computer

स्वच्छ निवडणूक अभियानाचा जनक - ‘टी.एन. शेषन’ !! त्यांच्याबद्दलची ही सगळी माहिती तुम्हांला नक्कीच माहित नसेल..

नुकतंच निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. याचा दुसरा अर्थ असा की आचारसंहिता लागू झालेली आहे. आचारसंहितेत उमेदवारांना वेगवेगळ्या नियमांचं पालन करावं लागतं. हे नियम काय आहेत हे आम्ही सांगत बसणार नाही. आज आपण आचारसंहितेवर बोलणार नसून आचारसंहितेचं पालन करण्याची शिस्त लावणाऱ्या एका ‘दबंग’ व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत. दबंग यासाठी की या पठ्ठ्याने निवडणूक आयोगाची ताकद भल्याभल्यांना दाखवून निवडणुकांना निष्पक्ष आणि स्वच्छ स्वरूप देण्याचं काम केलं आहे.

आज ज्या शिस्तशीर पद्धतीने निवडणुका पार पडतात, आचारसंहितेचं पालन होतं त्याचं पूर्ण श्रेय या व्यक्तीला जातं. कोण आहे ती व्यक्ती ? चला पाहू !!

त्या व्यक्तीचं नाव आहे ‘तिरुनेल्लरी नारायण अय्यर शेषन’ म्हणजे ‘टी.एन. शेषन’. टी.एन. शेषन हे १९५५ चे IAS उत्तीर्ण होते. त्यांची १९९० साली भारताचे १० वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली. १९९६ पर्यंत ते आयुक्तपदी होते. ही झाली त्यांची कोरडी ओळख. त्यांची खरी ओळख ही भारतीय निवडणुकांमध्ये स्वच्छता आणण्यासाठी होती. त्यांच्या आधीच्या आयुक्तांच्या काळात जे घडलं नाही ते त्यांच्या कारकिर्दीत घडलं.

मुळात भारतीय नागरिकांना निवडणूक आयुक्त नावाचा प्रकार असतो हेच माहित नव्हतं. झोपेतून जागं व्हावं तसं भारतीयांना निवडणूक आयोगाच्या रूपाने योग्य व्यक्ती निवडून येण्याची एक अशा निर्माण झाली ती याच शेषन साहेबांच्या कारकिर्दीत. एका लहानशा उदाहरणावरून टी.एन. शेषन यांनी निवडणुकीत आणलेल्या स्वच्छतेची झलक पाहूया.

टी.एन. शेषन यांनी आयुक्तपद स्वीकारलं तोवर ‘मतदान ओळखपत्र’ (Voter ID Card) हा प्रकारच अस्तित्वात नव्हता. हे वाचून आज आश्चर्याचा धक्का बसू शकतो, पण हे खरं आहे. ती पद्धत पहिल्यांदा भारतात आणली ती टी.एन. शेषन यांनी. १९९३ च्या निवडणुकीत पहिल्यांदा मतदारांच्या हातात मतदान ओळखपत्र कार्ड होतं. मतदान करण्यासाठी पात्र असलेल्या सर्व मतदारांना मतदान ओळखपत्र अनिवार्य करण्याचं काम टी.एन. शेषन यांनी केलं. आज मतदान ओळखपत्र हे एक महत्वाचं ओळखपत्र झालं आहे.

याखेरीज त्यांनी काही महत्वाचे बदल घडवून निवडणुकांना जास्तीतजास्त पारदर्शक आणि निष्पक्ष करण्याचा प्रयत्न केला. या कामात ज्या ज्या लोकांनी आडकाठी केली त्यांना त्यांना टी.एन. शेषन यांच्या रागाचा सामना करावा लागला. त्यांची भूमिका रोखठोक होती. ते एका वाक्यात मुद्देसूद उत्तर देण्यासाठी ओळखले जात. या उत्तराने भल्याभल्यांची बोलती बंद होत असे. त्यांचे विरोधक त्यांना सनकी म्हणायचे, पण त्यांचं काम पाहून त्यांचं हे दबंग रूप योग्य होतं हे दिसून येतं. त्यांनी आणलेल्या महत्वाच्या सुधारणा पाहूया.

१. भारतात १९६० पासून आचारसंहिता लागू होत आली आहे. पण टी.एन. शेषन यांनी उमेदवारांना आणि नेत्यांना आचारसंहितेचं कठोरपणे पालन करायला भाग पाडलं.

२. निवडणुकीवर उमेदवारांकडून करण्यात येणाऱ्या खर्चाला लगाम लावला.

३. निवडणूक आयोग यंत्रणेत मुलभूत बदल आणले. १९९२ सालच्या उत्तर प्रदेश निवडणुकीत तर त्यांनी पोलीस अधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांना हे ठणकाऊन सांगितलं होतं की निवडणुकीत कोणतीही चूक झाली तर त्याची सगळी जबाबदारी त्यांची असेल.

४. एक महत्वाची शक्कल म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यांची हुशारीने नेमणूक केली. निवडणूक अधिकारी ज्या भागातला आहे त्या भागात कधीच त्याची नेमणूक होत नाही. ही पद्धत टी.एन. शेषन यांची.

आता त्यांनी उमेदवारांवर घातलेले नियम पाहूया.

१. मतदारांना पैसे, महागड्या वस्तू देणे यावर बंदी घातली.

२. निवडणुकीच्या काळात दारू वाटणे हा गुन्हा ठरवला.

३. सरकारी यंत्रणेचा प्रचारासाठी वापर करण्यावर बंदी घातली.

४. निवडणुकीच्यावेळी मतदारांच्या जाती धर्माच्या भावनांना हात घालू नये हा नियम आणला.

५. धार्मिक स्थळांचा प्रचारासाठी वापर करण्यावर बंदी घातली.

६. परवानगीशिवाय लाउडस्पीकर आणि मोठमोठ्या आवाजात गाणी वाजवण्यावर बंदी घातली.

हे नियम बघून आपल्यातील जाणकारांना आचारसंहितेची नियमावली आठवू शकते. खरं तरी हे नियम टी.एन. शेषन यांनी नव्याने तयार केले. त्यांनी हे दाखवून दिलं की निवडणूक आयुक्त हा भारत सरकारचा निवडणूक आयुक्त नसून तो भारताचा (देशाचा) निवडणूक आयुक्त आहे. अशा प्रकारे त्यांनी निवडणुकांमधील निवडणूक आयुक्तांची भूमिका नव्याने तयार केली.

राजकारण्यांचा ते तिरस्कार करतात असा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. पण त्यांनी एका मुलाखतीत यावर नेमकं उत्तर दिलं. ते म्हणाले “I hate bad politics”.

टी.एन. शेषन आज कुठे आहेत ?

१९९६ साली त्यांची कारकीर्द संपल्यानंतर त्यांना लाल बहादुर शास्त्री अकॅडमी मध्ये भाषण द्यायला बोलावलं होतं. या भाषणाच्या वेळी त्यांच्या एका वाक्यात सडेतोड उत्तर देण्याची पद्धत पुन्हा एकदा दिसून आली. त्यांचं पाहिलंच वाक्य होतं “तुमच्यापेक्षा जास्त तर पानवाला कमावतो”. साहजिक आहे त्यांना पुन्हा कधीच भाषणासाठी निमंत्रण मिळालं नाही. त्याच वर्षी त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार या प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला. या पुरस्काराला आशियाचं ‘नोबेल’ म्हणतात.

पुढच्याच वर्षी त्यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ते चेन्नईला निघून गेले. काही काळ त्यांनी एका मॅनेजमेंट स्कूल मध्ये लीडरशिप विषयावर लेक्चरर म्हणून काम केलं. त्यांनी आपली आत्मकथा लिहून काढली आहे पण ती छापायला त्यांनी साफ नकार दिला. असा हा विचित्र माणूस.

टी.एन. शेषन यांच्या निधनाची बातमी गेल्यावर्षी व्हायरल झाली होती. ती साफ खोटी आहे हे काही दिवसातच समजलं. सध्या टी.एन. शेषन यांना स्मृतिभ्रंश झाला आहे. या आजारामुळे त्यांचं वास्तव्य कधी वृद्धाश्रम तर कधी घरी असतं.

मंडळी, निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव मानला जातो. निवडणूक आयोगाची यातली महत्वाची भूमिका फक्त कागदोपत्री न ठेवता ती प्रत्यक्षात अंमलात आणण्याचं काम टी.एन. शेषन यांनी केलं. त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत.

सबस्क्राईब करा

* indicates required