टिक ट्वेंटी घेतलेल्या पेशंटला तपासताना डॉक्टरांचे काय हाल होतात याचे खरेखुरे किस्से, सांगत आहेत डॉ. नितिन पाटणकर!!
सेंद्रिय आठवण की साठवण ?
मी एम.डी. करीत होतो त्या काळात टिक ट्वेंटी हे अत्यंत लोकप्रिय विष होतं. घरोघरी ढेकूण असत आणि त्यांना मारायला घरोघरी टिक ट्वेंटी असे. बरेचदा घरी सासूने छळले, नवऱ्याने मारले की बायका बूचभर टिक ट्वेंटी पिऊन टाकायच्या. मग उलट्या चालू व्हायच्या. टीव्हीतल्या डिटेक्टिव सिरियलमधे किंवा रहस्यकथांमधून जेव्हा विषप्रयोग होतो तेव्हा प्रथम विषप्रयोग झालाय हेच कळत नाही. मग चलाख डिटेक्टिव ते ओळखून दाखवतो. ॲगाथा ख्रिस्तीच्या अनेक गोष्टींमधून असे विषप्रयोग वाचायला मिळतात. मग ‘बाॅडी एक्सह्युमेट’ केली जाते वगैरे.
आपल्याकडे असे हुषार विषकर्मी नसल्याने चांगल्या रहस्यकथा लिहिल्या गेल्या नाहीत. आपल्याकडे विषाची बाटली चटकन दिसेल अशी ठेवली जाते, मग डिटेक्टिव काय डिटेक्ट करणार? हिंदी सिनेमात विष प्यायले रे प्यायले की लगेच मुलगी धाडकन मरून पडते. तोंडातून फेस येतो. हातातून विषाची बाटली घरंगळते. ती बघून मग सभोवतालच्या लोकांत हंबरडा फोडण्याची स्पर्धा लागते. ते बघून प्रत्यक्षातही मुली विषाची बाटली तशीच स्टाईलमधे घरंगळवत. (एक डॉक्टर म्हणून मी टिक ट्वेंटी पिऊन, सिरियस कंडिशनमधे हाॅस्पिटलमधे येऊन, सर्वोतपरीच्या उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने, प्राण गमावलेली माणसे बघितली आहेत. त्यांच्या आणि त्यांच्या जवळच्यांच्या वेदनांची आणि असहाय्यतेची मला पूर्ण जाणीव आहे. त्यांची थट्टा करण्याचा अजिबात हेतू नाही. बरेच जण मात्र मरण्यासाठी विष घेत नाहीत, तर इतरांना घाबरवण्यासाठी घेतात. मी त्यांच्याबद्दल बोलतोय). या अशा भिती घालण्यासाठी टिक ट्वेंटी पिणाऱ्या ललनांना आम्ही, ‘टिकली’ म्हणत असू आणि पुरुष असेल तर ‘टिकोजीराव’.बरेचदा तर चौकशी करताना असेही संवाद घडलेले आहेत.
डाॅ.: काय झाल सांगा.
नातेवाईक: (बहुतेक वेळा सासू ) मी दुपारी कामधाम आटोपून जरा लवंडले होते. ही आतमधे आवराआवर करीत होती. इतक्यात भांडं पडल्याचा आवाज आला.
डाॅ: किती वाजता घेतलं औषध तिने?
ना: तेच सांगत्ये. तर भांडी पडल्याचा आवाज आला, म्हणून मी विचारलं, “काय झालं गं”. तर आतून काहीच आवाज नाही.
डाॅ. किती वाजता झालं हे. (हे संभाषण चालू असताना पेशंटला तपासणे, पोटात नळी घालून पोटातील ‘पियुष’ बाहेर काढणे, सलाईनने पोट आतून धुवून काढणे आणि ॲट्राॅपिन चालू करणे हे चालूच असते)
ना: आम्ही साधारण दुपारी दोनला जेवून उठतो. मी काही तिच्या एकटीवर आवराआवर टाकत नाही.
डाॅ. दुपारी दोनला प्यायली का औषध?
नाः मी साधारण सव्वादोनला किचनमधे गेले. तर ही निपचित पडलेली. डोळे वर फिरलेले. मी झटकन चेहऱ्यावर पाणी मारले तर डोळे किलकिले केले आणि पुन्हा वर फिरवले. मला वाटल फीट आली असणार. म्हणून मी गुडघे दुखत असतानाही धावत जाऊन तिची चप्पल आणली आणि तिच्या नाकाशी धरली. तिला एकदम ओकांबा आला. मलाही त्या वासानी ढवळलं. तेवढ्यात ती एकदम उठून बसली. हातवारे करून काही दाखवू लागली. मला काहीच कळेना. मला वाटलं काही ‘बाहेरलं भितुरलं’ तर नाही ना?
डाॅ.: बाहेरलं भितुरलं?
ना: आपलं पिशाच बाधा वगैरे.
डाॅ.: ते सगळं सोडा हो. विष किती वाजता घेतलं?
नाः मगापासनं तेच का विचारताय?
डाॅ.: अहो, अंदाज यायला. जितका जास्त वेळ झाला असेल तितके जास्त विष पोटातून रक्तात गेले असणार.
ना: तेच तर मी सांगत्ये ना. तर मी मीठमोहऱ्या आणायला उठत्ये तोच, ही “ढेकणाचं औषध, खुर्चीखाली असं ओरडली आणि पुन्हा बेशुद्ध झाली. खुर्चीखाली ढेकणाच्या औषधाची बाटली आडवी पडलेली. औषध सांडलेलं.
डाॅ.: तुम्हाला वास नाही आला?
ना: दोन वाजून वीस मिनिटं
डाॅ.: त्याचं काय?
ना: तेच तर मगाधरून सांगायचा प्रयत्न करत्ये. हिनं विष प्यायलं ती वेळ. तुम्ही सांगूच देत नाही.
डाॅ.: जा, वाॅर्डबाहेर थांबा.
ना: बरी होईल ना?
डाॅ.: हो हो. तुम्ही नका काळजी करू.
ना: काळजी कशी नको करू? हे तिसऱ्यांदा झालयं. दर वेळेस डाॅक्टर तीन दिवसात घरी सोडतात, पण पोलिस केस मिटवताना लई खर्च होतो.
तर अशा या टिकल्या आणि टिकोजीराव.
यावर तेव्हा उपाय म्हणजे ॲट्राॅपिन नावाचे औषध देत राहाणे. हे दिल्याने विषाचे परिणाम टळतात. शरीराला विष बाहेर टाकायला वेळ मिळतो. या ॲट्राॅपिनचा डोस किती द्यायचा हे ठरविण्याची क्रूड पद्धत होती. बुबुळ पूर्ण डायलेट होईपर्यंत. राऊंडवर प्रत्येक जण टाॅर्च घेऊन पेशंटचे डोळे बघत असायचा. ‘पोटात घेतलेलं विष डोळ्यात दिसत असावं’, असं कित्येकांना वाटलं असणार नक्की. ॲट्राॅपिनचा आणखी एक परिणाम म्हणजे, ॲट्राॅपिन सायकाॅसिस. यात माणूस व्हायोलंट होतो, शिवीगाळ करू लागतो. अशा पेशंटचे हातपाय बेडला घट्ट बांधून ठेवावे लागतात. पेशंट सोबर झाला की मगच त्याला बंधनातून मुक्ती मिळते.
असेच एक टिकोजीराव एकदा ॲडमिट झाले. ‘रिकव्हरी एजंट’ अस यांच्या कामाचं स्वरूप होतं. शारिरीक बळाचा आणि मानसिक दडपणाचा वापर करून पैसे वसूल करणे हा यांचा व्यवसाय. त्यासाठी आधी पैसे थकवलेले हवेत, उधार घेतलेले हवेत अशी काहीही पूर्वअट नसे. यांनी विषप्राशन का केले हे आम्हाला कधीच कळले नाही. डिस्चार्ज देताना त्यांना विचारलं तर ते म्हणाले, “आमच्या जगात विष का घ्यायला लागतं ते मोठमोठी बुकं वाचून नाही कळणार. त्यासाठी आमच्या जगात यायला लागेल. इथे येताना एक लक्षात ठेवायचं की इथे आत येणं सोपं असतं, पण बाहेर मात्र कधीच पडता येत नाही”. मला एकदम सिनेमातील भयंकर मारपीट झाली की व्हिलनच्या तोंडी काही फिलाॅसाॅफिकल डायलाॅग असतात त्याची आठवण आली.
हे महाशय टिक ट्वेंटी पिऊन आले तेव्हा ते ‘नक्की मरायचंच’, हे ठरवूनच त्यांनी डोस घेतला होता. त्यांच्या जगातून त्यांचं असं बाहेर पडणं नियतीला मंजूर नसावं. ते वाचले. त्यांच्यावरील उपचारांदरम्यान ते ही या ॲट्राॅपिन सायकाॅसिसमधे होते. त्यांनाही बांधून ठेवलं होत.
प्रसंग क्र. १
एक दिवस सकाळच्या राऊंडच्या वेळेस हे टिकोजीराव अनवट अपशब्दांचा खजिना उघडून बसले होते. आमचे एक लेक्चरर होते. अत्यंत हुशार, दिसायला देखणे पण प्रकृतीने नाजूक. त्यांना विनोद करण्याची खोड. या टिकोजीरावांच्या तोंडून बाहेर पडणाऱ्या शिव्यांची लाखोली ऐकून आणि त्याला घट्ट बांधलेला आहे हे बघून लेक्चरर त्याच्याशी बोलू लागले. (लाखोली हा शब्द फक्त शिव्यांच्याच बाबतीत वापरतात की इतरही कुठे वापर होतो? कुणाला माहीत असेल तर कळवा. बहुतेक लाखो शिव्या आणि खोलवरच्या शिव्या असे दोन्ही अर्थ व्यक्त व्हावेत म्हणून हा शब्द आला असावा).
लेक्चरर: काय रे, कसा आहेस?
टिकोजीराव: (मी विशेषणे आणि क्रियाविशेषणे टाळून आणि काही शब्द गाळून हा संवाद लिहिणार आहे. उगाच ‘फुल्याफुल्या’ असं लिहिलं तर तो फुल्यांचा जप वाटेल. चतुर वाचकांनी मनातल्या मनात किंवा प्रकट, गाळलेले अपशब्द वापरून हे संवाद वाचावेत). दिसत नाही का तुला...? जरा हात सोड मग सांगतो कसं वाटतयं ते.
ले: तू जर असाच बोलत राहिलास तर तुला आणखी काही दिवस बांधून ठेवावे लागेल. मग ते आमच्याकडे वळून म्हणाले, "नाॅर्मली कुणी अशी भाषा वापरत असेल तर त्याला मध्ययुगीन शिक्षा द्यायला हवी. म्हणजे ‘चाबकाचे फटके’ किंवा उलटं टांगून ‘मिरचीची धुरी’ इत्यादी." हे त्या टिकोजीरावांनी ऐकलं.
टि: ए डाॅक्टर, तू मला मिरचीची धुरी देणार? हात पाय सोड आणि मर्दासारखा ये समोर. बिन सुरीने कोथळाच बाहेर काढतो.
ले: अरे याला बांधलेलाच ठेवा रे. हा सायकाॅसिस असताना सुटला तर माझं काही खरं नाही.
प्रसंग क्र. २
हाॅस्पिटलमधे दुपारी तीनला नर्सेसची ड्यूटी बदलते. त्याच आसपास लेक्चरर वाॅर्डात येउन प्रॅक्टिकल टाॅपिक शिकवतात. आमच्या वाॅर्डच्या दारातून शिरले आत की डाव्या बाजूस नर्सिंग स्टेशन. उजव्या बाजूस वाॅर्ड. नर्सिंग स्टेशनच्या पुढे टाॅयलेट ब्लाॅक. त्या टाॅयलेट ब्लाॅकच्या समोर टेबलखुर्च्या. त्या ‘गंधयुक्त तरीहि उष्ण’ जागेत दुपारचे शिक्षण व्हायचे.
प्रसंग १ घडला त्याच दिवशी दुपारी लेक्चरर आणि आम्ही विद्यार्थी बसून केसेस डिस्कस करीत होतो. नर्सिंग ड्यूटी बदलली. प्रत्येक ड्यूटी बदलली की सिस्टर इनचार्ज नर्सिंग राऊंड घेतात. असाच राऊंड चालू होता. या सिस्टर टिकोजीरावांपर्यंत पोचल्या. “कसा आहेस रे?” अस त्याला विचारलं तर त्याने काहीही न बोलता नुसतं हातापायाला बांधलेली बंधनं दाखवली. सिस्टरना त्याची दया आली. त्यांनी त्याला बंधनमुक्त करायला घेतलं. त्यांच्यासोबत बाकीच्या सगळ्या मल्ल्याळी सिस्टर्स. त्या एकदम काहीतरी मल्ल्याळीत बोलल्या. “किती कलकलाट करता गं, आणि हिंदी किंवा इंग्रजीत बोला” अस बोलत बोलत त्यांनी टिकोजीरावांना बंधमुक्त केले.
टिकोजीराव उठून बसले. त्यांनी चहूकडे नजर फिरवली तर त्यांना ज्ञानदानात गढून गेलेले लेक्चरर दिसले. आता दाखवतोच धुरी देवून, अस म्हणून ते आमच्या दिशेने धावले. डाॅ. लोकांचं प्रसंगावधान वाखाणण्याजोगं असतं. आम्ही सगळे नर्सिंग स्टेशनमधे गुप्त झालो. आमचे लेक्चरर अचानक नाहीसे झाले आणि टाॅयलेटमधे जाऊन बसले. इतक्यात पेशंटला एक बाटली दिसली. ती त्याने फोडून अर्धी बाटली अगदी एंटर द ड्रॅगन, ब्रूसली आणि स्कारफेस फाइट स्टाइल घेऊन तो टाॅयलेटसमोर उभा राहिला.
“डाॅक्टर, ये बाहेर धुरी द्यायला. चाबकाचे फटके द्यायला. आज मी तुम्हाला दाखवतो माणसाला कसा खोलतात ते.”
इतक्यात कुणीतरी सिक्युरिटी गार्डला बोलावले. तो मोठ्या ऐटीत आला. टिकोजीरावांचा अवतार बघून त्याने सांगितलं, ‘पेशंट व्हायोलंट आहे. कॅज्युअल्टीमधे हवालदार आहे त्याला बोलवा. हे पोलिसाचे काम आहे’. मग कॅज्युअल्टीतून हवालदार आले. त्यांनीही हा प्रसंग बघितला. “हा हाॅस्पिटलचा इंटर्नल प्राब्लेम आहे. अजून दोन सिक्युरिटी बोलवा. याला बांधा मग मी एफ. आय. आर. करायला येईन”.
पुढील दहा मिनिटांना ‘इंडिअन स्टॅंडॲाफ’ म्हणायला हरकत नाही. ही सगळी गडबड ऐकून बरेच पेशंटही गोळा झाले. त्यातले दोन जण टिकोजीरावांच्या व्यवसायातली सिनियर माणसे होती. त्यांनी एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. ते पुढे गेले. त्यांना पाहूनच टिकोजीराव एकदम थंड. सिनियर लोकांनी टिकोजीरावांच्या हातातील बाटली काढून घेतली. त्याला त्याच्या बेडवर नेऊन झोपवला. सिस्टरना त्याला पुन्हा बांधून घालायला मदत केली. सगळीकडून टाळ्यांचा कडकडाट झाला. ते दोघेही बहुतेक बुजरे असावेत किंवा प्रसिद्धीपराड्.मुख असावेत. ते चटकन नाहीसे झाले. आम्ही लेक्चररना, आता बाहेर यायला हरकत नाही अस सांगताक्षणी ते बाहेर आले.
“त्या गृहात मी अर्धातास काढला की. सार्वजनिक संडास हा काय प्रकार आहे हे तिथे काहीवेळ काढल्याशिवाय कळणार नाही. मी तर ठरवलं होतं, तिथे अजून राहण्यापेक्षा बाहेर येऊन कोथळा काढून घेतलेला बरा”.
तो टिकोजीराव डिस्चार्ज घेताना लेक्चरर साहेबांची हजारदा माफी मागून गेला.
टी. ट्वेंटी म्हटलं की क्रिकेटची मॅच आठवते. पहिला वर्ल्डकप आठवतो, युवराजच्या सहा सिक्सर आठवतात. हे सगळ्यांना आठवत असेल. आमच्या लेक्चररना मात्र ‘टी. ट्वेंटी’ ऐकलं की ‘टिक ट्वेंटी’ आठवतं. ते म्हणतात की माझ्या अंगाला अजूनही ‘तो वास’ सोडून गेलेला नाही. ही नुसती आठवण नाही तर ही ‘सेंद्रिय’ आठवण आहे.
डाॅ. नितीन पाटणकर एम. डी.
कुणाला आपल्या शरीरातील कुठची चक्रं असंतुलित आहेत हे जाणून घ्यायचे असेल तर मला [email protected] या मेल वर, I am interested. असं लिहून पाठवा. मी एक प्रश्नावली पाठवीन. भरायला थोडा वेळ लागतो, पण चक्र असंतुलनाचं निदान अचूक होतं. मी तुम्हाला रिझल्ट पाठवीन. हे निदान मोफत आहे. काळजी नसावी.