computer

कोण आहे हा रणदीप होथी आणि याने इलॉन मस्कला कोर्टात खेचण्याचे काय कारण आहे?

जगप्रसिद्ध टेस्ला कंपनीचा सीईओ इलॉन मस्क अलीकडे कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. इलॉन मस्कला जगातील एक अतिश्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाते. पण, कधीकधी जसा बलाढ्य हत्ती एका छोट्या मुंगीसमोर गुडघे टेकतो तसेच काही आता इलॉन मस्कच्या बाबतीतही घडले आहे. या अतिश्रीमंत व्यक्तीला एका भारतीय अमेरिकन विद्यार्थ्याने कोर्टात खेचले आहे. या भारतीय अमेरिकन विद्यार्थ्याचे नाव आहे, रणदीप होथी.

कोण आहे हा रणदीप होथी आणि याने इलॉन मस्कला कोर्टात खेचण्याचे काय कारण जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

रणदीप होथी मिशिगन विद्यापीठात आशियाई भाषा आणि संस्कृतीचा अभ्यास करत असून याच विषयावर तो प्रबंध लिहित आहे. रणदीप होथी नेहमीच टेस्लाविरोधात सोशल मीडियातून काहीना काही पोस्ट लिहित असतो. वस्तुत: टेस्ला विरोधात पोस्ट लिहिणारे ते एकटेच नाही तर त्यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर एक मोठा समुदाय आहे. ज्यामध्ये टेस्लाचे माजी कर्मचारी, होथीसारखेच काही विद्यार्थी आणि इतर काही उद्योजक आहेत. $TSLAQ असा हॅशटॅग वापरून हा ग्रुप सतत टेस्ला विरोधात काही ना काही पोस्ट करत असतो.

रणदीप होथी बर्कली मध्ये राहतो तर त्यांचे आई-वडील फ्रेमॉंटमध्ये. याच ठिकाणी टेस्लाचा एक ऑटो प्लांट आहे. होथी एकदा या प्लांटला भेट द्यायला गेला तेव्हा तिथल्या सुरक्षा रक्षकाने त्याला अडवले. या सुरक्षा रक्षकाची आणि रणदीपची चांगलीच हातापाई झाली होती. त्यानंतर रणदीप होथी इलॉन मस्कच्या नजरेत आला. त्याच दिवशी होथीने टेस्ला प्लांट मधील एका कारचा फोटो घेतला होता आणि काही दिवसांनी तो सोशल मिडीयावर पोस्ट केला. हा फोटो पोस्ट केल्यानेही तो मस्कच्या नजरेत आला होता.

$TSLAQ ग्रुपचे मेंबर वेगवेगळ्या ट्विटर अकाउंटवरून सतत टेस्ला कंपनीला धारेवर धरत असतात. फक्त टेस्ला विरोधात सोशल मिडीयावर काही ना काही लिहिण्यासाठी म्हणून यातील काही लोकांनी फेक अकाउंट काढले आहे. होथीनी देखील @skabooshka या टोपण नावाने ट्वीट केले आहे. २०१८ मध्ये होथी आणि त्याच्या भावाचे हे फेक अकाउंट अशाच आणखी एका फेक अकाउंटने उघडे पाडले होते. होथीचा भाऊ टेस्लाची स्पर्धक कंपनी असलेल्या फोक्सव्हॅगनमध्ये कर्मचारी आहे. तो सतत टेस्ला विरोधात काही ना काही लिहित असतो.

इलॉन मस्क याने त्याच्याबद्दल फोक्सव्हॅगनमध्ये तक्रारही केली होती. त्यानंतर इलॉन मस्क आणि होथी यांच्यात असेच सोशल मिडीयावर भांडण रंगले होते. होथीने आपल्या ट्वीटर अकाउंटवर आपली ओळख देताना, स्वतःला एक संशोधक/परीक्षक म्हटले आहे. सध्या तो कार्पोरेट कंपन्यांतील घोटाळे उघड करण्याचे काम करत असल्याचे त्याने यात लिहिले आहे. तो म्हणतो, “मी कार्पोरेट कंपन्यातील घोटाळे उघडकीस आणणारा एक रिपोर्टर असून सध्या फक्त टेस्ला कंपनीवर मी लक्ष केंद्रित केले आहे. जे कोणी प्रवासी, पर्यटक असतील, पत्रकार, इत्यादी असतील त्यांनी याविषयावर बोलण्यासाठी मला थेट मेसेज करावा.”

२०१९ मध्ये इलॉन मस्कने फोक्सव्हॅगनच्या ट्वीटर अकाउंट वर होथीच्या भावाबद्दल तक्रार केली होती. त्याच्या या ट्वीटमुळेही तो वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. मस्कच्या या ट्विटला उत्तर देताना होथी म्हणाला होता, “एक दिवस टेस्ला संपलेली असेल. ही माझी प्रतिज्ञा आहे. आणि इलॉन मस्क तुरुंगाची हवा खात असेल.” हे ट्विट त्याने २० एप्रिल २०१९ मध्ये केले होते.

होथीने इलॉन मस्क विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या मते टेस्लाचा सीइओ इलॉन मस्कने त्याला दहशतवादी संबोधले होते आणि त्याच्यावर टेस्लाच्या कर्मचाऱ्यांना मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही लावण्यात आला होता. जो अर्थातच, खोटा होता. इलॉन मस्क माझ्याविरोधात अपमानजनक भाषेत सोशल मीडियातून पोस्ट करत आहेत, असेही त्याने या आरोपपत्रात म्हटले आहे.

मस्कने होथीवर आरोप करणारा एक इमेल एका संपादकाला पाठवला होता. त्या संपादकाने हा इमेल ट्विटरवर पोस्ट केला. मस्कने होथीविरोधात गुन्हा दाखल केला होता, पण न्यायालयाने पुरावा मागितल्यावर त्यांनी हा खटला मागे घेतला.

आता होथीने यातूनच इलॉन मस्कवर खटला दाखल केला आहे. कॅलिफोर्नियाच्या कोर्टात हा खटला सुरु आहे. होथी ने केलेले आरोप खोटे असून हा खटला रद्द करण्यात यावा असा विनंतीवजा अर्ज इलॉनने न्यायाधीशांना केला होता, पण न्यायाधीशांनी मस्कचा हा अर्ज फेटाळून लावला आहे. पहिल्या फेरीत तरी होथीने इलॉन मस्कला मात दिली आहे.

होथीला जर या खटल्यात विजय मिळाला तर इलॉन मस्कसाठी हा खूप मोठा पराभव असणार आहे. हा खटला कोर्टात असल्याने होथीने टेस्ला विरोधात अलीकडे कोणतीच पोस्ट केलेली नाही. त्याच्या मते, “ज्या द्वेषयुक्त भावनेने टेस्लाने माझ्याविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे, ते पाहता सध्या मी त्यांच्याविरोधात ट्विटरवर काही न लिहिलेलेच बरे.” न्यायाधीश ज्युलिया स्पेन यांनी त्याचा मानहानीचा दाव्याला हिरवा झेंडा दाखवला असल्याने कदाचित तो पुन्हा टेस्लाविरोधात ट्विटरवर कार्यरत होऊ शकतो. होथीच्या या खटल्यासाठी TSLAQ ग्रुपमधील त्याचे साथीदार स्वतःहून निधी गोळा करत आहेत. होथीने एकदा टेस्लाच्या प्लांटवरून ड्रोन शूट करून दाखवले होते की, टेस्लाच्या गाड्यांचे पार्ट्स देखील हातानेच जोडले जातात. टेस्लाने केलेल्या दाव्यात काहीही तथ्य नाही. त्यांच्या दाव्यानुसार त्यांनी तयार केलेला गाड्या या मशीनद्वारे जोडल्या जातात, पण या दाव्यातील फोलपणा त्याने दाखवून दिला होता.

या खटल्याच्या पहिल्या फेरीत तरी इलॉन मस्कला हार मानवी लागली आहे, पण अजून हा खटला संपला नाही. त्यामुळे याचा निकाल कुणाच्या बाजूने होईल, हे सध्या तर सांगणे कठीण आहे.

परंतु जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीला कोर्टात खेचून रणदीप होथीने हवा केली आहे, हे मात्र खरे.

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required