवळून जाते. या नदीचा परिसर फोटोजेनिक वाटावा असा आहे. या नदीपासून जवळच उदयपूरचं दुसरं आकर्षण आहे. हे ठिकाण तुम्हाला राजस्थानच्या उदयपूरची आठवण करून देईल. राजस्थानच्या उदयपूरमध्ये तलावात बांधलेले महाल आहेत. आपल्या दुसऱ्या उदयपूरमध्ये पण असाच एक महाल आहे. 

बीर बिक्रम किशोर या राजाचा रुद्रसागर तलावावर नीरमहाल आहे. हा महाल १९३८ साली बांधून पूर्ण झाला. या महालाचं बांधकाम जुन्या मुघल शैलीची आठवण करून देणारं आहे. केवळ ५० रुपयांमध्ये रुद्रसागर तलावावरून बोटीने फेरफटका मारता येतो. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत हा भाग पर्यटकांसाठी खुला असतो.

आता आपल्या तिसऱ्या आकर्षणाकडे वळूया. उदयपूरचा सर्वात मोठा तलाव बिजोय सागर. हा तलाव स्थानिक लोकांनी पर्यटकांसाठी बांधला आहे. कृत्रिम तलाव असला तरी निसर्ग प्रेमींना आकर्षित करेल असं तिथलं वातावरण आहे. या भागापासून अवघ्या १ तासावर तृष्णा अभयारण्य आहे. या अभयारण्यात अनेक प्रकारचे पक्षी पाहता येतात. जर नशीब जोरात असेल तर बिबट्या पण दिसतो. १० ते ४ वाजेपर्यंत तुम्ही अभयारण्याला भेट देऊ शकता.

मंडळी, या भागातले पदार्थ हे खवय्यांसाठी वेगळं आकर्षण आहे. स्थानिक पदार्थ आणि चीनी पद्धतीचे वेगवेगळे पदार्थ उदयपूरमध्ये चाखायला मिळतील.

तर मंडळी कधी जाताय या दुसऱ्या उदयपूरच्या भेटीला??

सबस्क्राईब करा

* indicates required