काल्पनिक वाटणारी ही कथा फोर्डच्या कारखान्यात प्रत्यक्ष घडली आहे.

आता जी गोष्ट आम्ही सांगतोय ती बर्याच वेगवेगळ्या रुपात तुम्ही ऐकली असेल.
एका कारखान्यात एक यंत्र बंद पडतं.मालक काळजीत पडतो.एक म्हातारा कारागिरच हे काम करू शकेल असं त्याला कळतं.तो त्याला बोलावतो.तो यंत्राचा एक कप्पा उघडून एक स्क्रू घट्ट पिळतो. ...आणि काय आश्चर्य यंत्र पुन्हा चालू होतं !
कारागिराला किती पैसे विचारल्यावर तो १०००० रुपये मागतो.मालक म्हणतो एक खिळा काढून नवा टाकण्याचे १०००० ?
त्यावर कारागिर म्हणतो स्क्रू पिळण्याचा १ रुपया आणि नेमका कोणता स्क्रू पिळायचा हे समजण्याचे ९९९९ रुपये !!!
ही कहाणी तुम्ही इतक्यावेळी वाचली असेल की ती काल्पनिक आहे असाच तुमचा समज असेल आणि 'बोभाटा' टाइमपास करतंय असा समज होईलही.पण वाचकहो, ही कहाणी प्रत्यक्षात घडली आहे.
****
त्या माणसाचं नाव आहे चार्ल्स प्रोटियस स्टेनमेट्झ आणि कंपनीच्या मालकाचं नाव हेन्री फोर्ड - फोर्ड मोटर्सचा मालक !
फोर्ड कंपनीच्या रिव्हर रोग प्लँटमध्ये घडलेली ही कहाणी आहे.कंपनीचा जनरेटर सुरु केल्याव्र काही विचित्र आवाज येऊन बंद पडायचा.कंपनीच्या अभियंत्यांनी बराच प्रयत्न केला पण जनरेटर सुरुच होईना.विचित्र घडफड आवाज आणि जनरेटर बंद !!
शेवटी हेन्री फोर्डने चार्ल्स स्टेनमेट्झला पाचारण केलं. चार्ल्स स्टेनमेट्झ त्याच्या पाठीला असलेल्या कुबडामुळे आणि डिसप्लेसिआ ग्रस्त असल्यामुळे विचित्र दिसायचा म्हणून त्याला 'लिटल जायंट' या नावानं पण ओळखलं जायचं.
स्टेनमेट्झ कारखान्यात आल्यावर त्याने एक वहीपेन आणि आरामासाठी खाट मागवली.काही मदत हवी का असं विचारल्यावर त्यानी नकार दिला.
पुढचे दोन दिवस आणि दोन रात्री तो सतत काही गणितं आणि आकृत्या वहीवर काढत बसला होता.
तिसर्या दिवशी सकाळी त्यानं शिडी मागवली.कसाबसा प्रयत्न करत तो जनरेटरच्या वर पोहचला.
झाकण काढून कॉईलच्या तारा मोजायला सुरुवात केली.मग हातातली मेजरींग टेप घेऊन काही ठिकाणी खडूच्या खूणा केल्या
हे सगळं घडत असताना कारखान्यातले अभियंते कुत्सित नजरेने बघत आपसात चर्चा करत होते.
काही वेळाने स्टेनमेट्झ खाली उतरला.अभियंत्यांना त्यानी बाजूची प्लेट काढायला सांगितली. त्याने खडूची खूण केली होती तिथून आतल्या कॉइलचे १६ फेरे काढून टाकायला सांगितले.कॉइल पुन्हा जागच्याजागी लावून जनरेटर सुरु करण्याचे आदेश दिले. काय आश्चर्य जनरेटर धडाक्यात सुरु झाला !
त्यानंतर घडली ती १०००० डॉलरच्या बिलाची गोष्ट जी तुम्ही आम्ही बर्याच वेळा वाचली आहे.
****
आता पुढचा प्रश्न असा की ही स्टोरी पण खरी आहे याचा काही पुरावा आहे का ?
'लाईफ' या अमेरिकन मासिकाच्या संपादकांना मे १९६५ रोजी एका पत्राद्वारे जॅक स्कॉट नावाच्या माणसाने ही कहाणी सत्य असल्याचे लिहिले होते. त्या लेखकाचे वडील बर्ट स्कॉट हे त्याचवेळी फोर्ड कंपनीत त्याच फॅक्टरीत काम करत होते.
आता थोडी माहिती चार्ल्स स्टेनमेट्झ बद्दल.चार्ल्स स्टेनमेट्झ हा जर्मन इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि गणिताचा अभ्यासक होता. त्याच्या आल्टरनेट करंटच्या अभ्यासामुळे अमेरिकेत एसी करंटचा प्रसार झाला.इलेक्ट्रिकल एंजिनियरींग गणिताच्या स्वरुपात मांडणे यावर त्याचा खास अभ्यास होता.