निसर्ग सौंदर्याने भरलेले भारतातले १२ अप्रतिम रेल्वेमार्ग !!
"झुकझुक झुक झुक अगीनगाडी धुरांच्या रेषा हवेत काढी" हे गाणं सगळ्यांचं लाडकं असेल ना? विमानाने कितीही जलद जाता आलं तरी रेल्वेने प्रवास करणं खास असतं. खिडकीतून बाहेर दिसणारी हिरवीगार झाडं, छोटी शेतं,नद्या, धबधबे, जंगलं अशी कितीतरी दृश्य पळताना दिसतात. रेल्वेच्या प्रवासाशी असंख्य आठवणी जोडल्या जातात. भारतातले काही रेल्वे प्रवास तर इतके सुंदर आहेत की हा प्रवास तुम्हाला पुनःपुन्हा करायला आवडेल. आज त्यातल्याच काही रेल्वे मार्गांची माहिती करून घेऊयात. हे मार्ग बांधकामशास्त्राचे अजोड नमुने आहेतच शिवाय मनमोहक दृश्यांसाठीही ते प्रसिद्ध आहेत.
१. कालका – शिमला टॉय ट्रेन (हिमालयची राणी)
या रेल्वेमार्गात तब्बल १०७ बोगदे, ८६० पूल आहेत. १०० वर्षापेक्षा जुना हा मार्ग आहे. हा संपूर्ण प्रवास हिमालय पर्वतरांगांमधून होतो. वळणावळणाचा रस्ता व सभोवती हिरवेगार वृक्षांचे जंगल हे दृश्य डोळ्यात कायम साठवावे असेच आहे. कालका शिमला टॉय ट्रेन ही भारतातील सर्वात निसर्गरम्य रेल्वे प्रवासांपैकी एक आहे.
२. कोकण रेल्वे (रत्नागिरी-मडगाव-होनावर-मंगलोर)
कोकण रेल्वे ही भारतात सर्वात जास्त प्रसिद्ध रेल्वे आहे. या प्रवासात अद्भुत निसर्ग सौंदर्य पहायला मिळते. सुंदर सह्याद्री पर्वतरांगा, नदीवरचे पूल, तलाव, नारळाची हवेत डोलणारी झाडे मन मोहून टाकतात. इतरही अनेक तलाव पाहायला मिळतात.
३. केरळच्या किनाऱ्या लगतचा रेल्वे मार्ग (एर्नाकुलम-कोल्लम-त्रिवेंद्रम)
देवभूमी केरळच्या निसर्गाचे सौन्दर्य वर्णन करायला शब्दही अपुरे पडतील. अरबी समुद्राच्या लांबच लांब किनाऱ्याजवळून जाणारा हा रेल्वेमार्ग, आजूबाजूचा समुद्राचे पाणी, नारळाची झाडे, हिरवीगार भातशेती असे विलोभनीय दृश्य बघत बघत प्रवास कधी संपतो हे कळणारही नाही.
४. दार्जिलिंग हिमालयन टॉय ट्रेन (नवीन जलपाईगुडी-घुम-दार्जिलिंग)
दार्जिलिंग हिमालयन रेल्वे ही जागतिक वारसा लाभलेली एक टॉय ट्रेन आहे. भारतात एकूण ५ टॉय ट्रेन मार्ग हे जागतिक वारसा लाभलेले आहेत, त्यापैकी ही एक आहे. यातील प्रवासही एक सुंदर यात्रा म्हणूनच लक्षात राहील. खोल दर्या पर्वत यांमधून हा प्रवास करता येतो. छोटी छोटी दिसणारी गावं-खेडी या सौन्दर्यात अजून भर घालतात.
५. काश्मीर व्हॅली रेल्वे (जम्मू-उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला)
काश्मिर रेल्वे ही भारतातील सर्वात निसर्गरम्य रेल्वेमार्गापैकी एक आहे. काश्मीर रेल्वेमार्ग हा सर्वात अवघड आणि आव्हानात्मक रेल्वेमार्ग म्हणून ओळखला जातो. २० बोगदे, १०० पूल जोडून हा रेल्वे मार्ग तयार झालेला आहे. अतिशय थंड वातावरण उंच उंच पर्वत यामध्ये हा रेल्वेमार्ग बांधला गेला आहे.
६. नीलगिरी माउंटन रेल्वे (मेटटुपालयम-कुन्नूर-ऊटी)
दिलसे चित्रपटातलं छय्या छय्या गाणं हे इथल्याच रेल्वेच्या छतावर चित्रित झालेले आहे. नीलगिरी माउंटन रेल्वे ही भारताच्या माउंटन रेल्वेंपैकी एक आहे.आजूबाजूला असणाऱ्या चहाच्या बागा, उंच सखल डोंगररांगा, बोगदे, यातून वळणं घेत हा अप्रतिम प्रवास होतो. निलगिरीच्या पर्वतरांगा एकदा जरूर बघव्यात अश्याच आहेत.
७. ब्लू सी राइड (मंडपम- पंबन- रामेश्वरम)
पंबन रेल्वे हा मार्ग समुद्रावर असलेल्या पुलावरून जातो. १०० वर्षांपेक्षा जास्त जुना हा रेल्वेमार्ग पाण्याच्या फक्त १२.५ मी. उंच आहे. समुद्राला मोठी भरती येते तेव्हा ज्या उंच लाटा येतात तेव्हा त्याचे पाणी खिडकीतून अंगावरही येते. यातून प्रवास करणे म्हणजे कुठल्या ऍडव्हेंचर पेक्षा कमी नाही. हा रेल्वेमार्ग पाहिला की थक्क व्हायला होतं.
८. थार वाळवंटातील राणी (जयपूर-जोधपूर-जैसलमेर)
हा रेल्वे मार्ग राजस्थानच्या थार वाळवंटातून जातो. या प्रवासात ओसाड वाळवंट, दूरवर पसरलेले वाळूचे ढिगारे, वाळवंटातील वन्यजीव पाहायला मिळतात. अगदी छोट्या छोट्या खेड्यातून ही रेल्वे जाते त्यामुळे स्थानिक संस्कृतीचेही दर्शन घडते.
९. आसामचा रेल्वे मार्ग (गुवाहाटी-लुमडिंग-सिलचर)
आसाम म्हणजे चहाच्या झाडांच्या बागा हे सर्वांना माहीतच आहे. हाच प्रवास या रेल्वेतुन अनुभवता येतो. हिरव्यागार बागा, खोल दऱ्या, डोंगर, जंगल, दूर वर दिसणारी नदी हे अतिशय विलोभनीय दृश्य पाहता येते.
१०. ओरिसा ट्राइबल ओडिसी (कोरापुट - रायगडा)
कोरापुट ते रायगडा रेल्वे मार्ग गडद व घनदाट जंगलातून जातो. पावसाळ्यानंतर गेल्यास येथे पाण्याचे धबधबेही दिसतात. ओडिशाच्या आदिवासी भूमीवरील रायगडा हे एक निसर्गरम्य सौंदर्य स्थळ म्हणून ओळखले जाते. इथली वारसा स्थळंही पाहण्यासारखी आहेत.
११. अॅडव्हेंचर अराकू व्हॅली (विशाखापट्टणम-शिमिलिगुडा-अराकू व्हॅली)
अराकू व्हॅली हे तिथल्या निसर्गरम्य वातावरण आणि तेथे राहणाऱ्या आदिवासींसाठी प्रसिद्ध आहे. हा रेल्वेमार्ग शिमिलिगुडाच्या रेल्वे स्थानकापासून सुरू होतो. अरकु व्हॅली हे तिथले सर्वात सुंदर हिल स्टेशन आहे. हा अॅडव्हेंचर ट्रेन प्रवास ११० कि.मी. पेक्षा जास्त आहे. कॉफीच्या बागांमधला हा प्रवास अविसमरणीय ठरतो. भारतातील सर्वांत जुन्या रेल्वेमार्गापैकी एक म्हणून हा रेल्वेमार्ग ओळखला जातो.
१२. गोव्याचा रेल्वे मार्ग (वास्को द गामा - लोंदा).
दुधासारखे खळखळणारे धबधबे वाहताना पहायचे असतील तर या रेल्वेमार्गाने जरूर जावे. गोव्यापासून कर्नाटक आणि परत कर्नाटक ते गोवा असा हा रेल्वे प्रवास आहे. पावसाळ्यात हे निसर्ग सौन्दर्य अनुभवता येते. अनेक झरे, थंड वाहणारा वारा आणि पाण्याचे काही थेंब अंगावर उडतात. अनेक चित्रपटात हे दृश्य पाहिले असेल ते प्रत्यक्ष अनुभवायला येथे नक्की जाता येईल.
याशिवाय नेरळ- माथेरान,मुंबई-गोवा असे अनेक रेल्वे मार्गही आहेत. कशी वाटली तुम्हाला ही रेल्वेची सफर? जरुर कळवा. तुम्ही यातील कोणता प्रवास केला आहे हे शेयर करायला विसरू नका.