कथा जन्माची : क्यूट अँड स्वीट टेडी बेअरच्या जन्मामागे खरं तर अस्वलाच्या शिकारीची गोष्ट आहे....
रोजच्या आयुष्यात आपण वापरात असलेल्या बऱ्याच वस्तूंचा शोध कधी लागला हे आपल्याला ठाऊकच नसतं. आपण या गोष्टी इतक्या सहजपणे वापरतो की त्यांचा कधी शोध लागला असेल हे आपल्या लक्षातही येत नाही. टूथब्रश पासून ऑप्टिकल फायबर पर्यंत सर्व शोध कसे लागले, कोणी लावले ही माहिती मिळवणं फार मनोरंजक असतं. बोभाटाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशा अनेक लहानसहान आणि महान शोधांच्या रंजक कथा सांगणार आहोत.
आज आपण सुरुवात करत आहोत मुलींचा लाडका, क्युट, मुलायम टेडी बेअर पासून. मंडळी टेडी बेअर हे खेळणं कसं तयार झालं यापाठी सुद्धा एक गमतीदार गोष्ट आहे. चला तर जाणून घेऊया त्याबद्दल.
इतिहासात थोडं मागे जाऊ...
वर्ष होतं १९०२. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट हे मिसिसिपी जवळ अस्वलाच्या शिकारीवर गेले होते. त्याकाळातील पद्धतीनुसार शिकार करण्यापूर्वी गुलाम शिकार आणून मालकांसमोर ठेवायचा आणि त्यानंतर मालक त्याची सहजपणे शिकार करायचा. म्हणजे मालकाला जास्त हालचाल करावी लागत नसे.
याच प्रकाराला अनुसरून थिओडोर रूझवेल्ट यांच्यासाठी सुद्धा अस्वलाला जंगलातून आणण्यासाठी माणसं नेमली होती. यात हॉल्ट कोलीअर नामक एक गुलाम होता जो या कामावर देखरेख ठेवत होता. प्लॅन असा होता की कोलीअरने अस्वलाला जंगलातून रूझवेल्ट यांच्या समोर आणून सोडायचं आणि रूझवेल्ट यांनी अस्वलाला मारायचं. त्यानुसार कोलीअरने अस्वलाला रूझवेल्ट बसले होते त्या जागेपर्यंत आणून सोडलं पण तो पर्यंत उशीर झाला होता आणि रूझवेल्ट जेवणासाठी निघून गेले होते.
आता शिकार म्हणून आणलेलं अस्वल शांत कसं बसेल. त्याने शिकारी कुत्र्यावर हल्ला केला आणि नासधूस केली. पण कोलीअरने अस्वलाला न मारता त्याला फक्त जखमी केलं. ही शिकार रूझवेल्ट यांची आहे असा विचार करून त्याने अस्वलाला झाडाला बांधून ठेवलं. जेव्हा रूझवेल्ट जेवण आटोपून आले तेव्हा त्यांनी कोलीअरच्या पराक्रमाचं कौतुक केलं पण कमजोर आणि अर्धमेल्या अस्वलाचा जीव घेण्यास नकार दिला.
ही बातमी त्याकाळात प्रचंड गाजली. वॉशिंगटन पोस्टने या बातमीला उचलून धरत क्लिफोर्ड बॅरीमन यांनी तयार केलेलं एक व्यंगचित्र प्रकाशित केलं. या व्यंगचित्रात रूझवेल्ट, अस्वलाला बांधून ठेवलेला गुलाम आणि एक गोंडस अस्वल दिसत असून रूझवेल्ट अस्वलाला मारण्यासाठी नकार देताना दिसत आहेत. खरं तर हे अस्वल कैक पटीने मोठं होतं पण व्यंगचित्रात त्याला लहान दाखवण्यात आलं. हे व्यंगचित्र आणि त्यातील अस्वल लोकांमध्ये प्रचंड प्रसिद्ध झालं.
या व्यंगचित्रात दिसत असलेल्या अस्वलापासून मॉरिस मिचटॉम या खेळणी बनवणाऱ्या व्यावसायिकाला एक कल्पना सुचली. त्याने याच प्रकारचे अस्वल खेळणी म्हणून बाजारात आणले आणि त्याला नाव दिलं ‘टेडी बेअर’. यातला टेडी हे नाव म्हणजे थिओडोर रूझवेल्ट या नावातला थिओडोर. अश्या प्रकारे आजच्या काळातील टेडी जन्माला आला.
टेडी बेअर बाजारात आल्यानंतर लहान मुलांमध्ये आणि स्त्रियांमध्ये तो प्रसिद्ध झाला. मागणी वाढू लागली. मॉरिस मिचटॉम आणि त्यांच्या पत्नीने हा व्यवसाय आणखी वाढवला आणि Ideal Novelty and Toy Company या नावाची कंपनी सुरु केली. ही कंपनी आजही खेळण्यांच्या बाजारात आपला दबदबा कायम राखून आहे.
योगायोग म्हणजे टेडी बेअर सारखं दिसणारं खेळणं बनवण्याची सुरुवात त्याच काळात जर्मनी मध्ये देखील सुरु झाली होती. मार्गरेट स्टिफ या महिलेची ती कल्पना होती. आश्चर्य म्हणजे जर्मनीत हे खेळणं फ्लॉप ठरलं. लोकांचा थंड प्रतिसाद बघून मार्गरेट यांनी आपला मोर्चा अमेरिकेत वळवला आणि तिथे हे खेळणं विकण्यास सुरुवात केली. त्यांच्या नावावरून याला स्टिफ बेअर म्हटलं जाऊ लागलं. स्टिफ बेअर हे त्याकाळात सर्वात महाग मिळत. आजच्या काळातही जुन्या वस्तूंचा संग्रह करणाऱ्यांच्या बाजारात जुन्या स्टिफ बेअरना प्रचंड किमतीला मागणी आहे.
मंडळी अश्याच लहानसहान गोष्टींच्या पाठीमागे एक मोठा इतिहास लपलेला असतो. यांना लहान शोध म्हणता येणार नाही कारण हे शोध अत्यंत महत्वाचे ठरले आहेत. अशाच काही भन्नाट शोधांची कथा वाचूयात पुढच्या भागात.