नवीन वर्ष साजऱ्या करण्याच्या जगभरातल्या १० विचित्र परंपरा!! तुम्हांला आणखी कोणती अशी विचित्र गोष्ट माहित आहे का?
आपण कोणत्याही नवीन गोष्टीला सुरुवात करण्यापूर्वी काही विशिष्ट विधी किंवा प्रथा पाळतो. उदाहरणार्थ, आपल्याकडे नारळ फोडण्याची प्रथा आहे, लग्न झाल्यानंतर देवदर्शन केलं जातं, मुल झाल्यावर पेढे वाटले जातात, इत्यादी.
हे आज सांगण्याचं कारण म्हणजे येणारं नवीन वर्ष. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जगभर वेगवेगळ्या प्रथा आणि परंपरा आहेत. अशा निवडक १० देशांबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.
१. फिलिपाईन्स
फिलिपाईन्समध्ये एक समजूत आहे. नवीन वर्ष म्हणजे पैसे आणि समृद्धी. या पैशाचं प्रतिक म्हणजे नाणी. या नाण्यांचा आकार गोल असल्याकारणाने नवीन वर्षाच्या आगमनाच्यावेळी फिलिपाईन्सचे लोक जास्तीतजास्त गोलाकार गोष्टींचा वापर करतात. कपडे आणि खाद्यपदार्थ सुद्धा गोलाकार निवडले जातात. येणाऱ्या वर्षात समृद्धी यावी यासाठी ही प्रथा सुरु झाली होती.
२. डेन्मार्क
डेन्मार्कच्या रस्त्यांवर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी फुटलेली मातीची भांडी दिसतात. लोक ३१ जानेवारीपर्यंतची न वापरलेली भांडी मित्रांच्या घरासमोर फोडतात. असं केल्याने ‘गुडलक’ येतं असा समज आहे. जेवढी जास्त भांडी फुटतील तेवढी जास्त ती परत मिळतील अशीही समजूत आहे. या सोबतच रात्री १२ वाजता लोक खुर्चीवरून खाली उडी मारतात. नवीन वर्षात पदार्पण असा याचा अर्थ समजला जातो.
३. स्पेन
काही ठिकाणी १२ च्या ठोक्याला फटाके उडवले जातात आणि मोठ्याने happy new year असा जल्लोष केला जातो, पण स्पेनमध्ये मात्र लोक हातात द्राक्ष घेऊन वाट बघत असतात. स्पेनमध्ये ३१ तारखेच्या रात्री १२ वाजल्यानंतर पुढील १२ सेकंदात १२ द्राक्षे तोंडात टाकायची परंपरा आहे. न गिळता १२ द्राक्षे तोंडात धरता आली की नवीन वर्ष चांगलं जातं असा समज आहे.
४. इक्वाडोर
आपल्याकडे ३१ डिसेंबरच्या रात्री ओल्ड मॅनचा पुतळा जाळला जातो. ही पद्धत इक्वाडोरमध्ये फार पूर्वीपासून आहे आहे. इक्वाडोरमध्ये पुतळ्याच्या आत कागद भरले जातात. हा पुतळा मध्यरात्री जाळला जातो. सरत्या वर्षाची आठवण करून देणारे फोटोसुद्धा जाळले जातात. जुन्या आठवणी जाळून नवीन सुरुवात करण्यासाठी असं केलं जातं.
५. पेरू
पेरूमध्ये नवीन वर्षाचा जल्लोष साधारण २५ तारखेपासूनच सुरु होतो. तिथे नवीन वर्षाची सुरुवात करण्यापूर्वी एक कुस्तीसदृश्य स्पर्धा होते. याला टाकानाकू फेस्टिव्हल म्हणतात. टाकानाकूचा अर्थ होतो ‘when the blood is boiling’. मराठीत भाषांतर करायचं झालं तर ‘सळसळतं रक्त’. नावावरून हा खेळ खतरनाक वाटत असला तरी तो पोलिसांच्या निगराणीत मैत्रीपूर्ण पद्धतीने खेळला जातो. या खेळांनी आपापसातील हेवेदावे विसरून नव्या वर्षाची सुरुवात केली जाते.
६. जपान
जपानमधली नवीन वर्षाची सुरुवात फारच वेगळ्या प्रकारे होते. जपानमध्ये असलेल्या सर्व बौद्ध मंदिरांमध्ये मध्यरात्री १०८ वेळा घंटा वाजवल्या जातात. १०८ हा आकडा बौद्ध धर्मात दिलेल्या १०८ प्रकारच्या पापांच प्रतिक आहे. मंदिराच्या घंटा वाजवून पापांमधून मुक्ती मिळवली जाते.
७. दक्षिण अमेरिका
मेक्सिको, ब्राझील, बोलिव्हिया या देशांमध्ये विचित्र समजूत आहे. तुमच्या अंतर्वस्त्रांवरून येणाऱ्या वर्षातील भविष्य ठरतं असं समजलं जातं. ज्यांना नवीन वर्षात प्रेम हवं आहे ते लाल रंगाची अंडरवेअर घालतात, ज्यांना पैसा आणि यश मिळवायचं असतं ते पिवळ्या रंगाची, तर ज्यांना ‘शांती’ हवी आहे ते पांढरी अंडरवेअर घालतात.
८. इटली
नवीन वर्षाच्या सुरुवातीला इटलीच्या नेपल्स भागातील लोक घरातलं जुनं फर्निचर बाल्कनीतून फेकतात. असं केल्याने एक नवीन सुरुवात होते असं मानलं जातं. बाल्कनीतून सगळ्या प्रकारचं फर्निचर फेकलं तर रस्त्यावरून चालणाऱ्यांना इजा पोहोचू शकते. म्हणून लहानलहान आणि जखम होणार नाही अशा गोष्टी फेकण्यात येतात.
९. व्हेनिस
वेनिसच्या रस्त्यांवर नवीन वर्षाच्या स्वागताच्यावेळी ‘कीस इन व्हेनिस’ प्रकार पाहायला मिळतो. म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीला व्हेनिसच्या रस्त्यांवर आपल्या जोडीदाराचं चुंबन घ्यायचं.
१०. रोमानिया
नवीन वर्षाच्या संध्याकाळी रोमानियामध्ये मास्क डान्स होतो. याला ख्रिस्तपूर्व काळापासून चालत आलेली परंपरा आहे. लोक वेगवेगळ्या प्राण्यांचे मुखवटे घालतात आणि वेश धारण करून नाच आणि कार्यक्रम करतात. या कार्यक्रमाचा विषय जन्म आणि मृत्यू असतो. अस्वलाच्या वेशात होणारा नाच जास्त प्रसिद्ध आहे. एका समजुतीप्रमाणे जर एखाद्याच्या घरी अस्वलाच्या वेशातील माणूस गेला तर येणारं वर्ष घरात सुखसमृद्धी आणि चांगलं आरोग्य आणतं.
तर मंडळी, या होत्या जगभरातल्या प्रथा-परंपरा. तुमच्या भागात अशी एखादी पूर्वापार चालत आलेली पद्धत असेल तर आम्हाला नक्की सांगा.