पुतिनचे फ्रॉड उघडकीस आणणारा ॲलेक्सी नेवाल्नी कसा मेला ? भाग-१
रशियातले सत्ताविरोधी नेते ॲलेक्सी नेवाल्नी १६ फेब्रुवारीला उत्तर रशियातल्या वैराण अती थंड तुरुंगात वारले.
रक्तात गुठळी झाल्यामुळं गेले असं सरकारनं सांगितलं. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की गुठळ्या होण्याची व्याधी त्यांना नव्हती. पाझरलेल्या बातमीनुसार नेवाल्नीना हळूहळू प्रभावी ठरणारं विष दिलं होतं, म्हणूनच त्यांचं शव नातेवाईकांच्या हवाली करायला सरकारनं नकार दिला.
तुरुंगातल्या लोकांनी सांगितलं की दुपारी फिरायला गेले असताना ते कोसळले आणि उपचारांचा उपयोग झाला नाही.
नेवाल्नी दररोज सकाळी सहा वाजता फिरायला जात असत. तुरुंगाचा तो नियमच होता. मग दुपारी ते बाहेर कां पडले या प्रश्नाचं उत्तर द्यायला रशियन सरकार तयार नाही.
अमेरिका, जर्मनी, फ्रान्स इत्यादी देशांच्या प्रमुखांनी जाहीर केलंय की नेवाल्नी यांच्या मृत्यूला रशियाचे प्रेसिडेंट पुतिन जबाबदार आहेत.
ही झाली मुत्सद्दी भाषा. सामान्य माणसाच्या भाषेत पुतिन यांनी नेवाल्नी यांचा खून केला आहे. तसा आरोप रशियातल्या खूप लोकांनी केला आहे.
नेवाल्नींना पुतिननी अतिरेकी असा शिक्का मारून तुरुंगात ढकललं होतं. बोगस न्यायालयातल्या बोगस न्यायमूर्तींनी पोलिस ठाण्यात कोर्ट भरवून नेवाल्नीना १९ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली होती.
नेवाल्नींनी अनेक वेळा तुरुंगाची हवा खाल्ली होती. त्यांचा जीव घेणारा आणि शेवटला तुरुंगवास २०२१ सालच्या जानेवारी महिन्यात सुरु झाला. १७ जानेवारीला ते बर्लीनहून परतले ते तुरुंगातच पोचले.
नेवाल्नी बर्लीनला कशासाठी गेले होते?
नेवाल्नींचा जन्म (१९७६)मॉस्कोच्या जवळच्या एका गावातला. आई रशियन आणि वडील युक्रेनी. रशियाची आर्थिक स्थिती हलाखीची होती. दैनंदिन जगण्यासाठी लागणाऱ्या वस्तू महाग झाल्या होत्या, दुकानातून गायब झाल्या होत्या. दूध घेण्यासाठी ॲलेस्की तासनतास रांगेत उभा रहात असे. चॉकलेट मिळणं म्हणजे चैन होती. कसलं लहानपण आणि कसलं काय.
ॲलेक्सीचं आजोळ चेर्नोबिल. उन्हाळ्यात, सुटीत ॲलेक्सी आजोळी जात असत.१९८६ साली चेर्नोबिलमधल्या अणुशक्ती केंद्रात स्फोट झाला. केंद्रातून झालेल्या उत्सर्जनातून अतीघातक विषारी कण आसमंतात पसरले. जमीन, पाणी, हवा प्रदुषित झाली. सरकारनं आपली जबाबदारी झाकली. सारं काही ठीक आहे असं दाखवण्यासाठी, जमीन प्रदुषित झालेली नाही हे दाखवण्यासाठी सरकारनं शेतकऱ्यांना सांगितलं की जमिनीतून बटाटे उकरा, खा. जगाला रशियन माणसं बटाटे खाताना दिसली पण नंतर ती मेली हे सरकारनं जगाला सांगितलं नाही. चेर्नोबिलचा, सरकारच्या बेफिकीर वर्तनाचा अनुभव ॲलेक्सीनं घेतला. चेर्नोबिलला आजोबांकडं रहायला गेलं की तिथले हाल, स्फोटानंतर मरण पावलेल्या लोकांच्या कहाण्या कानावर येत.
१९९० नंतर कम्युनिझम कोसळल्यावर येल्तसिन अध्यक्ष झाले.१९९५ च्या सुमाराला नेवाल्नी यांनी सार्वजनिक, राजकीय कामात भाग घ्यायला सुरवात केली. रशियन देशीवाद, पश्चिमेची बाजारलक्ष्यी अर्थव्यवस्था, लिबरलिझम असे नवे विचार येल्तसिन यांनी अंगिकारले. नेवाल्नींवर त्या विचारांचा प्रभाव होता. काही काळ ते एका लिबरल पक्षाचे सक्रीय सदस्यही झाले.
कम्युनिझमच्या काळात सत्तेचं कमालीचं केंद्रीकरण झालेलं होतं, केंद्रीकरण हाच कम्युनिझमचा व्यवहार होता. कम्युनिष्ट सत्ता कोसळली याचाच अर्थ कम्युनिष्ट व्यवहार आणि विचारांपासून माणसं दूर जाऊ पहात होती. नेवाल्नी त्याच प्रवाहात होते. त्यांचा हा राजकीय आणि व्यावहारीक कल त्यांच्या सार्वजनिक कामाच्या शैलीमधे प्रभावी ठरला. नेवाल्नी स्थानिक प्रश्न घेऊन स्थानिक माणसांमधे काम करू लागले.
रशियातले रस्ते खराब असतात, मुंबईतल्या रस्त्यांसारखे. खड्ड्यांत रस्ते की रस्त्यात खड्डे असा संभ्रम पडावा अशी रस्त्यांची अवस्था असे. नेवाल्नी या खड्ड्यांना रशियन खड्डे असं म्हणत. हे खड्डे नष्ट झाले पाहिजेत यासाठी स्थानिक लोकांना नेवाल्नी संघिटत करत. आरोग्य व्यवस्था कोलमडली होती. नेवाल्नी या व्यवस्थेला रशियन आरोग्य व्यवस्था म्हणत. तसंच होतं रशियन शिक्षण. सोवियेत युनियनला जगातल्या कामगारांची चिंता होती, रशियातल्या नागरिकांकडं त्यांचं लक्ष नसे. नेवाल्नी ही सोवियेत काळातल्या अवस्थेला प्रतिक्रिया होते.
येल्तसिनना कारभार करता येईना. त्यांनी आपले व्यक्तिगत काँटॅक्ट्स, कुटुंब, जमा केलेले काही ओलिगार्क गोळा केले. (ओलिगार्क या इंग्रजी शब्दाला मराठीत समानार्थी शब्द सापडत नाही. ओलिगार्क म्हणजे राजकीय प्रभाव असलेले, राजकारणाचा फायदा करून मोठे झालेले बिझनेसमन). या टोळीनं व्लादिमिर पुतिन या माणसाला अध्यक्ष केलं. पुतिन हा माणूस केजीबी या गुप्तचर संघटनेतला एक सामान्य अधिकारी होता, त्याच्या नावावर कोणत्याही छान कामगिरीची नोंद नव्हती, म्हटलं तर हा माणूस एक अपयशच होता. पण पुतिनचं नशीब थोर, स्वतःला पुढं ढकलण्याचं कसब त्याच्याजवळ होतं, काळाने टाकलेले फासे त्याच्या बाजूनं पडले म्हणायचं.
२००० साली पुतीन अध्यक्ष झाले. येल्तसिन यांचं खाजगीकरण पुतिननी वेगानं पुढं चालवलं. येल्तसिननी गोळा केलेले ओलिगार्क हाताशी धरले. केजीबीतलं तंत्र वापरलं. सत्तेवर मजबूत पकड बसवली. पुन्हा एकदा सोवियेत काळातलं सत्तेचं केंद्रीकरण केलं. सत्ता पुतिन यांच्या एकट्याच्या हाती केंद्रीत झाली.
मॉस्कोमधे सक्रीय असलेले नेवाल्नी हे पहात होते.
पुतिन भाग्यवान होते. तेलाच्या किमती चढल्या, पुतिन यांना काहीही करावं लागलं नाही, रशियन अर्थव्यवस्था तेजीत आली, लोकांच्या हाती पैसा खेळू लागला. पुतिन यांचा एकूण वकूब मर्यादित होता, त्यांना अर्थव्यवस्था-राज्यविचार यांच्याशी देणंघेणं नव्हतं, त्यांची वाढ हडेलहप्पी करणाऱ्या केजीबीत झाली होती. परिणामी रशियाच्या उर्जितावस्थेतल्या अर्थव्यवस्थेचे फायदे समाजातले श्रीमंत आणि मध्यम वर्गीयांना मिळाले. सामान्य रशियाची अवस्था वाईटच होती.
पैसे आणि भ्रष्टाचार, दोन्ही बोकाळले. पुतिन सत्ताधारी झाले आणि रशिया बदलला. रशिया कमालीचा भ्रष्ट झाला, समाजातला मोठा वर्ग खुशालचेंडू झाला.
तळातल्या लोकांमधे वावरणाऱ्या नेवाल्नीना पुतिन खटकले. येव्हाना नेवाल्नी वकिलीची परिक्षा पास झाले होते. पण वकिली करण्यापेक्षा लोकांना संघटित करणं त्यांनी पत्करलं. नेवाल्नी हे कम्युनिकेशनच्या नव्या युगातले गृहस्थ. इंटरनेट आणि ईमेल या माध्यमांचा वापर करायला ते शिकले. नेवाल्नीवर हॉलीवूड चित्रपटाचा प्रभाव होता. स्टार वॉर्स त्यांनी अनेक वेळा पाहिलं होतं. डेटा गोळा करणं, डेटाचा वापर करून नवं जग निर्माण करता येतं हे त्यांनी स्टार वॉर्स पहाताना मनाशी धरलं.
एक आधुनिक हीरो त्यांनी कल्पिला. जगातल्या भ्रष्टाचार आणि अनाचाराविरोधात आधुनिक साधनांचा वापर करून संघर्ष करणारा हीरो. कल्पिलेला हीरो ते स्वतःच झाले.
रशियातला भ्रष्टाचार आपल्याला संपवायचा आहे, राजकारण आणि सरकार भ्रष्टाचार मुक्त करायचं आहे, हे कार्य लोकांना तळातून संघटित करून पार पाडायचं आहे असं त्यांनी ठरवलं.
एक लढवय्या नेवाल्नी जन्माला आला.
लेखक : ज्येष्ठ पत्रकार -निळू दामले