येत्या रविवारी ऊंदराचं मटण खाल का ??

रविवार सकाळ उजाडली की एक महत्वाचं काम तुमच्याकडे सोपवलं जातं. ते काम म्हणजे 'बाजार' आणणे.मच्छीवाले कर्ली,बांगडा,सुरमय,पापलेटच्या टोपल्यांभोवती गराडा घालतात.चिकनवाले कडकनाथाच्या शोधात निघतात तर मटनवाले खाटकाच्या दुकानात रांगेला लागतात. पण आहारात एक बदल म्हणून तुम्ही येत्या रविवारी ऊंदराचं मटण खाल का असा प्रश्न कोणी विचाला तर तुम्ही हातात मिळेल ते शस्त्र घेऊन प्रश्न विचारणार्‍याच्या पाठी पडाल.होय की नाही ?
याचे कारण एकच आहे की आपल्या -महाराष्ट्राच्या- आहार पध्दतीत ऊंदीर नाही.पण आता चला आसामच्या आठवडी बाजारात !
आसाममध्ये बाक्सा जिल्ह्यात आणि आसपासच्या परगण्यात रविवारीत तळलेले आणि उकडलेले मसालेदार ऊंदीर घेण्यासाठी गर्दी उसळते.या परिसरात ऊंदीर म्हणजे रविवारची मेजवानी असते.आपल्या बाजारात ज्या दरात चिकन विकलं जातं साधारण त्याच दरात हे ऊंदीर विकले जातात.यापैकी आसामच्या कुमारीकाटा या गावामध्ये सगळ्यात मोठा बाजार भरतो.कुमारीकाटा हे गाव गौहाटीपासून १०० किमी दूर आणि भारत भूतानच्या सिमेवरचे गाव आहे.आसपासचे शेतकरी आदल्या दिवशी रात्री बांबूचे मोठे सापळे ऊंदीर पकडण्यासाठी लावतात.एक शेतकरी साधारणपणे १५ ते २० किलो ऊंदीर पकडून बाजारात घेऊन येतो.एरवी आसामच्या मळ्यात काम करणार्‍या मजूरांचे हे जोड उत्पन्न समजले जाते.
या आहार पध्दतीमागे एक विचित्र कारण आहे ते असे : या भागात जंगलामध्ये ९०% अधिक बांबू असतो.बांबूला ४८ वर्षांनी एकदा फुलं येतात.त्यानंतर जंगलात ऊंदरांची संख्या वाढते.हा बांबूचा सिझन संपला की ऊंदीर गावात प्रवेश करतात आणि दिसेल ते खात सुटतात.त्यांची संख्या इतकी असते की गावात अन्नाचा कणही शिल्लक राहात नाही. लोकं उपाशी मरतात किंवा गाव सोडून पळून जातात.या दुष्काळाला मौतम असे नाव आहे. कदाचित या दुष्काळाच्या प्रभावानेच ही ऊंदीरांचा आहारात  आला असावा. 

सबस्क्राईब करा

* indicates required