बॉलिवूडचे पोलीस अधिकारी अभिनेते इफ्तिखार

मुंबईचे पोलिस कमिशनर कोणीही असो पण ७० आणि ८० च्या दशकात हिंदी चित्रपट पाहणाऱ्यांच्या मनात पोलिस कमिशनर म्हणून एकच प्रतिमा होती ती म्हणजे अभिनेता इफ्तिखार खान ! आज ४ मार्च त्यांचा स्मृतिदिवस.पोलिस कमिशनर ही प्रतिमा प्रत्येकाच्या मनात इतकी ठसली होती की,एअरपोर्टवर ड्यूटी करणारे पोलिस,येताना जाताना रस्त्यावरील ट्रॅफिक हवालदार त्यांना पाहताच सॅल्यूट करत असत.एखाद्या भूमिकेची अभिनेत्याने मोठी छाप सोडण्याचे याव्यतिरिक्त दुसरे कोणते उदाहरण नसेल.पण आश्चर्याची गोष्ट अशी की, मुळात इफ्तिकार यांना अभिनेता व्हायचे नव्हते. त्यांना चित्रकार आणि गायक व्हायचे होते.
चित्रकार होण्यासाठी त्यांनी आवश्यक ते शिक्षणही घेतले होते.लखनौ स्कूल ऑफ फाइन आर्टसमधून त्यांनी डिप्लोमा केला होता.मेरिस कॉलेजमध्ये संगीतविषयक दोन वर्षाचा अभ्यासक्रमही पूर्ण केला होता आणि अगदी सुपरस्टार के.एल.सहगल यांच्यासारखे गात असत परंतु त्याकाळात संगीत आणि चित्रकारी हे दोन्ही क्षेत्र पैसे मिळवून देणारे नव्हते.त्यामुळे घरखर्च भागविण्यासाठी इफ्तिखार यांनी कानपूर येथील एका ब्रिटीश लेदर फॅक्टरीत नोकरी पकडली. पण नियतीच्या मनात दुसरेच काही होते.नोकरीवरून सुट्टी घेऊन १९४३ मध्ये कलकत्ता फिरायला आलेल्या इफ्तिखार यांनी गायक बनण्याचे स्वप्न पूर्ण करता येते का? याची संधी शोधली आणि ते कलकत्ता एच.एम.व्ही.चे मुख्य संगीतकार कमल दासगुप्तांना भेटायला गेले.दासगुप्तांना त्यांचा सहगलसाहेबांसारखा आवाजच नाही तर त्यांचे एकंदरीत व्यक्तिमत्वच आवडले आणि त्यांनी त्यांच्या एम.पी. प्रोडक्शन या कंपनीत त्यांची स्क्रीन टेस्टही घेतली. तिथे इफ्तिखार यांची संगीतकार एस.डी. बर्मन यांच्याशी ओळख झाली. त्यावेळेस सचिनदा दोन नवीन गायकांची टेस्ट रेकॉर्डिंग करत होते. हे दोन नवीन गायक होते. मग इफ्तिखार यांनीही दोन गाण्यांचे रेकॉर्डिंग आणि स्क्रीन टेस्ट देऊन कानपूरला परत आले.
काही दिवसांनंतर त्यांनी गायलेल्या दोन गाण्यांची रेकॉर्ड बाजारात रिलीज झाल्या.त्याकाळात ग्रामोफोन डिस्क मिळायच्या.या डिस्कवर दोनच गाणी रेकॉर्ड असायची.इफ्तिखार यांनी स्वतः पैसे खर्च करून काही डिस्क विकत घेऊन आपल्या नातेवाईक आणि मित्रांना वाटल्या.कानपूरमधील मित्रकंपनीत या डिस्कमुळे ते सुपरस्टार झाले.कारण एच.एम.व्ही.सारख्या कंपनीने गाण्याच्या डिस्क रिलीज केल्या होत्या.कानपूरमधील स्टारपणाच्या आनंदात इफ्तिखार आपण कलकत्त्याला दिलेल्या स्क्रीन टेस्टविषयी विसरुनच गेले होते. पण अवघ्या सहा महिन्यांनंतर त्यांना एम.पी.प्रॉडक्शनची अभिनयासाठी बोलावले असल्याची तार मिळाली.
आता मात्र इफ्तिखार यांची द्विधा मनःस्थिती झाली. कानपूरमधील सुप्रसिध्द गायक म्हणून प्रसिध्दी आणि सुरळीत सुरु असलेली नोकरी करायची की अभिनयाच्या अनिश्चित .दुनियेत पदार्पण करायचे? तेव्हा ते अवघे २३ वर्षांचे होते. पण ही द्विधा मनःस्थिती त्यांच्या वडीलांनी ओळखली आणि त्यांची हिंमत वाढवत त्यांना सांगितले की,जीवनात प्रत्येक क्षेत्रात आपले नशीब आजमावले पाहिजे. आतापर्यंत बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी केल्यास,अभिनय पण करुन पहा. वडीलांनी दिलेल्या प्रोत्साहनाच्या बळावर कलकत्ता चित्रपटसृष्टीला इफ्तिखार नावाचा एक नायक मिळाला.
कलकत्याला इफ्तिखार यांचे चार चित्रपट रिलीज झाले, तकरार, घर, राजलक्ष्मी आणि तू और मैं आणि या चारही चित्रपटांमध्ये त्यांनी नायकाची भूमिका केली होती. पण तेव्हाच १९४६ चे भयानक जातीयवादी दंगे झाले आणि देशाची फाळणी झाली.या दंग्यांमुळे हिंदू - मुस्लिम एकतेला मोठा तडा गेला. परिणामस्वरुप इफ्तिखार यांची एम.व्ही.कंपनीतील नोकरी गेली.त्यांच्या वडीलांनी पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांची इच्छा होती की, इफ्तिखार यांनीही त्यांच्यासोबत पाकिस्तानला यावे. त्यावेळेस इफ्तिखार यांचे लग्न झालेले होते. आपल्या पत्नी व दोन मुली (सलमा आणि सईदा) यांच्यासोबत कलकत्ता येथे राहण्याचा निर्णय इफ्तिखार यांनी घेतला. एक वर्ष संघर्ष केल्यानंतरही कलकत्यात त्यांना काम मिळाले नाही.त्यामुळे फाळणीनंतर पंजाब आणि इतर भागातील कलावंतांनी मुंबईचा रस्ता पकडला त्याप्रमाणे इफ्तिखार यांनीही मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला.
मुंबईत आल्या आल्या संगीताचे घेतलेले शिक्षण त्यांच्या कामी आले.संगीतकार अनिल विश्वास आणि त्यानंतर बॉम्बे टॉकीजचे सर्वेसर्वा अशोककुमार यांच्याशी झालेल्या भेटीने 'मुकद्दर' या सिनेमातील सेकंड लीड रोल मिळाला. इथे सुरु झाला मुंबईतील चित्रपटसृष्टीचा प्रवास.इफ्तिखार यांनी चित्रपटातून अनेक वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत.पण ते ओळखले गेले ते पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेतच. याच भूमिका त्यांना अधिक मिळाल्यात. बी.आर.चोपडाच्या 'इत्तेफाक' या सिनेमातील त्यांनी रंगवलेला इन्स्पेक्टर तर अफलातूनच.इत्तेफाक राजेश खन्नाची सुरुवातीच्या काळातील फिल्म होती.त्यात सस्पेन्स होता आणि रहस्यमय मर्डर मिस्ट्रीमध्ये तपास अधिकाऱ्याची भूमिका महत्त्वाचीच होती.या भूमिकेने इफ्तिखार यांना ओळख दिली मात्र त्याआधी त्यांनी श्री ४२०, अब दिल्ली दूर नही, पिंजरे के पंछी या चित्रपटातून पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केली होती,पण इत्तेफाकमधील चढलेली वर्दी इफ्तिखार यांना अगदी त्वचेप्रमाणे चिकटून राहिली ती कायमचीच.सुरु झाला पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिका असलेला चित्रपटांचा सिलसिला.... इन्तकाम, जहोनी मेरा नाम, एलान, दी ट्रेन, दाग, अपराध, लोफर, जीवन संग्राम, पत्थर और पायल, बदला, मजबूर, खेल खेल में, आखरी दाव, साजिश, चोरी मेरा काम, एक से बढकर एक, जानेमन, फकिरा, चांदी सोना, पापी, बेशरम, फांसी, खून का बदला खून, झुठा कही का, क्रोधी, डॉन, मंगल पांडे, हादसा, महान, आवाज, कानून क्या करेगा, इन्किलाब, राम तेरा देश, युध्द, गलियों का बादशहा आणि असे अनेक या सर्व चित्रपटातून इफ्तिखार कधी पोलिस इन्स्पेक्टर तर कधी पोलीस कमिशनर बनले काही वेळेस तर डीआयजी अगदी आयजीपी सुध्दा.
पोलिस अधिका-याची भूमिका करण्यासाठी आवश्यक असणारे रुबाबदार व्यक्तिमत्व इफ्तिखार यांचे होतेच. पण त्यांनी डॉक्टर, वकील, जज आणि आचार्य अशाही चरित्र भूमिका केल्यात.त्यांच्या वेगळ्या भूमिकांमध्ये ते लक्षात राहतात दीवार मधील अमिताभ बच्चनला लंबी रेस का घोडा म्हणणारा स्मगलर म्हणून.फार पेवेलियन आणि थ्री हेडेड कोब्रा या हॉलिवूड चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका केल्या होत्या. त्यांची अजून एक महत्त्वाची भूमिका म्हणजे गांधीहत्त्या हा विषय घेऊन बनलेला हॉलिवूडपट फाइव्ह पास्ट फाइव्ह या चित्रपटातील गांधीजींची भूमिका.पण हा चित्रपट दुर्दैवाने जास्त प्रसिध्द झाला नाही. या चित्रपटामुळे नथूराम गोडसेचे महत्त्व वाढेल असे सरकारला वाटल्याने, सरकारने या चित्रपटावर बंदी आणली.
इफ्तिखार यांची आपल्या कामावर फारच श्रध्दा होती. गुलजार यांच्या अचानक या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असतांना महिन्याभरापूर्वी लग्न झालेल्या आपल्या जावयाच्या निधनाची बातमी त्यांना मिळाली परंतु त्यांनी चित्रीकरणातील आपले काम पूर्ण केले आणि मगच आपल्या मुलीला भेटायला गेले.ते ही गुलजार साहेबांना ही बातमी कळल्यानंतर, त्यांनी घरी पाठवले म्हणून!
४ मार्च १९९५ ला आधीच असलेला मधुमेहाचा आजार अधिकच बळावल्यामुळे त्यांचे निधन झाले.पण आजही पोलिस अधिकाऱ्याची भूमिका करून एक निष्ठावान, रुबाबदार पोलिस अधिकारी म्हणून इफ्तिखार चित्रपटप्रेमींच्या मनात नेहमीच जिंवत राहतील याच शंकाच नाही.
- योगेश जगन्नाथ शुक्ल, जळगाव