computer

सिनेमात दिसणारे ह्युमन सायबॉर्ग प्रत्यक्षातही आहेत? हे घ्या खऱ्या आयुष्यातील ७ ह्युमन सायबॉर्ग!!

तंत्रज्ञानाने हल्ली आपल्या जीवनाचे प्रत्येक अंग व्यापले आहे. दिव्यांग आणि अपघातात आपले अवयव गमवलेल्या लोकांसाठी कृत्रिम अवयवाचे रोपण करून त्याला तंत्रज्ञानाची जोड दिली जाऊ लागली आहे. रोबोटीक मानव किंवा आर्टिफिशियली इंटेलिजन्ट ह्यूमनॉईड ही संकल्पना आता फक्त पुस्तके, चित्रपट आणि टीव्ही सिरीयलचा विषय राहिलेली नाहीत. आपल्यातील जन्मजात उणीवांवर मात करण्यासाठी अनेकजण तंत्रज्ञानाचा आधार घेऊ पाहत आहेत. अशा व्यक्तींना तांत्रिक भाषेत ह्युमन सायबॉर्ग म्हटले जाते. ह्युमन सायबॉर्ग म्हणजे जिच्यामध्ये मशीन बसवलेली असते अशी व्यक्ती आणि हे मशीन म्हणजे त्या व्यक्तीच्या शरीराचा एक अविभाज्य भागच असतो.

आतापर्यंत हॉलीवूड चित्रपटातून तुम्ही असे रोबोटिक मानव पहिले असतीलच, पण तुम्हाला माहिती आहे की वास्तवातही असे काही ह्युमन सायबॉर्ग अस्तित्वात आहेत. सामान्य माणसाप्रमाणे वावरणाऱ्या अशा ह्युमन सायबॉर्गची माहिती देण्यासाठीच हा लेखन प्रपंच!

नील हार्मिसन

नील हार्मिसन हा एक कलाकार आहे. तो लहानपणापासूनच रंगांधळा होता. नीलला पांढरा आणि काळा हे दोन रंग सोडल्यास दुसरे कोणतेच रंग दिसत नव्हते. ही एक उणीव सोडली तर नीलला दुसरा कसलाच त्रास नव्हता. त्याचे आयुष्य इतर सामान्य मुलांप्रमाणेच होते. तो लहानपणापासून फक्त पांढरा आणि काळा हे दोनच रंग वापरून पेंटिंग करायलाही शिकला. इतर चित्रकारांची पेंटिंग्ज बघताना मात्र त्याला आपल्यातील या कमतरतेची तीव्रतेने जाणीव व्हायची. रंग ओळखता यावेत यासाठी नीलच्या डोक्याच्या मागच्या बाजूला एक इलेक्ट्रॉनिक डोळा बसवण्यात आला आहे. या डोळ्याच्या साहाय्याने तो रंग आणि वेगवेगळ्या रंगांतील फरक समजून घेऊ शकतो. त्याला रंग दिसू शकत नाहीत, पण तो रंग ऐकू शकतो.

नीलचा हा इलेक्ट्रॉनिक डोळा म्हणजे लहरी मोजणारे यंत्रच आहे. त्यामुळे वातावरणात निर्माण होणाऱ्या इतर लहरीही नीलला जाणवतात. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपल्यातील उणीवांवर मात करणारा नील हा कदाचित जगातील पहिला माणूस असावा. आपल्याप्रमाणेच जगातील इतर लोकांनाही अशा प्रकारे आपल्या उणीवांवर मात करता यावी यासाठी नीलने एक सायबॉर्ग फाउंडेशन स्थापन केले आहे. ज्या कुणाला तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपल्या व्यंगावर मात करण्याची इच्छा आहे अशा लोकांसाठी त्याची सायबॉर्ग फाऊंडेशन काम करते. आपण एक सायबॉर्ग आहोत याचा नीलला फार मोठा अभिमान वाटतो.

केव्हिन वार्विक

केव्हिन वार्विक हे ब्रिटनच्या युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंग सायबरनेटीक्स विषयाचे प्राध्यापक आहेत. सायबरनेटीक्स हे मशीन आणि मानव यांच्यात संवाद घडवून आणणारे एक शास्त्र आहे. आपल्या या अभ्यास विषयाचा वापर करून केव्हिन स्वतःलाच एका परिपूर्ण सायबॉर्गमध्ये रुपांतरीत करू पाहताहेत. यासाठी त्यांनी प्रोजेक्ट सायबॉर्ग नावाचा प्रकल्प हाती घेतला आहे.

१९९८ पासून वार्विक यांनी विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक अवयवांचे रोपण करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या दंडामध्ये त्यांनी एक छोटी मायक्रोचीप बसवली आहे, या चीपच्या साहाय्याने ते दरवाजा उघड-बंद करू शकतात, घरातील लाईट्स ऑन-ऑफ करू शकतात, कंप्युटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणेही नियंत्रित करू शकतात, एका रूममध्ये बसून दुसऱ्या रूममधील उपकरणेही हाताळू शकतात. एक परिपूर्ण ह्युमन सायबॉर्ग होण्याच्या दिशेने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

जेसी सुलीवान

जेसी सुलीवान हा एक इलेक्ट्रिशियन आहे. इलेक्ट्रिशियनचे काम करत असताना चुकून त्याचा हात ७००० व्होल्ट इतकी वीज वाहून नेणाऱ्या तारेला लागला आणि या अपघातात त्याचे दोन्ही हात निकामी झाले. जेसी इलेक्ट्रिशियन असल्याने आपल्या दोन्ही हातांच्या जागी त्याने रोबॉटिक हात बसवून घेतले आहेत. त्याचे हे इलेक्ट्रॉनिक हात त्याच्या मज्जातंतूच्या स्नायूंशी जोडले गेले आहेत, त्यामुळे या हातांना होणारा स्पर्शही त्याला जाणवू शकतो. थंड, गरम यातील फरक तो ओळखू शकतो. इतकेच नाही तर एखादी वस्तू उचलण्यासाठी आपल्याला किती ताकद म्हणजेच बल वापरावे लागणार आहे याचाही तो अंदाज लावू शकतो. जेसीचे हे उदाहरण पाहिल्यास जगातील अपंग व्यक्तींसाठी या माध्यमातून एक नवा आशेचा किरण निर्माण झाला आहे असे म्हणायला हरकत नाही. प्रत्येक दिव्यांग व्यक्ती अशाप्रकारे रोबॉटिक अवयवांचा वापर करून आपल्यातील व्यंगावर मात करू शकते आणि एक सर्वसामान्य आयुष्य जगू शकते.

जेन्स नॉमॅन

एका भीषण अपघातात जेन्सला आपले दोन्ही डोळे गमवावे लागले होते, पण त्याला विश्वास होता की आपण हे जग पुन्हा पाहू शकू. त्याची ही इच्छा वास्तवात उतरली जेव्हा त्याला कृत्रिम दृष्टी बसवण्यात आली. जेन्सच्या मज्जासंस्थेतील दृष्टी पाटलांशी ही कृत्रिम दृष्टी जोडण्यात आली आहे. यामुळे जेन्सच्या डोक्यातून बाहेर आलेल्या वायर्स सहज ओळखू येतात. त्याच्या या कृत्रिम दृष्टीत सातत्याने बदल केले जात आहेत जेणेकरून जेन्सला या कृत्रिम दृष्टीचा फारसा त्रास जाणवणार नाही. या कृत्रिम दृष्टीच्या सहाय्याने जेन्स संपूर्ण जग आहे तसे पाहू शकत नसला तरी त्याला इतर अंध व्यक्तींपेक्षा त्याला बऱ्याच गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. तो आता डोक्यातून बाहेर डोकावणाऱ्या वायर्स ऐवजी काही नवे प्रयोग करता येतील का या प्रयत्नात आहे.

निगेल ॲक्लांड

एका अपघातात निगेलचा एक हात कोपरापासून निखळला होता. त्याठिकाणी निगेलने एक कृत्रिम हात बसवून घेतला आहे. हा हात अतिशय प्रगत रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनवण्यात आला आहे. हा कृत्रिम हात त्याच्या वरच्या बाजूच्या हाताच्या स्नायूंशी जोडण्यात आला आहे. निगेल हा हात अगदी सहजतेने वापरतो. या हाताचा वापर करून तो टायपिंग, ड्रायव्हिंग अशी सगळी कामे करू शकतो.

जेरी जलावा

जेरीने एका अपघातात आपल्या हाताचे फक्त एक बोट गमावले होते. त्यालाही कृत्रिम हात बसवण्यात आले. जेरीने आपल्या या कृत्रिम हातात एक २ जीबीचे एक युएसबी पोर्ट बसवून घेतले आहे. या युएसबी पोर्टवरून तो हवी ती माहिती अपलोड आणि डाऊनलोड करू शकतो. त्याच्या अर्ध्या तुटलेल्या बोटावर बसवलेल्या या पोर्टची काढ-घाल करता येते. जेरी कधी कधी गमतीने म्हणतो, “मला भीती वाटते की कामाच्या ठिकाणी मी माझे हे बोटच विसरून आलो तर काय होईल. जेरी एक कंप्युटर प्रोग्रामर आहे. आपल्या अर्ध्या तुटलेल्या बोटाचा त्रास जाणवू नये म्हणून त्याने लढवलेली ही शक्कल अनेकांना खूपच गमतीशीर वाटते. जेरी आपले अर्धे बोट काढून जेव्हा हे पोर्ट कम्प्युटर किंवा लॅपटॉपला जोडतो तेव्हा आजूबाजूच्या लोकांचे चेहरे पाहण्यालायक असतात असे तो म्हणतो. सुरुवातीला जरी लोक घाबरत असले तरी नंतर जेव्हा त्यांना सत्य कळते तेव्हा मात्र सर्वांचीच हसून पुरेवाट होते.

क्लॉडीया मिशेल

क्लॉडीया मिशेल ही पहिली स्त्री सायबॉर्ग आहे. जेसी सुलीवान प्रमाणेच तिलाही कृत्रिम हात जोडण्यात आला आहे. तिचा हा हात तिच्या मज्जासंस्थेशी जोडण्यात आला असल्याने हा हात वापरण्यासाठी तिला कुठल्या विशेष तंत्रज्ञानाची गरज भासत नाही. आपण जसे आपला हात सहजतेने वापरतो, आपल्या मनाप्रमाणे त्याची हालचाल करू शकतो अगदी तशीच क्लॉडीयादेखील आपल्या या कृत्रिम हाताचा वापर करून आपली दैनंदिन कामे सहजतेने पार पाडते. तिच्या या कृत्रिम हाताची हालचाल पाहून तुम्हीही थक्क व्हाल. स्वयंपाक करणे असो की कपडे धुणे किंवा धुतलेल्या कपड्यांच्या घड्या घालणे, अशी सगळी कामे ती अगदी झटपट उरकून टाकते.

रोबोटिक अवयव जोडण्यातील गुंतागुंत थोडी सोपी झाली तर, दिव्यांग लोकांसाठी हे तंत्रज्ञान निश्चितच एक वरदान ठरेल, नाही का?

सबस्क्राईब करा

* indicates required