कनिका टेकरीवाल: २१व्या वर्षी कॅन्सरसोबत लढा देऊन,वयाच्या ३२व्या वर्षी विमानं भाड्यानी देणारी कंपनी उभी करणारी मुलगी !
यशाची व्याख्या सध्या बदलली आहे. कमी वयात गाडी बंगला मोठा फायदा देणारा बिझनेस यामागे अनेकांची धावपळ सुरू असते. पण ते इतकेही सोपे नसते. याकामी कित्येकांचे आयुष्यसुद्धा निघून जाते. कारण आयुष्यात येणारे चढउतार कधीकधी धक्के देऊन जातात. अनेकवेळेस कमी वयात यशस्वी होणाऱ्या लोकांमागे त्यांची आधीची श्रीमंती देखील असते. या सर्वात मात्र कमी वयात जिद्दीने मोठे यश खेचून आणणाऱ्या लोकांचे कौतुक मात्र करायलाच हवे.
कनिका टेकरीवाल नावाची एक मुलगी. लहानपणापासून तिला आकाश आणि विमानांची आवड होती. विमान आणि आकाश यांचा थेट संबंध येईल अशा क्षेत्रात करियर करावे असे तिचे स्वप्न होते. मनात स्वप्न असताना तिचे शिक्षण पूर्ण होत होते. एमबीए करत असताना वयाच्या २१ व्या वर्षी कुणाच्याही पायाखालची जमीन सरकेल अशी गोष्ट समजली.
डॉक्टरांनी तिला कॅन्सर असल्याचे निदान केले. अवघ्या २१ वर्षांचे कोवळे वय. या वयात साध्या जगाची माहिती झालेली नसते. अशा परिस्थितीत तिच्यावर आभाळ कोसळले. आता आपल्या स्वप्नाचे काय होणार हा विचाराने ती हादरून गेली. काहीही झाले तरी स्वप्न तर पूर्ण करायचेच आहे, हा तिचा ठाम निर्धार होता. कॅन्सरविरुद्ध कनिकाची लढाई सुरू झाली. प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर वर्षभराच्या कालावधीत ती कॅन्सरमधून बाहेर पडली. आता वेळ होती स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याची. २०१४ साली तिच्या सुपीक डोक्यातून एक आयडिया आली आणि तिने जेटसेटगो नावाची कंपनी स्थापन केली. आपल्याकडे टॅक्सी सर्व्हिससाठी ओला उबर प्रसिद्ध व्हायचे होते त्याआधी तिने आकाशात भाड्याने विमान देण्यास सुरुवात केली होती.
जेटसेटगोचे काम हे ज्यांच्याकडे स्वतःचे विमान, हेलिकॉप्टर त्यांचे संचलन करणे, मॅनेज करणे, त्यांना उड्डाणासाठी विमान-हेलिकॉप्टर पुरवणे हे आहे. हे सर्व एका दिवसांत घडले नसले तरी स्वतःच्या कर्तबगारीवर विश्वास असल्याने कनिकाने हिंमतीने या क्षेत्रात पुढे जाण्याचे ठरवले होते. कनिकाला एक गोष्ट दिसत होती. अनेक व्यावसायिक प्रायव्हेट जेट खरेदी करतात, पण त्यांना वाढता खर्च, मेंटेनन्स परवडत नाही म्हणून ते विकून मोकळे होतात. तसेच लोकांचे प्रायव्हेट जेट बुकिंगचे अनुभव वाईट आहेत हे देखील तिला कळत होते. जेटसेटगो सुरू करून तिने असे क्लायंट जवळ केले ज्यांना बरेचदा दोन-तीन वेळेस वेगवेगळ्या शहरांमध्ये जायचे असते.
नवनव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तिने स्वतःची कंपनी वाढवली. जेटसेटगो क्लाऊड बेस्ड शेड्युलिंग, एयरक्राफ्ट मॅनेजमेंट तसेच सर्व्हिसेस आणि पार्टससाठी इनबिल्ट मार्केटप्लेस उपलब्ध करवून देणे असे काम करते. सोबतच आपल्या वेबसाइटच्या माध्यमातून प्रवाशांना विमानाशी जोडण्याचे काम जेटसेटगो करत असते. तिच्या या वेगळ्या प्रयोगासाठी तिला भारत सरकारकडून नॅशनल आंत्रप्रेन्यूरशिप पुरस्कारसुध्दा मिळाला आहे.
कनिका जेटसेटगोला आकाशातील उबर म्हणते. आजच्या तारखेला तिच्या कंपनीचा टर्नओव्हर हा १५० कोटी रुपये आहे. मागील वर्षी परदेशातून एयरक्राफ्ट खरेदी करणारी ही देशातील पहिली कंपनी ठरली आहे. तिच्या या कंपनीत क्रिकेटपटू युवराज सिंग याने देखील गुंतवणूक केली आहे.
उदय पाटील