आणि अखेर चंद्रावर पाणी सापडले !! whatsapp विद्यापीठातली नाही, खरोखरची बातमी आहे राव !!

आणि अखेर चंद्रावर पाणी सापडले !

गेली अनेक वर्षं चंद्रावर पाणी आहे अथवा नाही यावर शास्त्रज्ञांचा काथ्याकूट चालू होता. काही शास्त्रज्ञांच्या मते चंद्रावर पाणी नाहीच -तर काही जणांचे मत असे होते की पाणी असलेच तर चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशात बर्फाच्या स्वरुपात असेल .चंद्राच्या काही भागात कायम अंधार असतो म्हणजे त्या भागात सूर्यकिरण पोहचतच नाहीत. या भागात पाणी बर्फाच्या स्वरुपात असेल असा अंदाज आहे.. काही शास्त्रज्ञांच्या मते सौर वार्‍यातून काही हायड्रोजन आयन्सचा मारा चंद्रावर होत असावा आणि पाण्याचे रेणूंची निर्मिती होत असावी. असे गृहीत धरलेतर  साहजिकच जेव्हा चंद्राची सूर्याकडे पाठ फिरेल तेव्हा त्या भागात पाणी तयार होणार नाही.

स्रोत

 पण आता एक खूशखबर आहे  ती अशी की नासाच्या Lunar Reconnaissance Orbiter (LRO) या अवकाशयानाला चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचे अंश मिळाले आहेत.

काय आहे Lunar Reconnaissance Orbiter (LRO) हे चंद्राच्या भोवती भ्रमण करणारे एक यान आहे. नासाने  निर्मनुष्य चंद्र मोहीम राबवण्यासाठी चालवलेली ही एक रोबोटीक यंत्रणा आहे.  पृथ्वीवरून प्रक्षेपीत  २००९ साली हे यान प्रक्षेपीत झाल्यापासून चंद्राच्या पृष्ठभागाबद्दल -त्यावर होणार्‍या हालचालीवर - विशेषत त्यावरील  ध्रुवीय प्रदेशात मानवी वस्तीसाठी योग्य असे काही भौगोलीक प्रदेश आहेत काय याची चाचणी करत आहे. यावर बसवलेल्या  Lyman-Alpha Mapping Project (LAMP)च्या माध्यमातून पाण्याचा शोध घेणे सुरु झाले. अंतराळातील अतीनील किरणे आणि  मुक्त हायड्रोजन रेणूंच्या मदतीने पृष्ठभागाचे संशोधन सुरु झाले .

स्रोत

गेल्या आठवड्यात जी माहिती लँप द्वारे नासाकडे आली त्यावरून असे दिसते आहे की चंद्रभूमीवर पाण्याचा विरळ थर आहे. हे निरीक्षण सध्या प्रायोगीक स्वरुपाचे असले तरी त्यावरून एक महत्वाचा निष्कर्ष निघाला आहे तो असा की : गोठलेल्या ध्रुवीय प्रदेशाखेरीज इतर पृष्ठभागावर पाणी मिळण्याची शक्यता आहे. 

सरते शेवटी प्रश्न असा उदभवतो की पाण्यासाठी इतकी यातायात कशासाठी ? तर चंद्रावर भविष्यकाळात मानवी वस्ती उभारण्यासाठी !!

स्रोत

पण पाणी हे एकच आव्हान नासा समोर नाही. अंतराळातून होणारे रेडीएशन, न्यूट्रॉन सारख्या कणांचे अस्तित्व आणि त्यांचे प्रमाण, कायम अंधारात -कायम उजेडात असणारे भूभाग -त्यांचे नकाशे, अशा कामांची मोठी यादी आहे. त्यासाठी (LAMP) खेरीज आणखी सहा यंत्रणा (LRO) वर बसवण्यात आल्या आहेत. 

आमची नासाकडे एकच छोटी मागणी आहे, अशाच काही नव्या तंत्रानी लातूरला पाणी मिळतंय  का ते बघा बॉ !!!

सबस्क्राईब करा

* indicates required