computer

संशयाच्या भूताची मजेदार कथा - माय नेबर ॲडॉल्फ

काल परवापर्यंत एक बातमी मधेमधे येत असे.नेताजी सुभाषचंद्र बोस अजून जिवंत आहेत.अमुक ठिकाणी आश्रमात रहातात, तमुक ठिकाणी ते बाजारात दिसले. 
एखादा माणूस किंवा एखादी घटना जेव्हां गूढ असते, रहस्य झालेली असते तेव्हां अशा बातम्या उठत रहातात. त्यातूनच कॉन्स्पिरसी थिअरी(कारस्थान सिद्धांत) जन्मतात. आणि मग नेताजींचा मृत्यू झालेला नाही, ते योग्य  परिस्थिती निर्माण झाल्यावर प्रकट होतील असं कारस्थान सिद्धांत सांगू लागतो.

हिटलरच्या मृत्यूबाबतही असेच सिद्धांत नाझींनी आणि हिटलर प्रेमींनी मांडले. १९४५ साली हिटलरचा एका इमारतीत जळून मृत्यू झाला होता. त्या काळात डीएनए तपासण्याची सोय नसल्यानं हिटलरचे अवशेष शोधून त्याचा मृत्यू नक्की करता आला नव्हता. त्यामुळंच तो जिवंत आहे, तो अमूक देशात गेलाय, तमूक देशात गेलाय अशा बातम्या पसरवल्या जात. आईकमॅन या क्रूरकर्म्याला मोसादनं अर्जेंटिनात नाट्यमय रीतीनं पकडलं आणि जर्मनीत आणलं ही १९६० सालची घटना हिटलर जिवंत आहे असा सिद्धांत पसरायला मदत करते.
अशा कारस्थान सिद्धांतांचा वापर करून नाट्यमय चित्रपट निर्माण केले जातात. जॉन एफ केनेडी यांच्या मृत्यूचं रहस्य उलगडलं नाही; त्या विषयावर थरारपट, रहस्यपट तयार झाले. 

कारस्थान सिद्धांच्या मागं न लागता रहस्याचा कल्पक वापर करून २०२२ साली Leonid Prudovsky या दिक्दर्शकानं माय नेबर ॲडॉल्फ हा चित्रपट तयार केला. 
१९६० साली कोलंबिया या दक्षिण अमेरिकेतल्या एका देशात एका शहराच्या परिघावरच्या एकांत जागी रहाणाऱ्या Polsky या म्हाताऱ्याच्या शेजारच्या पडीक घरात एक जर्मन माणूस रहायला येतो. पोल्स्कीला वाटतं की जर्मन माणूस (Herman Herzog) हिटलर आहे. पोल्स्की ज्यू आहे. हिटलरनं त्याचं कुटुंब उध्वस्थ केलंय. त्यामुळं त्याचा हिटलरवर खुन्नस आहे. शेजारी नक्कीच हिटलर आला आहे असं त्याला वाटतं. कारस्थान सिद्धांत त्याच्या उपयोगी पडतो.
पोल्स्कीच्या घरात दररोज पेपर येत असतो. एके दिवशी पेपरात बातमी झळकते की आईकमन या ज्यूना छळछावणीत मारणाऱ्या क्रूरकर्म्याला मोसादच्या एजंटांनी थरारक कारवाई करून अर्जेंटिनातून पळवून जर्मनीत नेलं. पोल्स्कीची खात्री पटते की हिटलरही पळालाय आणि कोलंबियात आपल्या शेजारी आलाय.
झालं.

पोल्स्की बाजारात जाऊन हिटलर या विषयावरची पुस्तकं, चरित्रं इत्यादी आणतो. हिटलरचे फोटो गोळा करतो. बाजारातून एक कॅमेरा आणतो आणि शेजारच्या जर्मनाचे फोटो काढत रहातो. 
पुस्तकात लिहिलेलं असतं की हिटलरचे डोळे घारे आहेत. पोल्स्की शेजाऱ्याचा क्लोज अप काढतो, त्यात डोळे घारे दिसतात. पोल्स्सकी पुस्तकातल्या त्या उल्लेखावर 'बरोबर' अशी खूण करतो.
शेजाऱ्याकडं अस्लेशियन कुत्रा असतो. पोल्स्की हिटलरकडं कुत्रा होता या ओळीवर 'बरोबर' अशी खूण करतो.
पुरावे घेऊन पोल्स्की इसरायली दूतावासात जाऊन जातो आणि तिथल्या अधिकाऱ्यांना सांगतो की हिटलर आलाय, त्याला पकडा.
शेजारी एकदा पोल्स्कीकडं येतो. अख्खी वोडकाची बाटली संपवतो. पोल्स्की हिटलर अजिबात अल्कोहोल घेत नसे ही ओळ खोडून काढतो. शेजारी हिटलर नाही असा पोल्स्कीला  नको असलेला पुरावा.

चित्रपटाच्या सुरवातीला पोल्स्कीच्या कौटुंबिक जीवनातले फोटो पाह्यला मिळाल्यार चित्रपट भावात्मक अंगानं पुढं सरकणार असं वाटत असताना चित्रपट रहस्य असल्यासारखा पुढं जाऊ लागतो. पण इथंच लोच्या आहे. आपल्याला प्रेक्षक म्हणून माहित आहे की हिटलर मेलेला आहे. मग हा म्हातारा काय काय पुरावे शोधणार आणि कसं सिद्ध करणार अशी एक अतर्क्य उत्कंठा निर्माण होते. एक तर्कात न बसणाऱ्या गोष्टीच्या मागं आपण जाऊ लागतो. पाहुया तरी अशा भावनेनं.
रहस्यपटाच्या अंगानं चित्रपट सरकत असतानाच पोल्स्की आणि हरझोग या दोन म्हाताऱ्यांचं व्यक्तिमत्वही उलगडू लागतं. समांतर पातळीवर दोन विक्षिप्त म्हाताऱ्यांची गोष्ट अशा रीतीनं चित्रपट सरकू लागतो. दोन म्हाताऱ्यांची पोरकट भांडणं पहाण्यात आपली करमणूक होते, मजा येते. चिडलेला पोल्स्की शेजाऱ्याच्या सेक्सी कारवर लघवी करताना पहातो तेव्हां हसायला येतं. अतर्क्य रहस्य, पुढं काय सापडणार आहे याची उत्कंठा या बरोबरच चित्रपट कॉमेडी होऊ लागतो.
शेवटापासून काही अंतरावर खुलासा होतो की हरझोग हा हिटलर नाही. तो होणारच असतो पण तो काहीशा नाट्यमय पद्धतीनं होतो.
चित्रपट तिथं संपायच्या ऐवजी आणखी काही काळ चालतो आणि दोन म्हाताऱ्यांच्यातलं वैर, भांडण, संपून दोघांच्यात मैत्री होताना शेवटी दिसते. व्ही शांताराम यांच्या चित्रपटात शोभेल अशा रीतीनं दोन म्हातारे मिठी मारतात, पाणावतात आणि हरझोग घर सोडून निघून जातो.

दोन्ही म्हाताऱ्यांचं विक्षीप्त वागणं चित्रपटभर पसरलेलं आहे, ते पहायला जाम मजा येते. पोट धरधरून जरी नसलं तरी आपण अनेक वेळा हसतो.
हरझोगचं काम Udo Kier या जर्मन नटानं केलंय. तो कसलेला नट आहे. त्याच्या नशीबी नाझींच्या भूमिका वठवणं अनेक वेळा आलंय. त्यानं भूमिका उत्तम सांभाळलीय. पोल्स्कीची भूमिका David Hayman या ब्रिटीश नटानं केलीय. तोही कसलेला नट आहे; बावळा, विक्षिप्त, चिडचिड्या  म्हातारा त्यांनी छान रंगवलाय. चित्रपट पहावासा वाटतो यामधे दोघांच्या अभिनयाचा वाट जास्त आहे.
हिचकॉकच्या रियर विंडो या ग्रेट चित्रपटाची आठवण होते. तिथंही एक माणूस कॅमेऱ्यामागं बसून समोरच्या इमारतीतल्या दुसऱ्या माणसाचे उद्योग शोधून काढत असतो. हिचकॉकला चित्रपटाचं तंत्र उत्तम अवगत होतं, त्याची पटकथा चिरेबंद असे. रियर विंडोमधली दोन मुख्य पात्रं सोडून तो इतरत्र भरकटत नाही. रहस्य निर्माण करायचं आणि ते शेवटी उलगडायचं हे तंत्र हिचकॉक त्याच्या चित्रपटात पक्कं ठेवतो. 

माय नेबरची पटकथा गोंधळते. कधी ती एका ज्यूची दारूण कथा वाटते, कधी ती दोन म्हाताऱ्यांमधल्या द्वंद्वाची कॉमेडी वाटते,  कधी ती एक अतर्क्य रहस्यकथा होते. इतके धागे चित्रपटात सांभाळायचे असतील तर चित्रपटाची लांबी वाढवावी लागते, लॉरेन्स ऑफ अरेबिया किवा गॉडफादर सारखा चित्रपट पसरवावा लागतो, कारण त्यात अनेक मुद्दे हाताळायचे असतात. दिक्दर्शकाचा गोंधळ झालाय. 
पण एक खरं. दोन म्हातारे दिक्दर्शकानं आणि नटांनी इतके हिलॅरियस केलेत की चित्रपट पहावासा वाटतो. मधे मधे भातात खडा आल्यासारखं वाटलं तरी तेवढा खडा दूर करून भात खावासा वाटतो तसं झालंय. 
हा चित्रपट गोव्यातल्या इफ्फी या चित्रपट महोत्सवात  प्रदर्शित करण्यात आला होता 

लेखक- निळू दामले

सबस्क्राईब करा

* indicates required