हे टिटॅनियम मेटलचे हार्ट अनेकांना जीवदान देणार !

काही दिवसातच हे टिटॅनियम मेटलचे हार्ट अनेकांना जीवदान देणार !
ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स राज्यातला चाळीशीचा एका तरुणाचे हृदय काम करेनासे झाले.डॉक्टरांच्या तपासणीनंतर त्याच्यासाठी हृदयारोपण हा एकच पर्याय शिल्लक होता.हृदयारोपण करण्यासाठी डॉक्टरांची फौज तयारच होती पण हृदयदाता मिळेपर्यंत थांबणे भाग होते.असा दाता मिळेपर्यंत काय असा प्रश्न समोर उभा होता. डॉक्टरांनी शेवटचा उपाय म्हणून तात्पुरते काही दिवस टिटॅनियम मेटलचे कृत्रिम हृदय बसवण्याचा निर्णय घेतला.रुग्णही हा उपाय करायला तयार झाला.टिटॅनियम मेटलचे हे हृदय म्हणजे एक यंत्रच आहे जे हृदयाचे काम करते.रुग्णावर त्वरीत शस्त्रक्रिया करून हे मेटलचे हार्ट बसवण्यात आले.रुग्ण पण इतका जिद्दी की त्याने १०० दिवस या हृदयाच्या आधारावर काढले. हा पण एक विक्रमच होता.आतापर्यंत इतके दिवस पूर्णपणे यांत्रिक हृदयावर तग धरणारा हा पहिलाच रुग्ण होता.त्यानंतर काहीच दिवसात त्याला हृदयदाता मिळाला आणि ती शस्त्रक्रिया पण यशस्वी झाली.या अनुभवानंतर डॉक्टरांना आशा वाटते आहे की येत्या काळात असे यांत्रिक हृदयच कायम काम करेल आणि हृदयदात्याची गरजच भासणार नाही.ही झाली त्या रुग्णाची कथा पण हे असे अत्याधुनिक हृदय बनवणार्या शास्त्रज्ञाबद्द्ल चार शब्द सांगायलाच हवेत.

टिटॅनियम मेटलचे हार्ट बनवणार्या या शास्त्रज्ञाचे नाव आहे डॉ. डॅनियल टीम्स ! त्याने बनवलेल्या या यांत्रिक हृदयाचे नाव आहे BiVACOR. डॅनियलच्या वडीलांचे हृदय अचानक बंद पडले आणि त्यांना मृत्यू आला. या घटनेने दु:खी झालेल्या डॉ. डॅनियल टीम्सने कृत्रिम हृदय या विषयावर संशोधन सुरु केले. नोकरी सोडून दिली आणि सातत्याने असे हृदय बनवण्याच्या मागे तो लागला. त्याच्या प्रयत्नाचे फळ म्हणजे BiVACOR - टिटॅनियम आवरणात मॅग्नेट आणि एक फिरता रोटर यांच्या साह्याने रक्ताभिसरण करणारे कृत्रिम हृदय !! आता गेली २० वर्षे या विषयावरच काम करणार्या कंपनीचा चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर म्हणून डॉ. डॅनियल टीम्स कार्यरत आहेत. हे प्रयत्न यशस्वी झाले तर ती अनेक रुग्णांच्या एका नव्या आयुष्याची सुरुवात असेल.