computer

जगातली सर्वात उंच गणपतीची आणि हनुमानाची मूर्ती कुठं आहे ठाऊक आहे? नाही, मग तर नक्कीच वाचा..

भारतीयांचं भव्यदिव्यतेचं वेड तर तुम्हाला ठाऊक आहेच. दक्षिणेतली गोपुरं याला साक्षी आहेत. या गोपुरांसोबतच भारतात आहेत काही भव्यदिव्य मूर्त्या, हिमाचलपासून कन्याकुमारीपर्यंत विखुरलेल्या. 

आज आम्ही अशाच काही मूर्त्या घेऊन आलो आहोत. 'दर्शनमात्रे मन' म्हणणाऱ्या आमच्या वाचकांना इ-दर्शन घडवण्यासाठी...

 

मुरडेश्वर, उत्तर कर्नाटक

उत्तर कर्नाटकातल्या भटकळ तालुक्यात हे मुरडेश्वर नावाचं  गांव आहे. गावातल्या श्रीशंकराच्या नावावरून पडलेलं. शंकराची तशी मुरडेश्वर, हटकेश्वर अशी अनेक नावांनं मंदिरं आहेत.  हे त्यातलंच एक. याचं वैशिष्ट्य असं की हे मंदिर अरबी समुद्राच्या काठी वसलंय आणि इथली मूर्ती गाभार्‍यात नसून चक्क मंदिराबाहेर आहे.  या मूर्तीची उंची आहे १२३ फूट  आणि शेजारचं गोपूर- ज्याला राज गोपूर असंही म्हणतात ते तर या मूर्तीहूनही उंच आहे. 

समुद्राकाठी असलेली ही मूर्ती समुद्राच्या पार्श्वभूमीवर अधिकच धीरगंभीर दिसतेय. 

कवी थिरूवल्लूवर , कन्याकुमारी

कन्याकुमारीला जिथं बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदी महासागर यांचा जिथं संगम होतो, तिथंच प्रसिद्ध तमिळ कवी आणि तत्वज्ञ थिरूवल्लूवर यांचा पुतळा उभारण्यात आलाय. नुसत्या पुतळ्याची उंची आहे ९५ फूट, पण त्याच्या खाली असलेल्या चौथर्‍यासह जर ती उंची मोजली, तर भरते चक्क १३३ फूट. फोटोत पाहिलं तर पुतळ्याच्या पायाशी उभी असलेली माणसं किती लहान दिसतात यावरून या पुतळ्याच्या भव्यतेची कल्पना यावी. 

 

हर की पौडी, हरिद्वार

आता उत्तराखंडमध्ये असलेल्या हरिद्वारमधला ’हर की पौडी’ हा एक महत्वाचा घाट आहे. ’हर की पौडी’ म्हणजे शंकराचे चरण. तर असं मानलं जातं की समुद्रमंथनातून तयार झालेलं अमृत स्वर्गात नेलं जात असताना देव-दानव अमृत मिळवण्यासाठी भांडत होते. त्यामुळं जाता-जात विश्वकर्म्याच्या हातून तो घट हिंदकळला आणि अमृताचे काही थेंब जमिनीवर सांडले. यातले काही थेंब हरिद्वारमध्येही पडले. त्या कारणानं आणि एकेकाळी इथंच विष्णू-शंकराची भेट झाली होती अशीही एक कथा असल्यामुळं हा ’हर की पौडी’ घाट प्रसिद्ध आहे.

इथंच एक १०० फूट उंचीची प्रचंड आकाराची शंकराची मूर्ती उभारण्यात आलीय. 

जाखू मंदिरातील हनुमान मूर्ती, सिमला

जाखू म्हणजे यक्ष. तर आपल्या या अंजनीसुताला तिथं यक्ष मानलं जातं. इथली कथा अशी आहे की, संजीवनी बुटी शोधायला जाताना हनुमानाने तिथं विश्रांती घेतली होती. आधीच समुद्रसपाटीपासून ८००० फुटांवर असलेल्या डोंगरावर ही १०८ फुटांची मूर्ती उभी केलीय. या मूर्तीचा शेंदरी रंग आसपासच्या हिरव्या रंगातून चटकन उठून दिसतो. 

सिमल्यातल्या ’रिज’वर फिरायला गेलात आणि दक्षिणेकडे नजर टाकलीत, तर तिथेही तुम्हाला ही मूर्ती सहज दिसेल. या जाखू टेंपलला जाताना मात्र चांगलीच वाट लागते. एकतर सरळ चढणीचे आणि वळणावळणाचे रस्ते आणि मंदिरात पोचल्यावर तिथली माकडं. तुमचा सेलफोन तर ठेवणारच नाहीत, पण एका पायात बूट घालेपर्यंत दुसर्‍या पायाचा बूट त्यांनी कधी पळवला हे ही तुम्हाला कळणार नाही.

वीर अभय अंजनेय हनुमान स्वामी

हनुमानाची ही मूर्ती आहे आपल्या आंध्रातल्या विजयवाड्याजवळच्या परितळा गावात. ही १३५ फूट उंचीची मूर्ती जगातली सर्वात उंच असलेली हनुमानाची  मूर्ती आहे, इतकंच नाही, तर विकीपिडियाच्या माहितीनुसार ही भारतातली सर्वात उंच मूर्ती आहे. 

तथागत बुद्ध

सिक्किममधल्या रवंगळ(Ravangal) इथं एक बुद्ध पार्क आहे. त्या ठिकाणाला तथागत स्थळही म्हटलं जातं.  या पार्कात मध्यभागी १३०फूट उंचीची बुद्धाची मूर्ती आहे. इथून जवळच गोंपा नावाचं अनेक शतकांपासून चालत आलेलं जुनं तीर्थस्थळ आहे. तसंच रलांग मोनास्ट्री नावाची तिबेटी बौद्ध लोकांची महत्वाची मोनास्ट्री आहे. 

पद्मसंभव

पद्मसंभव म्हणजेच गुरू रिपोंचे हे आठव्या शतकात होऊन गेलेले बौद्ध गुरू होते. त्यांना तिबेट, नेपाळ, भूतान इतकंच नाही तर भारताच्या  हिमालयाकडल्या राज्यांत जिथं बुद्धाचं दुसरं रूपच मानलं जातं. ही १२३ फूट मूर्ती आहे हिमाचल प्रदेशातल्या रावळसर सरोवराच्या इथं. कधी गेलात तर नक्की या मूर्तीचं दर्शन घ्या.

चिन्मय गणेश

चिन्मय गणेश ही जगातली सर्वात उंच गणेशमूर्ती आहे आणि ती आहे आपल्या कोल्हापूरात. मूर्तीची उंची आहे ८५फूट. हिचं दर्शन घेण्यासाठी वाटही वाकडी करावी लागत नाही. मुंबई-बंगळुरू म्हणजेच NH-4 वरून जाताना दुरूनसुद्धा ही मूर्ती स्पष्ट दिसते. 

गोमटेश्वर बाहुबली

या सर्व मूर्त्यांमधली ही मूर्ती सर्वात प्राचीन आहे.  कर्नाटकातल्या श्रवणबेळगोळ इथली ही मूर्ती ५८ फूट ऊंचीची आहे. 

सबस्क्राईब करा

* indicates required