computer

डास मारणाऱ्या रॅकेटची आयडिया आली तरी कुठून ? या रॅकेट मागची गोष्ट माहित आहे का ??

ये मच्छर
जिसका कीचड़ो में घर है
नालियों में बसेरा है
इसकी पहचान ये है के
ये न तेरा है न मेरा है
साला एक मच्छर आदमी को… 

आठवला ना हा डायलॉग? नाना पाटेकर यांच्या तोंडी असलेला यशवंत सिनेमा मधील हा संवाद प्रचंड गाजला होता. कारण काय असेल बरे? कारण लोक खरोखर मच्छरांना वैतागलेले असतात आणि त्यांच्या मनातली खदखद नाना पाटेकरांनी व्यक्त केली म्हणून हा संवाद डोक्यावर घेतला गेला. 

खरं आहे ना मंडळी? कानाभोवती गुणगुण करणारे, आपले रक्त शोषणारे, रोगराई पसरवणारे डास म्हणजे आपले जानी दुश्मन असतात. इतकुसा जीव तो… पण आपली त्रेधा उडवतो! 

या डासांना वैतागून आपण त्यांना नष्ट करण्याचे निरनिराळे उपाय योजतो. मग औषध फवारणी असो वा बाजारात मिळणाऱ्या कॉइल किंवा मॉस्क्युटो रिपेलंट असो… हरतर्हेचे प्रयत्न आपण करतो. त्यात एक प्रकार आपण सर्वांनीच हाताळला आहे, तो म्हणजे डास मारण्याची बॅट! व्यक्तिशः हा प्रकार माझ्या सर्वात आवडीचा आहे. जेव्हा बॅट फिरवून तिच्या तडाख्यात एखादा मच्छर सापडतो आणि ‘चट्ट’ असा आवाज येतो तेव्हा काय भारी वाटतं म्हणून सांगू…तलवार फिरवल्याच्या आवेशात  एक दोन तीन करत खोलीतील सगळे डास मारले की एखादे महायुद्ध जिंकल्याचा आनंद होतो. तुम्हालाही होतच असेल म्हणा… असो!

चला आता मुख्य मुद्द्यावर येऊ. तुम्ही कधी विचार केलाय का की ही बॅटवाली आयडियाची कल्पना कुणाची असावी? ही बॅट नेमके कसे काम करते? यात काय तंत्रज्ञान वापरले आहे? माहीत असेल तर उत्तम, माहीत नसेल तर आम्ही आहोतच की सांगायला… चला तर मग जाणून घेऊयात…

तर आपण जे सध्या इलेक्ट्रॉनिक बॅटचे रूप बघतो तसे पूर्वी नव्हते बरं का. पूर्वी तर डास सुद्धा एवढ्या प्रमाणात नव्हते. पण घरगुती माश्यांचा प्रादुर्भाव मात्र बराच मोठा होता. त्यावेळी लोकं वर्तमानपत्राची गुंडाळी करून माश्यांना मारायचे परंतु फार कमी वेळा ते यात यशस्वी होत असत. या माश्या उघड्या अन्नावर बसून रोगराई पसरवायच्या म्हणून लोकांचा यांच्यावर राग होताच. याच रागातून रॉबर्ट मोंटेगोमेरी याने 1990 मध्ये माश्या मारायच्या बॅटची रचना केली आणि त्याचे पेटंटही घेतले. ही बॅट एकदम साधी होती, मात्र लवचिक होती. भिंतीवर किंवा कुठल्याही कठीण पृष्ठभागावर माशी बसली की वरून सप्पकन एक दणका द्यायचा आणि माशी खलास व्हायची इतकं सोपं तंत्रज्ञान यात वापरलेलं होतं. या बॅटला एक लांब दांडी आणि समोरच्या बाजूला चौकोनी जाळी असायची. या जाळीमुळे हवेचा अवरोध कमी व्हायचा. सध्याच्या इलेक्ट्रॉनिक बॅट मध्ये सुद्धा याच कारणाने जाळीचा उपयोग केला जातो. 

या उपकरणाच्या शोधानंतर अनेक जणांनी माश्या मारण्यासाठी अनेक क्लृप्त्या शोधून काढल्या. कुणी चिकटपट्टी बनवली, ज्यावर माशी बसली की तिला परत उडता येऊ नये, कुणी ट्रॅप शोधले, कुणी निमुळत्या तोंडाच्या बाटल्यांमध्ये आमिष ठेऊन माश्यांना त्यात आमंत्रित करू लागले, कुणी फ्लाय गन्स बनवल्या, तर काहींनी चक्क जंगलातून माश्या खाणाऱ्या मांसाहारी वनस्पती आणून दिवाणखान्यात ठेवल्या! 

या सर्व प्रकारातूनही बॅटची लोकप्रियता मात्र कमी झाली नाही. होता होता नव्वदीचे दशक उजाडले. आता माश्या इतकाच, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त त्रास मच्छर देऊ लागले होते. संपूर्ण जगात या डासांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले होते. यातूनच तैवानच्या साओ इ शिह याने इलेक्ट्रॉनिक बॅटची संकल्पना मांडली आणि त्याचे पेटंट 1996 मध्ये नावावर करून घेतले. या इलेक्ट्रॉनिक बॅटची संरचना जुन्या साध्या बॅटसारखीच असली तरी यात जाळीमध्ये दोन प्रकारच्या जाळ्यांचे एकत्रीकरण केले गेले आहे. तसेच यात डायरेक्ट करंटचा वापर करण्यात आला. जुन्या बॅटचा समोरील आकार चौकोनी होता पण अधिक जागा वापरण्यासाठी नवीन बॅटमध्ये बॅडमिंटन रॅकेटच्या धर्तीवर गोलाकार आकार करण्यात आला. 

या इलेक्ट्रॉनिक बॅट्स मध्ये हँडलच्या आत हाय व्होल्टेज निर्माण करणारी बॅटरी बसवलेली असते. या बॅटरिला समोरील भागातील जाळीशी जोडले असते. जेव्हा एखादा डास किंवा माशी याच्या संपर्कात येते तेव्हा बाहेरील मोठ्या आकाराच्या जाळीमधून सहज आत जाऊन छोट्या जाळीमध्ये अडकते. बाहेरील जाळी आणि आतील जाळी दोन्हीचा कीटकाच्या शरीराच्या माध्यमातून एकत्रित संपर्क होताच इलेक्ट्रिक सर्किट पूर्ण होते आणि स्पार्क निर्माण होतो. या करंट मुळे कीटक जाळीलाच चिटकून जागेवरच मरण पावतात. यात निर्माण होणारे व्होल्टेज किती असते माहीत आहे? तब्बल 500 ते 1500 व्होल्टस! 

आजकाल काही नवीन बॅट्सना तिहेरी जाळीचे आवरण येत आहे. मनुष्याचा धक्का आतील जाळीला लागू नये आणि त्यातून काही अपघात घडू नये म्हणून ही खबरदारी घेतली जात आहे. अर्थात मायक्रोसेकंदाचा हा धक्का माणसांना फारसा घातक नसला तरी लहान बाळांसाठी धोकादायक नक्कीच ठरू शकतो. 

तर मंडळी, रोजच्या वापरातील या बॅटची माहिती कशी वाटली? आम्हाला नक्की कळवा… आणि शेअर करायला विसरू नका!

 

लेखक : अनुप कुलकर्णी

 

 

आणखी वाचा

कोर्ट म्हणतं की डास चावणं हा अपघातच ! वाचा ही सनसनाटी केस !!

जगातले सगळे डास नष्ट झाले तर काय होईल ? याचं उत्तर आहे बिल गेट्सच्या संस्थेकडे !!

इतरांना सोडून डास तुम्हालाच का चावतात जाणून घ्यायचंय? मग हे वाचाच..

त्यांना गप्पी मासे का म्हणतात ठाऊक आहे?

सबस्क्राईब करा

* indicates required