computer

पीसी-जेसी आणि आऊट भाग-१

काही वर्षांपूर्वी इब्राहिम मुल्ला या मुंबईच्या सॉलीसिटर फर्मने कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली की त्यांच्या अशीलाचे Escrow  accountमध्ये असलेले सुमारे साठ लाख रुपये अफरातफर होऊन गहाळ झाले आहेत. Escrow  account म्हणजे 'थर्ड पार्टी' अकाऊंट असते.जमीनींचे मोठे व्यवहार पार पाडण्यासाठी अशी खाती उघडली जातात.विकत घेणारा काही रक्कम मध्यस्थ असलेल्या अ‍ॅडव्होकेटकडे जमा करतो. अ‍ॅडव्होकेट ही रक्कम बँकेत जमा करून ठेवतो.दोन्ही पार्टीकडून आवश्यक ती कार्यवाही झाली के ते पैसे विक्री करणार्‍याच्या खात्यात जमा केले जातात.सर्वसाधारणपणे हे पैसे  बॅंकेत एफ.डी.मध्ये गुंतवले जातात.इब्राहीम मुल्लाकडे असलेल्या एफ.डी.च्या ज्या पावत्या होत्या त्या खोट्या आहेत असा बँकेचा दावा होता.
आणि बँकेचा दावाही खरा होता.पण एफ.डी.साठी फर्मने दिलेला चेक तर इब्राहीम मुल्लाच्या खात्यातून वळता झाला होता.मग पैसे गेले कुठे ? 
पोलीसांनी तपास सुरु केला. तपासाअंती दहा लाख बँकेत बी. पी. जोशी यांच्या खात्यात जमा होउन काढून घेतलेले पोलीसांच्या निदर्शनास आले
बाकी पन्नास लाख भाईदरच्या बॅकेत जमा होउन काढून घेतलेले आढळून आले.पोलीसांनी तपासांती पाच आरोपींचा पत्ता लावला.त्यापैकी जोशी, मेहेता ,मिश्रा याना अटक करण्यात आली .तपास काम जसजसे पुढे गेले तसतसे जास्तच गहीरे होत गेले त्या तपासाची ही कहाणी.पीसी- जेसी आणि आउट !

बारा जानेवारी २००२ ला संध्याकाळी साडेचार वाजता सरतेशेवटी मला अटक झाली. महिनाभर माझी आणि मेहता,मिश्राची कसून चौकशी चालली होती. चार वाजता विरकर ऍडीशनल सी.पी .ला भेटून परत आला आणि आम्हाला बोलावलं.
'देखो मेहता तेरेको पैला चांस, एफडी रिसिट कौन बनाया? विरकर म्हणाला
'मेरेकु नही मालूम. हू तो वरली मा छू' मेहेताचे वाक्य संपायच्याआत मेहेताच्या दोन्ही कानाखाली आवाज !
दोन मिंट शांतता पसरली.ऑफीसातले टायपिस्ट मध्येच थांबले मेन रोडच्या रहदारीचा आवाज. बाकीचे आयो पण बोलायचे थांबले.
दहा सेकंदानी मेहेताचा रडण्याचा आवाज.
अमावस्येला कुत्रं रडत तशा भेसूर आवाजात.
'जोशी साब अपनाभी नंबर है आज' मिश्रा माझ्या कानात कुजबुजला.


मेहेता परत विरकर च्या समोर बसला.महाडीक वाटच पहात होता. त्यानी मेहेताच्या पाठीत एक जोरात रट्टा हाणला.मेहेता दोन टेबलाच्या गॅप मध्ये.
विरकरनी पाण्याचा ग्लास त्याच्या तोंडावर ओतला.मेहेताचा आवाज अजून भेसूर झाला. तो परत उठून खुर्चीवर बसणार तेवढ्यात विरकरनी खुर्ची वर लाथ मारली.
'निचे बैठ गांडू' -मेहेता जेमतेम त्या फटीत मावला.
विरकरनी एकदा कपाळावरचा घाम पुसला महाडीकला सांगीतलं 'पट्टा काढा महाडीक...कपाटातून महाडीकनं पट्टा काढला.
'ये जीतना मार खायेगा उतना अपनेको कम पडेगा'- मिश्रा पुटपुटला.
विरकरनी मिश्राला विचारलं 'इसकी भैन आयी क्या आज ?
'नही साहेब'मिश्रा म्हणाला 
'फिर रहेने देते है .ती आल्यावर तिच्यासमोर मारतो साल्याला' विरकर म्हणाला
काय रावसाहेब , ऍडीशनलनी बांबू दिला काय आज? समोरच्या टेबलवरून प्रधान साहेबांनी तेल घातलं.खरं म्हणजे ही केस त्याला हवी होती.पण विरकर स्वतःकडे केस मार्क करून घेण्यात हुशार होता.प्रधानला बार असोसिएशनच्या निवडणूकीची भुक्कड केस मिळाली होती.


बँक फ्रॉडमध्ये आरोपी गब्बरअसतात .थर्ड डीग्री जास्त वापरावी लागत नाही. आरोपीपेक्षा नातेवाईकांवर प्रेशर घालायचं मग चारी बाजूनी कमाई! .जोडीला एखादी नवी बाई पण मिळून जाते.पण त्यासाठी आर्थिक घोटाळे समजण्याची अक्कल पाहिजे.अफरातफरीचे नेहेमीचे यशस्वी कलाकार माहिती हवेत
.गणित साधं सोपं असतंय. दोन तीन कारकूनांना मॅनेजरसोबत घेउन यायचं. त्यातल्यात्यात नाजूक जो दिसेल त्याला आधी फटकवायचा. मॅनेजरवर चार चौघात चढायचं.सगळ्ञांना सहा सात तास बसवून ठेवायचं. घरून मोबाइलवर फोन यायला सुरुवात झालीकी फोन हिसकून आपणंच बोलायंच.तोपर्यंत सगळ्यांना मुतायला लागते.


दुसर्‍या दिवशी बँकेच्या दोन बायकांना पंधरा वीस मिनीटं या शो मध्ये बोलवायचं.मग कमाई चालू.पांढरपेशा समाजातले लोक वकीलाला घेउन येत नाहीत.कमीपणा समजतात. अडाणी आरोपीचा वकील त्याच्या आधी पोलिस स्टेशनला येऊन सेटींग लावतो. टॅरीफ ठरलेलं असतंय. महिन्याभराच्या सरावामुळे माझ्या घरून कोणी नाही आलं तरी चालणार होतं
माणसांची गरज अ‍ॅरेस्ट झाल्यावर लागते.आत केलेला पैसा तेव्हा कामाला येतो.थर्ड डीग्री पडत नाही.आत केलेला माल पचवता येतो.थोडीशी रिकव्हरी द्यावी लागते पण ते ओक्केच असतं.
सिनीयर पासून सगळ्यांना बघावंच लागतं तो पुढच्या मॅटरचा इन्शुरन्स प्रिमीयम समजायचा. आयोची बदली झाली की आणखी एक एरिया आपलाच होतो..
महिन्याभराच्या काळात सगळ्या युनीटची नाव मला पाठ झाली होती.

सबस्क्राईब करा

* indicates required