computer

दुबईच्या पळालेल्या राजकन्येशी भारताचा काय संबंध आहे ? एका आंतरराष्ट्रीय वादग्रस्त घटनेचा खुलासा – भाग १

"श्रीमंत बापाची लाडावलेली -वाया गेलेली पोरगी घरातून पळून जाते ...." हे इतकंच वाक्य वाचलं की तुमच्या आमच्या डोळ्यासमोर गुलशनकुमारचा " दिल है की मानता नही" सिनेमा दिसायला लागतो. हेच वाक्य जेव्हा तुमचे बाबा किंवा काका वाचतात तेव्हा त्यांच्या नजरेसमोर ग्रेगरी पेक आणि ऑड्रे हेपबर्नचा "रोमन हॉलीडे " दिसायला लागतो. एकाच वाक्यातून तयार झालेल्या या दोन्ही सिनेमांचा शेवट अपेक्षेप्रमाणे एकदम 'हॅप्पी हॅप्पी' आहे. किंवा तसा तो असावा अशीच आपली अपेक्षा असते पण आज आम्ही तुम्हाला जी घरातून पळून गेलेल्या राजकन्येची कथा सांगणार आहोत त्या कथेचा शेवट कसा होईल हे अजूनही आपल्याला माहिती नाही. कदाचित राजकन्या घरी जाऊन सुखात राहत असेल किंवा रागवलेल्या बापानी तिला कायमचे संपवून टाकले असेल !!

राजकन्येच्या कहाणीत आहे प्रेम, बदले की आग, खानदान की इज्जत, थरारक पाठलाग, ऍक्शन्स, ड्रामा, इमोशन्स… विविध प्रकारचा मसाला खच्चून भरलेली ही कहाणी "कोणे एकेकाळी एक आटपाट नगर होतं" अशा  वाक्याने सुरू होत नाही. ती घडलीय आत्ता! याच वर्षी! आणि या कहाणीत गुंतले आहेत अनेक देश… अगदी आपला भारतसुद्धा !

चला तर मग, तुमची उत्सुकता जास्त न ताणता सुरू करूयात फिल्मी वाटणारी पण खरीखुरी स्टोरी…

शेख मोहम्मद बिन रशिद-अल-मकतुम

दुबई ! स्वप्नांची नगरी ! अल्पावधीत प्रचंड वेगाने स्वतःचा विकास करून आज जगात सगळीकडे झळकणारी दुबई सर्वांनाच माहीत आहे. या दुबईचा कारभार अजूनही तिथले राजेच बघतात. दुबईचे सध्या राजे आहेत शेख मोहम्मद बिन रशिद-अल-मकतुम. ते यूएईचे पंतप्रधानपद सुद्धा सांभाळतात… आणि आपल्या कहाणीची नायिका आहे, या राजाची राजकन्या ‘शेखा लतीफा

या मुलीचा जन्म डिसेंबर १९८५ मध्ये झाला. सध्या वय ३३. राजेसाहेबांना असलेल्या अनेक राण्यांच्या अनेक अपत्यांपैकी ही एक सौंदर्यवान मुलगी! तर मंडळी, ही शेखा लतीफा सध्या कुठे आहे याचा कुणालाच पत्ता नाही. ती या जगात आहे की नाही याविषयीसुद्धा शंका घेतल्या जात आहेत. ४ मार्च २०१८ पासून शेखा लतीफा गायब होती. असं नक्की काय घडलं होतं तिच्याबाबतीत? जाणून घेऊया…

कहाणी सुरू होते २४ फेब्रुवारी २०१८ या तारखेपासून. या दिवशी शेखा तिच्या मैत्रिणीसोबत युनायटेड अरब अमिरातीतून बाहेर पळाली. मात्र पळून जाण्यापूर्वी ती का पळून जात आहे याचा तिने स्वतःचा चाळीस मिनिटांचा व्हिडीओ रेकॉर्ड करून ठेवला होता. या व्हिडिओत आपल्या कुटुंबावर, विशेषतः वडिलांवर तिने अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या त्रासाला आणि अत्याचाराला वैतागून मी देश सोडून जात आहे असे तिने त्यात सांगितले होते. या प्रवासात तिच्यासोबत होती तिची मैत्रीण आणि ट्रेनर असलेली फिनलँडची नागरिक टीना. आधी या दोघीनी यूएईमधून निघून शेजारचा देश ओमान गाठला. तिथे त्यांची वाट पाहात होता हार्व जॉबर्ट. या अमेरिकन/फ्रेंच नागरिक हार्व जॉबर्टचा मूळ पेशा गुप्तहेराचा आहे. या दोघींना मदत करण्यासाठी म्हणून त्याने त्याची सुसज्ज बोट ‘नोस्रोमो’ तयारच ठेवली होती. या बोटीवर या तिघांसोबत आणखी तीन फिनलँड नागरिक असलेले प्रवासी होते. या सहा जणांचा प्लॅन भारतात गोव्याला या बोटीतून उतरुन तिथून अमेरिकेला जाण्याचा होता. सगळा प्रवास आणि प्रवासाचा मार्ग अत्यंत गुप्त ठेवण्यात आला होता.

 शेखा लतीफा आणि तिची मैत्रीण टीना 

२६ फेब्रुवारी : शेखा लतिफाने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून काही निरोपाचे व्हिडीओ पोस्ट केले होते.

३ मार्च : हार्व जॉबर्टने आपल्या भारतातल्या पत्रकार मित्राला ते भारताच्या हद्दीजवळ येऊन पोचले आहेत असा निरोप पाठवला होता.

४ मार्च : गोव्यापासून ४० किमी म्हणजेच २२ नॉटिकल मैल अंतरावरून नोस्रोमो बोट आणि त्यावरची सहा माणसे आश्चर्यकारकरित्या गायब झाली !

९ मार्च : रोजी शेखा लतिफा गायब झाल्याची बातमी सार्वजनिक झाली.

११ मार्च : तिने पळून जाण्यापूर्वी टिनाच्या घरी बनवलेला चाळीस मिनिटांचा व्हिडीओ तिच्या मित्रांनी रिलीज केला आणि पूर्ण यूएईमध्ये एकच खळबळ माजली! राजघराण्यातल्या राजकन्येने केलेले राजावरचे गंभीर आरोप आणि पलायन हा सर्वांच्या तोंडी चर्चेचा विषय झाला नसता तरच नवल….

२० मार्च : नोस्रोमो बोट यूएईच्या फुजीराह बंदरावर आढळली.  त्यातली ४ माणसे दुसऱ्या दिवशी श्रीलंकेच्या गाले बंदरावर जाण्यासाठी निघाली होती आणि त्यात एक होता हार्व जॉबर्ट! ही बोट  २ एप्रिलला श्रीलंकेला पोचली. २२ मार्चला टीनाचासुद्धा ठावठिकाणा लागला आणि तिला त्याच दिवशी लंडनमार्गे फिनलँडला पाठवण्यात आले.

पण शेखा लतिफा? ती कुठे होती ?? ४ मार्चला नेमके काय घडले होते ? या प्रश्नांची उत्तरं वाचूया थोड्याच वेळात प्रकाशित होणाऱ्या दुसऱ्या भागात !!

सबस्क्राईब करा

* indicates required