computer

“ब्लॅक होल”चा इतिहासातला पहिला फोटो बघितला का ? आता वाचा या फोटो मागची गोष्ट !!

मंडळी आजवर जे स्वप्नवत वाटत होतं ते आता सत्यात उतरलं आहे. विज्ञानात ज्यावर मोठ्या प्रमाणात संशोधन होतं होतं आणि मोठमोठ्या शास्त्रज्ञांनी आपली हयात खर्च केली होती त्या “ब्लॅक होल”चा म्हणजेच कृष्णविवराचा पहिला फोटो आता मिळाला आहे. “ब्लॅक होल” म्हटलं की जी दहशत वाटत होती ती खऱ्या “ब्लॅक होल”ला बघितल्यावर आणखी वाढली आहे. हा पाहा त्या “ब्लॅक होल”चा फोटो.

चला तर या “ब्लॅक होल”बद्दल सविस्तर जाणून घेऊया !!

मंडळी, हा फोटो अत्यंत साधा आहे पण त्याच्या मागची गोष्ट आश्चर्यकारक आहे. तुम्ही फोटो मध्ये जो नारंगी गोलाकार “ब्लॅक होल” बघत आहात तो पृथ्वीपेक्षा तब्बल ३० लाख पटीने मोठा आहे. शास्त्रज्ञांचे मते आजवर शोधण्यात आलेला हा सर्वात मोठा “ब्लॅक होल” असावा. या “ब्लॅक होल” भोवती असलेला प्रकाश आपल्या संपूर्ण आकाशगंगेच्या अनेक पटीने जास्त आहे. शास्त्रज्ञ हेनो फ्लेक यांनी या “ब्लॅक होल”ला ‘राक्षस’ म्हटलं आहे.

मंडळी, आता या “ब्लॅक होल”ला समजून घेऊया.

तुम्हाला जो नारंगी रंग दिसतोय तो खरं तर तप्त वायूचा लोट आहे. हा वायू आत शोषला जातोय. मध्ये जो काळा भाग दिसत आहे तोच मुळात सगळ्या दहशतीचं कारण आहे. असं म्हणतात या काळ्या भागाभोवती गुरुत्वाकर्षण एवढं प्रचंड असतं की त्यातून प्रकाश पण निसटू शकत नाही. त्या काळ्या भागापलीकडे काय आहे हे आजवरचं न उलगडलेलं रहस्य आहे.

मंडळी, या पहिल्या ऐतिहासिक फोटोमागे एका महिलेचा सिंहाचा वाटा आहे. तिचं नाव आहे केटी बोमन. ज्या इव्हेंट हॉरीजॉन या टेलिस्कोप टीमने हा फोटो घेतला आहे त्या टीम मध्ये तिने महत्वाची भूमिका बजावली आहे. तिने ३ वर्षापूर्वी एक नव्या प्रकारचा अल्गोरिदम तयार केला होता. त्याच्याच सहाय्याने हे यश मिळू शकलं आहे.

 

हे कसं शक्य झालं ते समजून घेऊया.

हा एक फोटो मिळवण्यासाठी पृथ्वीवर बसवण्यात आलेल्या ८ रेडिओ टेलिस्कोप्सची मदत घेण्यात आली. या रेडिओ टेलिस्कोप्स मधून मिळालेला डाटा एकत्रित करण्याचं काम केलं केटी बोमनच्या अल्गोरिदमने. या अल्गोरिदम शिवाय हे शक्यच झालं नसतं कारण “ब्लॅक होल” आणि पृथ्वी मधलं अंतर अनेक अब्ज किलोमीटर आहे. दोघांच्या मध्ये असलेल्या गोष्टी बाजूला सारून “ब्लॅक होल”चा स्पष्ट फोटो मिळवणं किचकट काम होतं. अखेरी ३ वर्षांनी हे साध्या झालं आहे.

“ब्लॅक होल” तयार कसे होतात ?

“ब्लॅक होल” होल हे मुळात एकेकाळचे तारे असतात. जसे की आपला सूर्य एक तारा आहे. मोठमोठे तारे त्यांच्या आयुष्मानाच्या शेवटच्या टप्प्यात आकुंचित होत जाऊन त्यांचं रुपांतर कृष्णविवरात होतं. ही लहानलहान कृष्णविवरे नंतर आजूबाजूच्या गोष्टी शोषून घेऊन वाढत जातात. आपण जो “ब्लॅक होल” बघत आहोत तो अशाच अनेक ग्रहांना शोषून मोठा झालेला आहे.

 

तर मंडळी, हा विज्ञानासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठीच एक ऐतिहासिक क्षण आहे. तुमचं मत नक्की द्या !!

सबस्क्राईब करा

* indicates required