अंतराळातून थेट पृथ्वीवर कोसळला होता अंतराळवीर!!
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/Untitled%20design%20%2878%29_0.png?itok=kJbXJS-I)
काही दिवसांपूर्वी भारताने 'चांद्रयान 3' लाँच केलं. उद्या २३ ऑगस्ट रोजी ते चंद्रावर उतरेल. तो नयनरम्य नजारा आपण सर्व बघूच पण आज जाणून घेऊया एका अंतराळवीराची कहाणी जो अंतराळातून थेट पृथ्वीवर कोसळला होता !
3 इडियट्स या सिनेमा मध्ये विरु सहस्त्रबुद्धे नामक पात्राच्या तोंडी एक वाक्य आहे,' कोणत्याही गोष्टी मध्ये पहिला कोण आला ते महत्वाचं!! दुसरा आणि त्यानंतरचे सर्वांच्या लक्षात राहत नाहीत'.आणि कदाचित हेच खरं असावं.१२ एप्रिल १९६१ रोजी रशियाने पहिल्यांदा एका अंतराळवीराला यानामधून अंतराळात पाठवले. युरी गागारीन हे अंतराळात जाणारे पाहिले व्यक्ती ठरले. ती मोहीम यशस्वी झाली.म्हणून अंतराळात जाणारी पहिली व्यक्ती म्हणजे युरी गागारीन हे बहुतेक सर्वांनाच माहित आहे, पण दुसरी व्यक्ती कोण हे फारच कमी लोकांना माहिती असेल. तर त्या व्यक्तीचं नाव व्लादिमीर कोमरोव!
इथे आपल्या कथेला सुरवात होते. कोमरोव यांचा जन्म मॉस्को मध्ये १६ मार्च १९२७ रोजी झाला. त्यांचे वडील मजूरी करायचे. शाळेत ते अतिशय हुशार होते. लहानपणा पासूनच त्यांना अॅरोनॉट इंजिनिअर व्हायचे होते. पण लहानपणी चा काळ दुसऱ्या महायुद्धाचा होता. व्लादिमीर यांना लहानपणी रोजच्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती त्यामुळे तेही मजुरी करायचे. पण त्यांनी कधी स्वप्न बघणे थांबवले नव्हते. अखेर १९५९ मध्ये त्यांना सोव्हिएत युनियनच्या एअरफोर्स मध्ये संधी मिळाली आणि मग त्यांनी कधी मागे वळून पहिलेच नाही.
१९६४ मध्ये कम्युनिस्ट सोव्हिएत युनियनच्या स्थापनेला ५० वर्ष पूर्ण होणार होती. त्यानिमित्त तो दिवस साजरा करण्यासाठी नवीन अंतराळ मोहीम आखण्याचं तेव्हाचे तत्कालीन राष्ट्रपती लिओनिड ब्रेझनेव्ह यांनी ठरवलं. सोयुझ१ (Soyuz) आणि सोयुझ२ अशी दोन अंतराळयाने पाठवायचं ठरलं. पण अडचण अशी होती की ब्रेझनेव्ह यांनी ज्या तारखेला लाँच करायचं ठरवलं तेव्हा ही याने अंतराळामध्ये जाण्यासाठी अजिबात तयार नव्हती. युरी गागारीन आणि इतर तंत्रज्ञांनी त्याचा तपास केला पण ब्रेझनेव्ह हे तेव्हाच्या सर्वात शक्तिशाली देशाचे राष्ट्रपती होते त्यांच्या पुढे ही समस्या ठेवणार कोण हा मोठा प्रश्न होता. युरी गागारीन यांनी राष्ट्रपतींना मिशन पुढे ढकलण्याची विनंती केली पण ते ऐकायला तयारच नव्हते. सोयुझ१ मधून व्लादिमीर कोमरोव जाणार होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी सोयुझ२ मधून अजून दोन अंतराळवीर जाणार होते. अंतराळामध्ये त्यांची याने एकमेकाला जोडली जाऊन सोयुझ 2 मधून तीनही अंतराळवीर पृथ्वीवर परत येणार होते.
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/bottom_1.jpg?itok=nJMyy2Gx)
युरी आणि त्यांच्या टीमने केलेल्या सर्वेक्षणानुसार त्या यानामध्ये तब्बल २०३ विविध प्रकारचे तांत्रिक बिघाड होते. शेवटी या संदर्भात दहा पानी मेमो तयार करून युरी यांनी KGB ( Komitet Gosudarstvennoy Bezopasnosti) तत्कालीन रशियन सेक्युरिटी सर्व्हिस मधील त्यांचे मित्र रुसयेव (Russuyev) यांच्या कडे दिला. पण एकंदरीत त्याचा काहीही उपयोग झाला नाही. ज्या ज्या लोकांच्या हातात तो मेमो पडला त्यांना एक तर कामावरून काढून टाकण्यात आले किंवा बदली करण्यात आली.
व्लादिमीर कोमरोव यांना याबद्दल पूर्ण माहिती होती. आपण जर या यानातून अंतराळामध्ये गेलो तर परत येऊ शकणार नाही याची पुरेपूर कल्पना त्यांना होती. पण ते गेले नसते तर सरकार ने युरी गागारीन यांना त्या कामगिरी वर पाठवले असते. इतक्या वर्षाच्या सहवासा नंतर युरी आणि व्लादिमीर यांच्या मध्ये गाढ मैत्री झाली होती. म्हणूनच जायचेच असेल तर मीच जाईन असे व्लादिमीर यांनी ठरवले. ही मैत्री एका बाजूनेच नव्हती यारोस्लाव गोलोव्हानोव्ह या रशियन पत्रकारच्या अहवालानुसार ज्या दिवशी लाँच होणार होता तेव्हा युरी गागारीन तिथे आले होते आणि संबंधित अधिकाऱ्यांना मला स्पेस सूट घालून जाऊ द्या अशी मागणी करत होते. 'He'll die instead of me. We've got to take care of him.' असे म्हणत होते. पण अधिकाऱ्यांना अशा कोणत्याच सूचना नव्हत्या त्यामुळे त्यांना बाहेरच थांबावे लागले.
अखेर २३ एप्रिल १९६७ रोजी मध्यरात्री १२:३२ वाजता लाँच करण्यात आले. बरोबर आठ मिनिटानंतर याना मध्ये बिघाड झाला, एक एक करून सर्व सिस्टिम बंद पडत गेल्या. पण त्यातूनही प्रसंगावधान राखून व्लादिमीर यांनी कॅप्सूल मधून पृथ्वी कडे जाण्याचा निर्णय घेतला. पण त्यातही ऐनवेळी पॅराशूट उघडले नाही आणि ते आतच अडकून राहिले. या दरम्यान ते अलेक्सी कोसिजिन जे सोव्हिएत चे एक मुख्याधिकारी होते त्यांच्याशी ते बोलत होते. ते सतत एकच वाक्य बोलत होते 'Heat is rising in the capsule'. त्यांच्या पत्नी बरोबरही त्यांचे संभाषण झाले तेव्हा त्यांनी मुुलांना काय सांगावे याबाबत बोलत होते. त्यांच्या शेवटच्या क्षणात त्यांनी 'Killed' असे शब्द उच्चारले. एकंदरीत त्यांचा सर्व राग त्यावेळी बाहेर पडत होता. ते ऐकून अलेक्सी यांनाही अश्रू आवरता आले नाहीत.
या सर्वाची परिणीती व्हायची तीच झाली ते कॅप्सूल साधारण 144 किमी प्रति तास या वेगाने पृथ्वी कडे येत होती जशी एखादी उल्का असावी काही वेळातच ते जमिनीवर येऊन आदळले. नंतरच्या तपासा मध्ये व्लादिमीर यांच्या देहाचा पूर्णतः जळून खाक झालेला ८० सेंटीमिटरचा कोळसाच सापडला. जणू काही रशियाच्या त्या काळ्या दिवसाची ती खूण होती.
एका हुकूमशहाच्या हट्टापायी एका निष्णात हुशार अंतराळवीराचा असा करूण अंत झाला. आपलं वर्चस्व जगामध्ये टिकवण्यासाठी ब्रेझनेव्ह यांनी बाकी कोणत्याही गोष्टींचा विचार न करता अंतराळ मोहीम ठरवली पण त्या हट्टापायी देशासाठी काहीही करायची इच्छा असणाऱ्या अंतराळवीराचा हकनाक बळी गेला. म्हणून सत्तेमध्ये वैचारिक स्थैर्य असणारी व्यक्ती असणं किती महत्वाचं आहे ते लक्षात येतं. अशा या निष्ठावान पण कमनशिबी अंतराळवीराला बोभाटा परिवाराचा एक कडक सॅल्यूट !!
- मोनाली कुलकर्णी