प्रकरण ११ - गर्दीचे नियंत्रण
गर्दीचे नियंत्रण हे सिंहस्थातील सगळ्यात मोठे आव्हान होते. ह्या नियंत्रणाची काही सूत्रे आहेत. कमीत कमी वेळात लोकांना आत घ्यायचं आणि बाहेर काढायचं यासाठी आगमनाचे आणि निर्गमनाचे रस्ते सतत खुले राहतील याची काळजी घ्यावी लागते. जमावाचे गर्दीत रूपांतर व्हायला फारसा वेळ लागत नाही. मग त्यासाठी, लोक न अडखळता, एका जागी न थांबता, प्रवाहासारखे वाहत राहतील, याची खबरदारी घ्यावी लागते. सतत उद्घोषणा, स्वयंसेवकांचे मार्गदर्शन, दिशादर्शक पाट्या, अशा अनेक मार्गांनी अखंड प्रवाह वाहत राहिला की चेंगराचेंगरीची भीती कमी होत जाते.
पहिले आणि महत्त्वाचे सूत्र असे की, "Utmost precaution is to confirm that a streaming crowd does not confront a surprise." वाहत्या गर्दीपुढे अचानक अडथळा उभा राहणे, अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण करू शकते. आपल्या ओळखीचे उदाहरण येथे आपण घेऊ या. रेल्वेच्या जिन्यावर गर्दीच्या वेळी आपल्या पुढचा माणूस बुटाची सुटलेली लेस बांधायला मधेच थांबला तर त्या क्षणीच गर्दीचा वेग थांबतो आणि वाह्त जाण्याचा नैसर्गिक तोल धोक्यात येतो.
काही वर्षांपूर्वी दादर स्थानकावर एक धक्काबुक्कीचा प्रकार घडला होता. त्यावेळी दादरचा फुट ओवर ब्रिज अत्यंत अरुंद होता. सकाळी किंवा संध्याकाळी दोन गाड्या एकाच वेळी आल्या की दाट गर्दी व्हायची. एका कल्पक, परंतु उपद्रवी महाभागाने या गर्दीतून रस्ता ताबडतोब मिळावा, यासाठी मोटर कारच्या हॉर्नचे आवाज काढणारे एक खेळणे सोबत आणले होते. त्यातून हॉर्नचा पीपीप आवाज आला की समोरचा माणूस आपण आता रस्त्यावर नाही हे विसरून केवळ प्रतिक्षिप्त क्रियेने बा़जूला उडी मारायचा. हॉर्नचा आवाज आणि जीव वाचवण्याची प्रतिक्षिप्त क्रिया मेंदूत इतकी एकजीव झालेली असते की आपण रेल्वे पुलावर आहोत, रस्त्यावर नाही, याचे भान पण हरवून जायचे. परिणामी धक्काबुक्कीला सुरुवात व्हायची. रेल्वे पोलिसांच्या वेळीच केलेल्या हस्तक्षेपाने हे प्रकार व्हायचे थांबले. वाहत जाणार्या गर्दीसमोर अनपेक्षित काही घडले की त्याचे रूपांतर धक्काबुक्कीत आणि नंतर चेंगराचेंगरीत होते, हे समजण्यासाठी हे उदाहरण पुरेसे ठरावे.









