computer

इतिहासातली ५ महत्त्वाची आणि प्रसिद्ध सूर्यग्रहणं!!

ख्रिसमसनंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे २६ डिसेंबरला सूर्यग्रहण होणार आहे. हे सूर्यग्रहण अनेकार्थाने खास आहे. पहिलं कारण हे या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण असणार आहे. दुसरं कारण हे कंकणाकृती सूर्यग्रहण असणार आहे. कंकणाकृती सूर्यग्रहण दुर्मिळ असतं. या प्रकारच्या सुर्यग्रहणात चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही त्यामुळे सूर्याची तळपती प्रकाशाची किनार दिसते.

आज या निमित्ताने आपण इतिहासात होऊन गेलेल्या महत्त्वाच्या ५ सूर्यग्रहणांची माहिती घेणार आहोत.

१. युग्रित सूर्यग्रहण

सूर्यग्रहणाचा इतिहासातील सर्वात जुना उल्लेख हा सीरियाच्या युग्रित शहरातला आहे. त्याला युग्रित सूर्यग्रहण म्हणतात. इसविसनपूर्व ३ मे १३७५ रोजी युग्रित सूर्यग्रहणाच्यावेळी २ मिनिटांसाठी आकाश झाकोळले गेले होते.

या संदर्भातील माहिती देणारा शिलालेख १९४८ साली शोधण्यात आला होता. त्यावरच्या माहितीनुसार हे सूर्यग्रहण खरं तर इसविसनपूर्व ५ मार्च १२२३ साली झाले होते. ही माहिती तपासण्यासाठी शिलालेखाचं परीक्षण करण्यात आलं. शिलालेखावर असलेली लिपी नीट तपासली असता माहिती मिळाली, की सूर्यग्रहणाच्यावेळी ‘मंगळ ग्रह’ दिसला होता.

२. असेरीयान सूर्यग्रहण

असेरीयान साम्राज्य म्हणजे आजचा इराकचा प्रदेश. इसविसनपूर्व ७६३ साली झालेल्या सूर्यग्रहणाचा उल्लेख त्याकाळातील दस्तऐवजात आढळतो. पूर्ण ५ मिनिटांसाठी सूर्य झाकला गेल्याचा उल्लेख इतिहासात आहे.

३. चीनमधील सूर्यग्रहण

१३०२ सालचं चीनमधील खग्रास सूर्यग्रहण महत्त्वाचं आहे. या दिवसाबद्दल इतिहासातील उल्लेखाप्रमाणे या दिवशी ६ मिनिट २५ सेकंदांसाठी सूर्य झाकोळला गेला होता. चीनी समजुतीप्रमाणे सूर्य हा राजाशी जोडला जातो. त्यामुळे सूर्यग्रहणाकडे राजाला मिळालेली धोक्याची सूचना अशा प्रकारे बघितलं जायचं. अशावेळी राजा शाकाहारी अन्न घ्यायचा आणि पारंपारिक विधी करून ग्रहण सोडवण्याचा प्रयत्न करायचा.

४. येशू ख्रिस्त आणि सूर्यग्रहण

येशू ख्रिस्ताला क्रुसावर चढवल्यावर काही तासांसाठी सूर्यग्रहण लागल्याचा उल्लेख बायबलमध्ये आहे. इतिहासतज्ञ आणि ख्रिस्ती धर्मगुरूंनी या गोष्टीकडे वाईट काळ येणार असल्याची सूचना म्हणून बघितलं. या मागची खरी गोष्ट अशी की त्यादिवशी खग्रास सूर्यग्रहण होतं. हे वर्ष म्हणजे इसविसन २९. जवळजवळ १ मिनिट ५९ सेकंद हे सूर्यग्रहण होतं. यातही मतभेद आहेत. काहींच्या मते हे वर्ष २९ नसून इसविसन ३३ होतं आणि सूर्यग्रहणाची वेळ ४ मिनिट ६ सेकंद एवढी होती.

५. आईनस्टाईन आणि सूर्यग्रहण

पूर्वीच्या काळी सूर्यग्रहणाकडे देवाचा संदेश किंवा देवाने दिलेला इशारा या अर्थाने बघितलं जायचं, पण १९१९ साली इतिहासात पहिल्यांदाच सुर्यग्रहणाने विज्ञानाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. २९ मे १९१९ साली सूर्यग्रहण ६ मिनिट ५१ सेकंद एवढा वेळ होतं. यावेळी केलेल्या संशोधनात शास्त्रज्ञांनी सूर्याच्या जवळून जाणाऱ्या ताऱ्यांचं निरीक्षण केलं. या निरीक्षणात आढळलं की या ताऱ्यांमधून निघणारा प्रकाश सूर्याभोवती आल्यानंतर काहीसा वाकला आहे. या निरीक्षणामुळे अल्बर्ट आईनस्टाईन यांचा ‘सामान्य सापेक्षता सिद्धांत’ खरा असल्याचं सिद्ध झालं.

सबस्क्राईब करा

* indicates required