डिग्रीनं नोकरी नाही, पण अस्सा बिझनेस दिला ना राव !!

‘हिचा उपयोग फक्त लग्न जमवण्यासाठी झाला. जेव्हा मी जॉब शोधायला गेलो तेव्हा डिग्रीने जीव सोडला होता.’ हे वाक्य आणि वर हार घातलेली इंजिनियरिंगची डिग्री. असा फोटो तुम्ही पाहिलाय का? अहो, पाहिलाच असणार. हा फोटो सध्या व्हायरल झालाय. आता रोजच अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. त्यातल्या सगळ्याच काय खऱ्या नसतात ना राव. पण ह्या मेलेल्या डिग्रीचा फोटो खरा ठरलाय. हा फोटो पुण्यातल्या एका चहावाल्याने लावलेला असून तो खरंच इंजिनियर आहे.

त्याच्यावर डिग्रीला मृत घोषित करून हार घालण्याची वेळ का आली आहे ? चला समजून घेऊया....

स्रोत

अजित केरुरे हा लातूरहून पुण्याला शिकायला आला होता. त्यानं पुणे विद्यापीठातून इंजिनियरिंग केलं. इंजिनियरिंग करून शेवटी त्याला मनासारखी एकही नोकरी मिळाली नाही. त्याला चालून आलेल्या नोकऱ्या अगदी तुटपुंज्या पगाराच्या होत्या. एवढं शिकून कमी पगारात काम करून तो खचला नाही, उलट त्यानं नोकरी सोडली आणि स्वतःचा व्यवसाय सुरु केला. यात त्याच्या पत्नीने आणि मित्रांनी मोलाची साथ दिली.

स्रोत

पुण्यातल्या सदाशिव पेठेत ब्राह्मण मंगल कार्यालयाजवळ त्यानं काही महिन्यांपूर्वी 'कडक स्पेशल' नावाचं चहाचं दुकान सुरु केलं. हे दुकानही अगदी स्पेशल आहे राव. लोकांना चहासोबत पुणेरी पाट्या, मोठ्या बॅनरवर छापलेलं विद्यार्थ्यांना पत्र आणि कळस म्हणजे चंदनाचा हार घातलेली स्वतःचीच डिग्री अशा अजब गोष्टींनी त्याने दुकान सजवलंय. पाहता पाहता या दुकानाची चर्चा वाढलीय भाऊ.
पण अजितला महाराष्ट्रभर त्याची कीर्ती पसरवण्यासाठी त्याच्या ‘मेलेल्या’ डिग्रीनेच साथ दिली. त्याच्या डिग्रीचा आणि तिच्या खाली लिहिलेल्या वाक्याचा फोटो सर्वत्र फिरू लागला आणि अनेकजण त्याचा शोध घेऊ लागले. त्याचा पत्ता लागल्यावर दुकानात लोकांची गर्दी वाढली आहे.

स्रोत

मंडळी, अजित कधीकाळी स्वतः नोकरी शोधत होता, पण आज तो १२ जणांना नोकरीवर ठेवून आहे. वर्षाकाठी १५ लाख कमावून त्याने व्यवसायात जम बसवलाय. पुढे त्याला कडक स्पेशलच्या २५ शाखा उघडायच्या आहेत.

राव, अजित केरुरेसारखी अनेक मुलं आज इंजिनियरिंग करत आहेत. अजितसारखं प्रत्येकालाच चहाचं दुकान टाकता येणार नाही, मग अशा मुलांचं पुढे काय? अजितची हार घातलेली डिग्री जेवढा गमतीचा विषय आहे तेवढाच चिंतेचा सुद्धा. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? आम्हाला नक्की कळवा !!

 

आणखी वाचा :

चहाची किंमत १० आणि कमाई तब्बल १२ लाख....पुण्याच्या चहावाल्याची यशोगाथा वाचली का ??

इंजिनियरने असं काय केलं की रिक्षावाल्याने त्याला फ्री मध्ये सोडलं ?

व्हिडिओ- जगातले सगळे शोध मेकॅनिकल इंजिनिअर्सनी लावले असते तर ??

सबस्क्राईब करा

* indicates required