घ्यायला गेलो एक आणि निघालं एक !! रद्दीतल्या या १० वस्तू निघाल्या एवढ्या मोठ्या किमतीच्या !!
राव, रद्दीच्या दुकानात, जुन्या वस्तूंच्या दुकानात किंवा अगदी चोर बाजारातसुद्धा अशा काही वस्तू असतात की ज्यांची किंमत नेमकी किती आहे हे कोणालाच माहित नसतं. मग होतं असं की दुकानदार त्याच्या मनाप्रमाणे क्षुल्लक् किंमतीला वस्तू विकून टाकतो आणि पण खरं तर त्याची किंमत चक्क त्यापेक्षा हजारपट जास्त असते. तुमच्या सोबत झालंय का असं कधी?
राव, आज आम्ही अशा १० लोकांचे किस्से सांगणार आहोत ज्यांनी अगदी कवडीमोल किंमतीना वस्तू खरेदी केल्या पण त्यांच्या किमती गगनाला भिडणाऱ्या होत्या राव. लिस्ट बघून घ्या....
१. चिनी बाउल
खरेदी : ३ डॉलर्स
विक्री : २२ लाख डॉलर्स
घरातल्या जुन्या वस्तू घराबाहेर विकायला ठेवणे म्हणजे गॅरेज सेल. न्यूयॉर्कच्या अशाच एका गॅरेज सेलमधून एका कुटुंबाने अवघ्या ३ डॉलर्समध्ये एक चायना बाउल विकत घेतला होता. नंतर त्या कुटुंबाला समजलं की हा साधंसुधं चायना बाउल नाही, तर नसून चीनमधल्या १० किंवा ११ व्या शतकातल्या चिनी राजाचा बाउल आहे. लंडनमधल्या एका आर्ट डीलरने हा बाउल तब्बल २.२ मिलियन म्हणजे २२ लाख डॉलर्सना विकत घेतला.
२. जेम्स बॉंडचं घड्याळ
विक्री : ३८ डॉलर्स
खरेदी : १,६०,००० डॉलर्स
इंग्लंडच्या चोरबाजारातून एका माणसाने 'ब्रेटलिंग' कंपनीचं घड्याळ खरेदी केलं. या घडयाळाची किंमत फक्त ३८ डॉलर्स एवढी होती. खरं तर हे घड्याळ साधारण नव्हतं. त्याचा वापर जेम्स बॉंडच्या प्रसिद्ध 'थंडरबॉल' चित्रपटात झाला होता. हे जेव्हा या नवीन मालकाच्या लक्षात आलं, तेव्हा त्याने (२०१३ साली) एका लिलावात घड्याळ विकलं. त्यावेळी त्याची बोली लागली तब्बल १,६०,००० डॉलर्स.
३. मॅजिस्ट्रेट ऑफ ब्रसेल्स
खरेदी : ५०० डॉलर्स
विक्री : ६,५०,००० डॉलर्स
एका पाद्रयानं इंग्लंडमध्ये एक चित्र विकत घेतलं. किंमत होती ५०० डॉलर्स. चित्राला बघून एकाने अशी शक्यता वर्तवली की कदाचित हे चित्र प्रसिद्द चित्रकार 'व्हॅन डायक' याने काढलेलं 'मॅजिस्ट्रेट ऑफ ब्रसेल्स असावं. आणि काय आश्चर्य! चित्र खरंच 'व्हॅन डायक'ने काढलेलं होतं. ५०० डॉलर्सचे अचानक ६,५०,००० डॉलर्स झाले ना राव.
४. नैवेद्याचं चायनीज भांडं
खरेदी : ४ डॉलर्स
विक्री : ५४,००० डॉलर्स
सिडनी येथून एका माणसाने अवघ्या ४ डॉलर्सना एक भांडं विकत घेतलं होतं. नंतर त्याला कळालं की हे भांडं चीनमधलं असून १७ व्या शतकातलं आहे. हे भांडं चक्क गेंड्याच्या शिंगापासून तयार करण्यात आलं होतं. एका लिलावात या भांड्याला ५४,००० डॉलर्सची बोली लागली.
५. अमेरिकेच्या स्वातंत्र्याचं घोषणापत्र
खरेदी : २.५० डॉलर्स
विक्री : ४,७७,००० डॉलर्स
मायकल स्पार्क्स नावाच्या व्यक्तीने नॉर्थ कॅरोलिना येथल्या जुन्या सामानाच्या दुकानातून एक जुना कागद आणला होता. हा साधा कागदाचा तुकडा अमेरिकेच्या स्वातंत्र्याचं घोषणापत्र असल्याचं नंतर त्याच्या लक्षात आलं. या घोषणापत्राच्या २०० प्रती काढण्यात आल्या होत्या. एका लिलावात या ऐतिहासिक दस्तऐवजाची किंमत ४,७७,००० डॉलर्स ठरली.
अशाच आणखी एका घटनेत एका माणसानं चोर बाजारातून एक चित्र विकत घेतलं होतं. चित्राच्या मधल्या फटीत त्याला एक कागद सापडला. हा कागद म्हणजे अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या घोषणेची खरीखुरी प्रत होती. लिलावात या कागदाची बोली तब्बल २४ लाख डॉलर्स एवढी लागली.
६. पिकासोने स्वतः चितारलेलं पोस्टर
खरेदी : १४ डॉलर्स.
विक्री : ७००० डॉलर्स
Zachary Bodish नावाचा व्यक्तीला ओहायो येथील जुन्या सामानाच्या दुकानात एक जुनं पोस्टर सापडलं. या पोस्टरची त्याने किंमत मोजली अवघे १४ डॉलर्स. पोस्टर घरी घेऊन आल्यावर त्याने नीट निरखून बघितलं तेव्हा त्याला धक्काच बसला. ते पोस्टर पाब्लो पिकासो या जगद्विख्यात चित्रकाराने तयार केलं होतं. पोस्टरवर त्याची सही सुद्धा होती. या पोस्टरची किंमत पुढे ७००० डॉलर्स ठरली राव.
७. कार्ड टेबल
खरेदी : २५ डॉलर्स
विक्री : ५.४१,००० डॉलर्स
न्यू जर्सीच्या एका शिक्षिकेनं २५ डॉलर्स मध्ये जुनं टेबल विकत घेतलं होतं. हे टेबलला त्यांनी ३० वर्ष वापरलं. ३० वर्षानंतर त्यांना टेबल 'अॅन्टिक' असल्याचा संशय आला. तिचा संशय खरा निघाला. टेबलाच्या परीक्षणातून असं समजलं की हे टेबल १८ व्या शतकातील असून ते टेबल 'जॉन सायमॉर अँड सन्स' या अमेरिकेच्या प्रसिद्ध फर्निचर विक्रेत्याने तयार केलं आहे. यानंतर टेबलची किंमत २५ डॉलर्स वरून तब्बल ५,४१,००० डॉलर्स झाली.
८. बनावट बदक
खरेदी : २० डॉलर्स
विक्री : ११,७५० डॉलर्स
अमेरिकेत पूर्वी बदकांना जाळ्यात अडकवण्यासाठी आमिष म्हणून नकली बदक पाण्यात सोडलं जायचं. या नकली बदकाला 'डक डिकॉय' म्हणायचे. तर, असंच एक 'डक डिकॉय' एका माणसाने खरेदी केलं. पण तो काही साधारण डक डिकॉय नव्हतं. डक डिकॉयची आयडिया ज्याने काढली, त्या आयर हडसनने स्वतः हाताने ते बनवलं होतं. 'इबे'(eBay)वर या डक डिकॉयला ११,७५० डॉलर्सची किंमत मिळाली.
९. 'क्राईम अँड पनिशमेंट' पुस्तकाची पहिली आवृत्ती
खरेदी : १७ डॉलर्स
विक्री : १७,००० डॉलर्स
इंग्लंडच्या लॅन्सशायर भागात एका महिलेनं पुस्तकांचा एक बॉक्स विकत घेतला होता. या संपूर्ण बॉक्सची किंमत १७ डॉलर्स होती. घरी येऊन जेव्हा तिने पुस्तकं बघितली तेव्हा तिला त्यात 'फ्योदोर दोस्तोवस्की' या प्रसिद्ध रशियन लेखकाचं 'क्राईम अँड पनिशमेंट' पुस्तक सापडलं. हे पुस्तक खास होतं कारण 'क्राईम अँड पनिशमेंट'ची ती पहिली इंग्रजी आवृत्ती होती. पहिली आवृत्ती असल्याने पुस्तक अत्यंत दुर्मिळ होतं. मग या महिलेने एका लिलावात पुस्तक ठेवलं. पुस्तकाला तब्बल १७,००० डॉलर्स एवढी बोली लागली.
१०. इजिप्शियन काळातला मांजरीचा पुतळा
खरेदी : कचऱ्यात फुकट सापडलं
विक्री : ८०,००० डॉलर्स
इंग्लंड मधल्या कॉर्नवेल भागात एका कुटुंबानं जुन्यापुराण्या वस्तू विकायला काढल्या होत्या. या वस्तूंमध्ये एका मांजरीचा पुतळा होता. पण काही केल्या पुतळा विकला गेला नाही. हा पुतळा कोणीही विकत घेणार नाही असा विचार करून त्या कुटुंबाने पुतळा कचऱ्यात फेकला.
पुढे एकाला हा मांजरीचा पुतळा कचऱ्यात सापडला. पुतळा इजिप्शियन पद्धतीचा असल्याने त्याने जवळच्या ब्रिटीश म्युझियममध्ये नेऊन दाखवला. तेव्हा त्याला माहिती मिळाली की हा पुतळा तब्बल २,५०० वर्ष जुना असून इसवीसनपूर्व ५०० ते ७०० शतकातला आहे. पुतळ्याची किंमत २०,००० लावण्यात आली होती, पण लिलावात त्याला तब्बल ८०,००० डॉलर्सची बोली लागली.
तर मंडळी आपल्या जवळच्या वस्तू किती किमती असतील याचा कधीकधी आपल्यालाच अंदाज नसतो. पुढच्या वेळी जुन्यापुराण्या वस्तूंना बघताना नीट निरखून बघा बरं..
आणखी वाचा :
भारतातील ५ टॉपचे चोर बाजार !!!