computer

आयर्न लंग म्हणजे काय असतं? वाचा व्हेंटिलेटरच्या पूर्वजाची गोष्ट !!

व्हेंटिलेटर मशीन कसं काम करतं ते आमच्या या लेखात तुम्ही वाचलंच असेल. त्यात पोलिओच्या साथीचा उल्लेखही तुम्ही वाचला असेल. भारतात आता पोलिओचे जवळजवळ उच्चाटन करण्यात आपण यशस्वी झालो आहोत. पण १९४०-५० च्या दरम्यान पोलिओ या रोगाने जगभर थैमान घातले होते. पोलिओच्या व्हायरसने एकदा फुफ्फुसाच्या स्नायूंमध्ये प्रवेश केला की रोग्याचा श्वासोश्वास बंद पडायला लागायचा. मात्र या रोगातून वाचलेल्या रोग्यांची फुफ्फुसे पुन्हा एकदा पहिल्यासारखीच काम करायला लागायची. तेव्हा डॉक्टरांच्या  लक्षात आले की पोलिओच्या व्हायरसने फुफ्फुसाचा ताबा घेतल्यावर जर श्वासोश्वास करण्याचे काम जर एखाद्या बाहेरच्या मशीनने केले, तर अनेकांचे जीव वाचू शकतील. या निरिक्षणातून जन्म झाला आयर्न लंगचा!

आयर्न लंग हा एकप्रकारचा व्हेंटिलेटरचा पूर्वजच म्हणायला हवा, कारण शरीराबाहेर जोडलेले एखादे मशीन फुफ्फुसाचे काम करू शकते हा नविन विचार आयर्न लंगने सिध्द केला.   दिसायला हे मशीन एखाद्या लोखंडी कपाटासारखे किंवा ट्रंकेसारखे दिसायचे म्हणून लोक त्याला आयर्न लंग म्हणू लागले. अर्थात या मशीनलाटँक रेस्पीरेटर असेही नाव होते.

नक्की कसे काम करायचे हे आयर्न लंग मशीन?

एका लोखंडी पत्र्याच्या पेटीत रोग्याला ठेवले जायचे. रोग्याच्या मानेपर्यंतचा भाग एका बाजूला असलेलल्या गोल छिद्रातून बाहेर असायचा. या मानेभोवती स्पंजचे आवरण घालून पेटी हवाबंद केली जायची. यानंतर पेटीतील हवा बाहेर काढली जायची. त्यामुळे पेटीत निगेटिव्ह प्रेशर तयार व्हायचे आणि त्यामुळे छाती आपोआप फुगायची. त्यानंतर पेटीत पुन्हा हवा सोडली जायची आणि फुललेली छाती पुन्हा एकदा नॉर्मल व्हायची. थोडक्यात फुफ्फुसाच्या दुर्बळ झालेल्या स्नायूंचे काम ही पेटी करायची. रोग्याचा श्वास सुरु राहून ऑक्सिजनचा पुरवठा होत रहायचा. ही कल्पना साकार करण्याचे श्रेय हार्वर्ड विद्यापीठाचे डॉ. फिलीप ड्रींकर आणि डॉ.अगासीझ शॉ यांचाकडे जाते. 

(डॉ. फिलीप ड्रींकर)

पहिले आयर्न लंग मशीन १९२८ साली एका आठ वर्षाच्या मुलीवर उपचार करण्यासाठी वापरण्यात आले. पोलीओमुळे कोमामध्ये गेलेल्या या मुलीला आयर्न लंग मशीनमध्ये ठेवल्यावर ती एका मिनिटात शुध्दीवर आली आणि आईसक्रीम मागायला लागली. सुरुवातीच्या आयर्न लंग मशीनचे डिझाईन बदलून नंतर रोग्याला आता बाहेर करण्यासाठी यांत्रिक पट्टा जोडण्यात आला. रोग्याला औषधे देण्यासाठी जहाजाच्या खिडक्यांसारख्या गोल खिडक्या बनवण्यात आल्या. 

काही दिवसांतच जॉन हेवन इमर्सन नावाच्या एका डिझायनरने त्यानंतर श्वासोश्वासाची लय बदलू शकणार्‍या आयर्न लंगची निर्मिती केली. त्याच्या नविन डिझाईनमुळे आयर्न लंग मशीन अर्ध्या किंमतीत तयार व्हायला लागले. १९४०-१९५०च्या दरम्यान हजारो पोलिओ रोग्यांचे जीव वाचवण्याचे श्रेय या आयर्न लंग मशीनकडे जाते. पोलीओची लस तयार झाल्यावर या मशीनची उपयुक्तता घटली. आणि तोपर्यंत नव्या प्रकारचे व्हेंटिलेटरही जन्माला आले होते. 

आता जरी या मशीनची उपयुक्तता राहिली नसली तरी जर एखादे मशीन फुफ्फुसाचे काम करू शकते, तर हृदयाचे काम पण करू शकेल या विचाराला चालना मिळून नंतरच्या काळात हार्ट लंग मशीन जन्माला आले हे काय कमी आहे??

 

आणखी वाचा :

कोरोनाशी झुंज देताना व्हेंटिलेटर महत्त्वाचं का आहे? व्हेंटिलेटर नेमकं काय काम करतं?

सबस्क्राईब करा

* indicates required