computer

.....आणि मांजर गुप्तहेर झाली

सीआयए - अमेरिकन गुप्तचर संस्था शक्तिमान आहे.शत्रू असो वा मित्र दोन्हींवर ही संंस्था बारीक नजर ठेवून असते.सीआयए त्यांच्या कामासाठी अद्ययावत उपकरणे वापरते.अनेक देशांचे पंतप्रधान त्यांचे खबरी असतात.अशा अनेक गोष्टी तुम्ही वाचल्या असतील.यापैकी काही खर्‍या आहेत तर काही गोष्टी निव्वळ प्रचारकी आहेत.आतासीआयएला -एका गुप्तचर संस्थेला  प्रचाराची काय आवश्यकता असा प्रश्न मनात येतोच.त्याचे उत्तर असे की या सगळ्या कथा हॉलीवूडच्या चित्रपटात वापरल्या जातात आणि त्यामुळे अमेरिकन जनतेला आपण सुरक्षित आहोत असे वाटते म्हणून ! 
 

अमेरिकेत सरकारी कागदपत्रे काही वर्षांच्या अंतराने डि-क्लासिफाय म्हणजे जनतेसाठी खुली केली जातात.या कागदपत्रांचा अभ्यास केल्यावर लाखो करोडो डॉलर्स खर्च करून सीआयएचे अनेक प्रयोग असे खड्ड्यात गेले ते उघडकीस येते. काहीवेळा तर हे उद्योग किती हास्यास्पद होते हे पण उघडकीस येते. 
१९६०च्या दरम्यान अमेरिका आणि रशिया यांचे शीतयुध्द जोरात होते.अमेरिकेतल्या रशियन वकीलातीतल्या नोकरशाहीवर आणि इतर रशियन लोकांवर लक्ष ठेवायच्या नवनव्या युक्त्या केल्या जायच्या.असाच एक गंमतीदार  प्रयोग म्हणजे ऑपरेशन अ‍ॅकॉस्टिक किटी (Operation Acoustic Kitty).या प्रयोगात शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी चक्क मांजरीचा वापर करण्यात आला होता. १९६७ सालच्या  "Views of Trained Cats" नावाच्या एका सरकारी कागदपत्रात या 'मांजर' प्रयोगाचा उल्लेख आहे.

पाळीव मांजराच्या कानात मायक्रोफोन लपवून त्यांना रशियन किंवा इतर संशयितांच्या घरात -आसपास सोडायचे आणि त्यातून ऐकू येणारी संभाषणे रेकॉर्ड करायची असा हा प्रयोग होता.ठरल्याप्रमाणे एका मांजराच्या कानाची सर्जरी करून आत मायक्रोफोन ठेवण्यात आला.गळ्यात ट्रान्समिटर अडकवण्यात आला आणि पाठीच्या कण्यावरून अँटेनाची तार नेण्यात आली.

 


 

या प्रयोगाची सत्यता तपासण्यासाठी एका बाकावर गप्पा मारत बसलेल्या दोन रशियन माणसांच्या दिशेने मांजरीला सोडण्यात आले.पण रस्ता क्रॉस करतानाच मांजर भरधाव येणार्‍या टॅक्सीच्या खाली चिरडली गेली. एकून हा प्रयोग फसला.त्यानंतर तो प्रयोग तातडीने बंदच करण्यात आला.
हे असे प्रयोग करताना सीआयएने मांजरीच्या नैसर्गिक वागण्याचा अभ्यासच केला नव्हता असे तज्ञांचे म्हणणे आहे.मांजर म्हणजे कुत्रा नाही.मांजरीत आज्ञाधारकपणाची उणिव असते  हे त्यांच्या लक्षात आले नाही. परिणामी प्रयोग संपला असे ठरवण्यात आले पण तोपर्यंत झालेला एकूण २ कोटी डॉलर्सचा खर्च खड्ड्यात गेला होता .

सबस्क्राईब करा

* indicates required