शनिवार स्पेशल : #MeToo चळवळ आहे तरी काय आणि याची सुरुवात झाली तरी कशी ?

गेल्यावर्षी ऑक्टोबर पासून #MeToo हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला होता. #MeToo चळवळीने लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्याला वाचा फोडण्याचं काम सुरु केलं. भारतात या चळवळीने थोडा बहुत वाद उभा राहिला पण म्हणावं तसं परिणामकारी वादळ उठलं नाही. मध्ये ही चळवळ जवळजवळ बंद पडली होती. मग गेल्याच महिन्यात तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आणि भारतात #MeToo पुन्हा ट्रेंड होऊ लागला.

स्रोत

मंडळी, नाना पाटेकर यांच्यानंतर सिने जगतातल्या अनेक बड्या कलाकारांवर लैंगिक अत्याचाराचा आरोप होत आहे. अनेक महिला आपल्यावरील अत्याचाराबद्दल खुलेपणाने बोलतायत. या चळवळीची पहिली ठिणगी पडली ती ऑक्टोबर, २०१७ रोजी.

एलिसा मिलानो या हॉलीवूडच्या अभिनेत्रीने एक ट्विट केलं होतं. ‘जर तुमच्यावर लैंगिक अत्याचार झाला असेल तर या ट्विटला me too असं उत्तर द्या’. या एका ट्विट नंतर ट्विटरवर दिवसभरात २ लाख लोकांनी #MeToo हॅशटॅग वापरला. फेसबुकवर २४ तासात ४७ लाख लोकांनी #MeToo पोस्ट केलं.

या ट्विटला १६ ऑक्टोबर रोजी एक वर्ष पूर्ण होईल. यानिमित्ताने जाणून घेऊया Me Too चळवळीच्या जन्माची कथा !!

हार्वे वाइनश्टीन या हॉलीवूडच्या ऑस्कर विजेत्या निर्मात्यावर २० पेक्षा जास्त अभिनेत्रींनी लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. रॉनन फॅरो या पत्रकाराने न्यूयॉर्कर मासिकात हार्वे वाइनश्टीनने केलेल्या लैंगिक अत्याचाराची मालिकाच प्रसिद्द केली होती. यानंतर अनेकजणींनी या बड्या निर्मात्यावर अत्याचाराचे आरोप केले. या घटनेला प्रतिसाद म्हणून एलिसा मिलानो या अभिनेत्रीने स्वतःचा अनुभव तर शेअर केलाच पण सोबतच इतरांना आपले अनुभव शेअर करण्याचं आवाहन केलं. शारीरिक शोषणाला बळी पडलेल्या प्रत्येक महिलेने फक्त #MeToo लिहिलं तरी स्त्रियांवरच्या लैंगिक अत्याचाराचा प्रश्न किती गंभीर आहे याची इतरांना कल्पना येईल हा या मागचं उद्देश होता.

हार्वे वाइनश्टीन (स्रोत)

#MeToo चा जन्म या हार्वे वाइनश्टीन प्रकरणात आहे का ? तर नाही !! #MeToo चा जन्म झाला २००६ साली.

नागरी हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या तराना बर्क या १९९७ साली शारीरिक शोषणाला बळी पडलेल्या मुलींसाठी काम करत होत्या. त्यांनी अवघ्या १३ वर्षाच्या मुलीच्या तोंडून तिच्या लैंगिक अत्याचाराची कहाणी ऐकली. या मुलीवर तिच्याच आईच्या प्रियकराने लैंगिक अत्याचार केला होता. या लहानगीच्या तोंडून हा भीषण प्रकार ऐकल्यानंतर तराना बर्क यांच्या तोंडून एकच प्रतिसाद निघाला MeToo.

तराना बर्क (स्रोत)

१९९७ ते २००६ पर्यंत त्यांच्या डोक्यात हा शब्द घोळत राहिला. या शब्दांनी त्या अस्वस्थ होत होत्या. शेवटी त्यांनी या दोन शब्दांचा वापर करून MeToo चळवळ उभारली. या चळवळीला खरी धार मिळाली ती २०१७ साली.

स्रोत

मंडळी, स्त्रियांवरचे अत्याचार हा वर्षानुवर्षांचा खितपत पडलेला प्रश्न. या प्रश्नावर आता स्त्रिया बोलतायत आणि अशी प्रकरणं बाहेर येऊन प्रस्थापित लोकांचा खरा चेहरा दिसतोय याचा नक्कीच आनंद आहे. फक्त आजच्या सोशल मिडीयाच्या युगात अचानक एखादा विषय ट्रेंड होतो आणि काही काळाने तो ठप्पही पडतो तसं याचं होऊ नये. नाही तर ‘ये रे माझ्या मागल्या’ असा प्रकार होऊ शकतो. या चळवळीने भविष्यात होणारे असे हीन प्रकार बंद होणे हेच या चळवळीचं यश असेल.

सबस्क्राईब करा

* indicates required