काय म्हणता, अमेरिकेत पार्सल पोस्टद्वारे चक्क मुलांची वाहतूक व्हायची ?

वाहतूक, संदेशवहन आणि दळणवळण या तिन्ही गोष्टींनी माणसाच्या उत्क्रांतीदरम्यान मोलाचा हातभार लावलेला आहे. या गोष्टींचा इतिहासही तितकाच रंजक आहे. या सुविधांसाठी वेगवेगळी साधनं अस्तित्वात आली. त्यांच्यात काळानुरूप बदल होत गेले. या सगळ्या प्रवासाने अनेक चढउतार पाहिले आणि अनेक चिवित्र(!) गोष्टीही अनुभवल्या.
अशीच एक गोष्ट आहे अमेरिकेत लहान मुलांना पार्सल करण्याची.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत पोस्ट ऑफिसने मोठी पार्सल्स आणि अवजड वस्तू मेल सर्व्हिसद्वारे पाठवण्याचा निर्णय घेतला. यामुळे मेल ऑर्डर कंपन्या आता अमेरिकेतल्या कानाकोपर्यात वसलेल्या खेड्यांपर्यंत पोहोचल्या. तिथे राहणार्या लोकांची फारच मोठी सोय झाली. दिनांक १ जानेवारी १९१३ रोजी पार्सल पोस्ट ही सेवा अधिकृतपणे सुरू झाली आणि लाखो लोकांना ‘जो जे वांछिल तो ते लाहो’ हा अनुभव घरबसल्या मिळायला लागला.
जे काय हवं ते दारात हजर! फक्त ते या पार्सलद्वारे मागवून घ्यायचं. एखादी वस्तू इच्छित ठिकाणी पाठवणंही यामुळे सोपं झालं. अंड्यांपासून वीटांपर्यंत आणि सापांपर्यंत काय वाट्टेल ते पार्सलच्या माध्यमातून पाठवता यायला लागलं. एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी मालाची ने आण इतकी सोयीची झाल्यावर काही लोकांनी एक पाऊल पुढे टाकलं. त्यांनी चक्क आपल्या लहान मुलांना पार्सल करायला सुरुवात केली. कारण काय? तर हे काम स्वस्तात व्हायचं! रेल्वेच्या तिकिटाला जेवढे पैसे लागायचे त्यापेक्षा कितीतरी कमी पैशात ही बाळं अगदी एका मैलापासून शेकडो मैलापर्यंत पार्सल म्हणून जायची. बहुधा आजीआजोबा किंवा अशाच कुणा जवळच्या नातेवाईकांकडे.
पार्सल पोस्टाची सुरुवात झाल्यानंतर काही दिवसांतच ओहायोमध्ये राहणार्या जेस आणि माटिल्डा बीगल यांनी आपला आठ महिन्यांचा मुलगा जेम्स याला केवळ काही मैलांवर राहणार्या त्याच्या आजीकडे पाठवलं. त्यावेळी पार्सल पोस्टातून ११ पौंडांपर्यंत वजन असलेलं पार्सल पाठवायची परवानगी होती आणि जेम्स बाळाचं वजन त्यापेक्षा थोडंसंच कमी होतं. केवळ १५ सेंट्समध्ये हे काम झालं. अर्थात त्याच्या आईवडलांनी त्याचा ५० डॉलर्सचा विमा काढला होता. या बातमीने वर्तमानपत्रात मथळे गाजवले आणि पुढचे अनेक महिने या आणि अशा बातम्या मग येतच राहिल्या.
मऊ लागलं की कोपराने खणणं या वाक्यप्रयोगाची आठवण करून देणारे अनेक उद्योग त्या काळात अमेरिकेतल्या लोकांनी केले. अगदी पार्सल पोस्टाने वजन, आकारमान याबाबत घालून दिलेली मर्यादा ओलांडण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. अशाच एका प्रकरणात दिनांक १९ फेब्रुवारी १९१४ या दिवशी शार्लट मे पायरस्टॉर्फ ही चार वर्षांची मुलगी रेल्वेच्या पार्सल पोस्टाने ७३ मैलांवर राहणार्या तिच्या आजीआजोबांकडे ‘रवाना’ झाली. हा किस्सा खूप गाजला. यावर पुढे ‘मेलिंग मे’ हे लहान मुलांचं पुस्तकदेखील निघालं.
त्यावेळी लहान मुलांना पार्सल पोस्टाने पाठवताना त्यांना चक्क छोट्या सॅकमध्ये किंवा गळ्यात अडकवायच्या पिशवीमध्ये ठेवलं जायचं. अगदी सामानाचा डाग असल्यासारखंच. जोडीला त्यांच्या कपड्यांवर पोस्टाचं तिकीटपण टाचलं जायचं. छोट्या मे ला मात्र इतर सामानाप्रमाणे सॅकमध्ये बंदिस्त व्हावं लागलं नाही. तिच्याबरोबर तिचा एक दूरचा मामा होता, जो स्वत: रेल्वे मेल सर्व्हिसमध्ये कारकून म्हणून काम करत होता. असं म्हटलं जातं, की मे चा हा प्रवास तिच्या मामाचा वशिला आणि आपल्या भाचीला आपल्याबरोबर नेण्याची इच्छा यामुळेच शक्य झाला.
महिनोन्महिने अधूनमधून अशा ‘गोष्टी’ वर्तमानपत्रांना खाद्य पुरवत राहिल्या. मध्येच १४ जून १९१३ रोजी वॉशिंग्टन पोस्ट, न्यूयॉर्क टाईम्स, लॉस एंजेलिस टाईम्स या सर्वच वर्तमानपत्रांनी पोस्टमास्तरच्या आदेशानुसार यापुढे मुलांना पार्सल म्हणून पाठवता येणार नाही अशी बातमी दिली. त्या काळातल्या नियमांप्रमाणे केवळ माश्या आणि ढेकूण याच प्राण्यांना मेलमधून जाण्याची परवानगी होती! थोडक्यात कोणत्याही प्राण्यांची अशा प्रकारे वाहतूक केली जात नसे. पण एवढं झाल्यावरही हा प्रकार लगेच थांबला नाही. उलट त्यानंतर वर्षभरातच एका महिलेने आपल्या सहा वर्षाच्या मुलीला फ्लोरिडाहून आपल्या वडिलांच्या घरी व्हर्जिनिया येथे पाठवलं. अंतर होतं ७२० मैल. म्हणजे तब्बल ११५८ किलोमीटर. आणि त्यासाठी तिला तिकिटाचा खर्च आला फक्त १५ सेंट्स. अशा प्रकारच्या सर्व ज्ञात प्रवासांमधला हा सर्वाधिक लांबीचा प्रवास मानला गेला आहे.
या सगळ्या गोष्टींमधून ठळकपणे समोर येणारा पैलू म्हणजे स्थानिक पोस्ट कर्मचार्यांवर असलेला लोकांचा विश्वास. अर्थात हे लोक अगदीच अपरिचित नसत. आपल्याकडे खेड्यांमध्ये लोक जसे गावच्या पोस्टमनला ओळखतात आणि त्यालाही बहुतेक सगळ्या कुटुंबांची इत्थंबूत माहिती असते तसेच गावात येणारे मेलमन संबंधित कुटुंबांचे चांगले परिचित असायचे. हे मेल कॅरियर्स लहान मुलांना अपेक्षित ठिकाणी पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडायचे आणि कुणी आजारी असेल तर त्याची काळजीही घ्यायचे. शहरांपासून दूर एका कोपर्यात वसलेल्या खेड्यांमधल्या लोकांसाठी तो एक महत्त्वाचा दुवा होता. त्यांना ‘आपल्या’ माणसांशी जोडणारा...
आज दळणवळणाचे अनेक सुरक्षित, सोयिस्कर पर्याय उपलब्ध झाले आहेत. जग जवळ आलं आहे. फोनच्या एका बटणावर कितीही लांबच्या माणसाशी सहज संपर्क साधता येतोय. मनात आलं की गाडी काढून हवं तिथे जाणं नवीन राहिलेलं नाही. पण म्हणून दळणवळणाच्या इतिहासातल्या या पानाची खुमारी कमी थोडीच होणार? तुम्हाला काय वाटतं?
लेखिका : स्मिता जोगळेकर